Hair Care Tips : शारीरिक आरोग्याबरोबरच आपण आपल्या केसांची काळजी घेणं देखील महत्त्वाचं आहे. यासाठी केसांची वेळोवेळी योग्य काळजी घ्यावी. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, आपल्या आहाराचा आपल्या केसांवरही परिणाम होतो. त्यामुळे तुम्ही जे काही खात आहात ते केसांसाठी निरोगी आणि पोषक असले पाहिजे. याबरोबरच केसांसाठी तेलही आवश्यक आहे. तेल लावल्याने केसांची चमक कायम राहते आणि तुमचे केस मजबूतही होतात.

  


केसांची निगा राखण्यासाठी केसांना तेल लावणे ही सर्वात आवश्यक बाब आहे. यामुळे केसांना पोषण मिळते आणि केस गळण्यापासून थांबतात. पण, जसजसा हिवाळा वाढत जातो तसतसे लोक केसांची काळजी कमी घेतात. केस धुण्यास कंटाळा करतात. केसांना तेल लावत नाहीत. चला तर मग जाणून घेऊयात हिवाळ्यात केसांना किती वेळा तेल लावावे?


किती वेळा तेल लावावे?


तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, लोक हिवाळ्यात केस कमी धुतात. त्यामुळे केसांना तेल लावणेही कमी झाले आहे. पण टाळूचा कोरडेपणा टाळण्यासाठी आठवड्यातून किमान दोनदा केसांना तेल लावा. याशिवाय केस धुण्यासाठी जात असाल तर कोमट पाण्याचाच वापर करा. खूप गरम पाणी टाळू कोरडे करू शकते. कोरड्या टाळूमुळे केस कमकुवत होऊन गळू लागतात.


कोमट तेल


केसांना तेल लावण्यासाठी कोमट तेल वापरा. यामुळे तेल केसांमध्ये खोलवर जाते. कोमट तेलाने केसांना तेल लावल्याने केसांची हरवलेली चमक परत येते. यामुळे केसही मजबूत होतात. केसांना तेल लावताना एक काळजी मात्र आवर्जून घ्या ती म्हणजे केसांना 3-4 तासांहून अधिक वेळ तेल लावून ठेवू नका.  


हिवाळ्यात कोणते तेल वापरावे?


हिवाळ्यात तुम्ही डोक्याला खोबरेल तेल, ऑलिव्ह ऑईल, एरंडेल तेल देखील लावू शकता. आरोग्य तज्ज्ञांच्या मते रोज तेल लावणे योग्य नाही. रोज तेल लावल्यास डोक्यात घाण साचते, त्यामुळे छिद्रे अडकतात.


हिवाळ्यात तुम्ही जर अशा प्रकारे तुमच्या केसांची काळजी घेतली तर तुमचे केस कधीही गळणार नाहीत, तुटणार नाहीत आणि पांढरे देखील होणार नाहीत. यासाठी हिवाळ्यात शरीराबरोबरच तुमच्या केसांनाही जपा. केसांची काळजी घ्या. 


महत्त्वाच्या बातम्या :


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


Health Tips : 'हायपरथर्मिया' म्हणजे काय? शरीरातील उष्णता मर्यादेपलीकडे वाढण्याचं कारण नेमकं काय? वाचा लक्षणं आणि उपाय