PM Modi Gujarat Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे आज गुजरातच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात मोदी अनेक भेट देणार आहेत. गुजरातमधील अंतराळ क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी पंतप्रधान मोदी प्रयत्न करत आहेत. आजच्या दौऱ्यात पंतप्रधान अनेक महत्वपूर्ण कार्यक्रमांना उपस्थिती दर्शवणार आहेत. त्यांच्या हस्ते आज अहमदाबाद येथील इंडियन नॅशनल स्पेस प्रमोशन अँड ऑथोरायझेशन सेंटर (IN-SPACE) मुख्यालयाचे उद्घाटन होणार आहे. तसेच नवसारी येथील मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्घाटनही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. 


विकास कामांचे उद्घाटन होणार


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत आपल्या आजच्या गुजरात दौऱ्याबद्दल माहिती दिली आहे. आजच्या गुजरात दौऱ्यावर असताना नवसारी आणि अहमदाबादमधील अनेक कार्यक्रमांना हजेरी लावणार असल्याचे मोदींनी ट्वीटमध्ये सांगितले आहे. दरम्यान मोदी गुजरातमध्ये पोहोचल्यानंतर प्रथम गुजरात गौरव अभियानात सामील होतील. ज्यामध्ये विविध विकास कामांचे उद्घाटन होणार आहे. यापैकी बरीच काम ही पाणी पुरवठ्याशी संबंधीत असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. नवसारीतील एएम नाईक हेल्थकेअर कॉम्प्लेक्स, निराली मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आणि खरेल एज्युकेशन कॉम्प्लेक्सचे उद्घाटन मोदींच्या हस्ते होणार आहे. नवसारीच्या सर्व प्रकल्पांमुळे दक्षिण गुजरातच्या लोकांना अनेक फायदे मिळतील असे पंतप्रधान मोदींनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.




 


यानंतर पीएम मोदी बोपल, अहमदाबाद येथील इंडियन नॅशनल स्पेस प्रमोशन अँड ऑथोरायझेशन सेंटर मुख्यालयाला भेट देऊन त्याचे उद्घाटन करतील. भारताच्या अंतराळ क्षेत्रात परिवर्तन घडवण्यात इंडियन नॅशनल सेंटर फॉर स्पेस प्रमोशन अँड ऑथोरायझेशन  महत्त्वाची भूमिका बजावेल, असंही यावेळी पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे. 


या वर्षाच्या अखेरीस गुजरातमध्ये विधानसभा निवडणुका (Gujarat Assembly Election 2022) होणार आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने तयारीला सुरुवात केली आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रदान नरेंद्र मोदी यांचा हा गुजरात दौरा महत्वाचा मानला जात आहे. भाजपची गेल्या 27 वर्षांपासून गुजरातवर सत्ता कायम आहे. त्यामुळे भाजपच्या दृष्टीने गुजरात राज्य महत्त्वाचे मानले जात आहे. त्यामुळे यावर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीबाबत भाजपने अत्यंत सावध पवित्रा घेतला आहे.