Health Tips : आता पावसाळ्याच्या हंगाम (Monsoon Season) सुरु झाला आहे. अशा परिस्थितीत पाऊस सोबत अनेक आजारही घेऊन येतो. पावसाच्या धारा जरी आल्हाददायक वाटत असल्या, तरी या ऋतूत संसर्गाचा धोका देखील सर्वाधिक असतो. पावसाळ्यात मलेरिया, डेंग्यू, चिकन गुनिया यांसारखे हंगामी आजार आणि डासांपासून पसरणारे आजारही झपाट्याने वाढतात. या काळात बाहेरचे उघड्यावरचे पदार्थ खाल्ल्यानेही संसर्ग देखील झपाट्याने पसरतो. या ऋतूत खराब फळे आणि भाज्या खाल्ल्याने देखील तुम्ही आजारी पडू शकतात. या पावसाळ्याच्या काळात तुम्हाला आजारांपासून दूर राहायचे असेल आणि निरोगी राहायचे असेल तर, काही गोष्टींची काळजी घेणे महत्त्वाचे आहे.
रस्त्यावरचे पदार्थ खाणे टाळा : पावसाळ्यात रस्त्यावर, उघड्यावर विकले जाणारे पदार्थ खाणे टाळावे. हे पदार्थ बनवताना स्वच्छतेची फारशी काळजी घेतली जात नाही. अशा परिस्थितीत तळलेले, उघड्यावरचे अन्न पदार्थ खाल्ल्याने पोटाचे विकार होऊ शकतात. अनेक वेळा पावसाळ्यात स्ट्रीट फूड खाल्ल्याने इन्फेक्शन आणि अॅलर्जीची समस्याही उद्भवते.
कच्चे पदार्थ खाणे टाळा : पावसाळ्यात कोणत्याही प्रकारच्या कच्च्या अन्नाचे सेवन तुम्हाला आजारी पडण्यासाठी कारणीभूत ठरू शकते. या ऋतूमध्ये आपली चयापचय क्रिया खूप मंद होते. त्यामुळे अन्न पचण्यास बराच वेळ लागतो. या ऋतूत ज्यूस पिणे टाळा आणि सॅलड खाण्यापूर्वी, त्यातील घटक नीट धवून आणि वाफवून घ्या. कापलेली फळेही फार काळ उघड्यावर ठेवू नका.
जेवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा : जेवण्यापूर्वी हात नेहमी साबणाने स्वच्छ धुवा. पावसाळ्यात बहुतेक जंतू आणि जीवाणू हाताला चिकटून राहतात आणि जेव्हा हे जीवाणू पोटात जातात, तेव्हा ते काही घातक रोग आणि संसर्गास कारणीभूत ठरतात.
उकळलेले पाणी प्या : पावसात सगळ्यात अधिक संसर्ग पाण्यामुळे पसरतो. या ऋतूत पाणी नेहमी उकळून प्यावे. यामुळे पाण्यातील सर्व प्रकारचे जीवाणू नष्ट होतात आणि पाणी शुद्ध होते. उकळलेले पाणी प्यायल्याने डिहायड्रेशन आणि डायरियासारखे आजार देखील टाळता येतात.
प्रतिकारशक्ती मजबूत करा : पावसाळ्यात प्रतिकारशक्ती मजबूत असणे गरजेचे आहे. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असेल, तर आजारी पडणे आणि संसर्ग टाळू शकता. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी सुका मेवा खा. तसेच, आहारात मका, बार्ली, गहू, चणे यांसारख्या धान्यांचा समावेश करा. कडधान्ये आणि स्प्राऊट्स खा. याशिवाय आले आणि तुळस युक्त काढा प्या.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :