Jalgaon Crime : जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्याचे भाजप आमदार मंगेश चव्हाण (Mangesh Chavan) यांचे फेसबुक (Facebook) अकाऊंट हॅक झालं आहे. अकाऊंट हॅक करणाऱ्या अज्ञात व्यक्तीने हातात चाकू घेऊन धमकी देणारा तसेच बदनामीकारक फोटो फ्रोफाईलला अपलोड केला आहे. एवढेच नाही तर, फेसबुक पेजला लिंक असलेले गोपाल म्हस्के यांच्या क्रेडिड कार्डमधून 70 हजार रुपये काढून फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. गोपाल म्हस्के हे आमदार मंगेश चव्हाण यांचं कार्यालयीन कामकाज पाहतात. या प्रकरणी जळगाव सायबर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


26 ते 28 सप्टेंबर दरम्यान हा प्रकार घडला. सायबर चोरट्यांनी केवळ आमदार मंगेश चव्हाण यांचे फेसबुक अकाऊंट हॅक केलं नाही तर त्यांच्या अकाऊंटला लिंक असलेल्या गोपाल म्हस्के यांच्या क्रेडिट कार्डमधून पैसेही लुटले. सायबर गुन्ह्यांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. केवळ सर्वासामान्य नागरिकच नाही तर सेलिब्रिटी, राजकारणीही याला बळी ठरत आहेत. केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या नावाने फेक फेसबुक अकाऊंट उघडून अज्ञात ठगाकडून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवल्या जात होत्या. तसंच याच फेसबुक अकाऊंटवरुन समोरच्या व्यक्तीला ऑनलाईन पैशांची मागणी केली जात होती. 


मंगेश चव्हाण यांचं फेसबुक पेज हॅक
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 26 ते 28 सप्टेंबरच्या दरम्यान, अज्ञात व्यक्तीने आमदार मंगेश चव्हाण यांचे सोशल मीडियावरील फेसबुक अकाऊंट हॅक केले. त्यानंतर प्रोफाईल फोटो बदलून त्यावर काळा बुरखा (कपडा लपटलेला) चेहरा आणि हातात चाकू घेतलेले व्यक्तीचा धमकी देणारा तसेच बदनामीकारक फोटो अपलोड केला. याशिवाय या फेसबुक अकाऊंटवरील पोस्ट देखील डिलीट केल्या. 


कार्यालयीन कामकाज बघणाऱ्या गोपाल म्हस्के यांच्या अकाऊंटमधून पैसे लंपास
सायबर गुन्हेगार एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी तर मंगेश चव्हाण या फेसबुक पेजला लिंक असलेले गोपाल म्हस्के यांच्या क्रेडिट कार्डमधून ओटीपी न घेता 70 हजार 800 रुपये काढून आर्थिक फसवणुक केली. प्रकार समोर आल्यानंतर आमदार मंगेश चव्हाण यांचे फेसबुक पेजचे कार्यालयीन कामकाज बघणारे गोपाल म्हस्के (रा.टाकळी प्र.चा. ता. चाळीसगाव) यांच्या तक्रारीवरुन बुधवारी (28 सप्टेंबर) जळगाव सायबर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक लिलाभर कानडे हे करत आहेत.


इतर संबंधित बातम्या