Diwali 2022 : दिवाळीचा (Diwali 2022) सण उद्या म्हणजेच 21 ऑक्टोबरपासून साजरा केला जाणार आहे. दिवाळीचा पहिला दिवस म्हणजेच धनोत्रयोदशी. यंदा धनोत्रयोदशी ही दोन दिवस साजरी करावी लागणार आहे. मुंबई, पुणे, नाशिक, सांगली आणि कोल्हापूर या भागात 22 ऑक्टोबर रोजी धनोत्रयोदशी होणार आहे. तर सोलापूर, नागपूर, अमरावती आणि विदर्भ भागात 23 ऑक्टोबर रोजी धनोत्रयोदशी साजरी करावी लागणार आहे. सायंकाळी 06.03 नंतर सूर्यास्त असलेल्या गावात 22 ऑक्टोबरला तर त्याआधी सूर्यास्त असलेल्या गावात 23 ऑक्टोबरला धनत्रयोदशी आणि प्रदोष असल्याची माहिती दाते पंचागचे प्रमुख मोहन दाते (Mohan Date) यांनी दिली. शास्त्रानुसार दिवाळी कशी साजरी करावी यासंदर्भात पंचागकर्ते मोहन दाते यांनी काय माहिती दिली पाहूयात.
पंचागकर्ते मोहन दाते यांनी सांगितलेल्या माहितीनुसार, यावर्षीची दिवाळी आपल्याला फार चांगल्या पद्धतीने साजरी करता येणार आहे. कोरोनानंतरची ही दिवाळी निर्बंधमुक्त साजरी करणार आहोत.
वसुबारस (21 ऑक्टोबर) : या दिवशी संध्याकाळी गाय वासराची पूजा 'गोधन' म्हणून करायची आहे. जर मोठ्या शहरात गाय वासरू मिळालं नाही तर मूर्तीची पूजा करावी. गाय वासरांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गोधनाची पूजा 21 ऑक्टोबरला करायची आहे.
धनत्रयोदशी (22 आणि 23 ऑक्टोबर) : 22 आणि 23 तारखेला दोन दिवस धनत्रयोदशी यावर्षी असणार आहे. प्रदोष काळ आणि प्रत्येक गावाचा सूर्यास्त याचा विचार करून ज्याप्रमाणे दोन संकष्टी चतुर्थी येऊ शकतात. त्याप्रमाणे यावर्षी दोन धनत्रयोदशींचे दिवस आलेले आहेत. साधारणपणे मुंबई, पुणे, नाशिक, सांगली, कोल्हापूर या भागामध्ये 22 ऑक्टोबर शनिवारी धनत्रयोदशी साजरी करायची आहे. तर, सोलापूर, औरंगाबाद, मराठवाडा, विदर्भ या भागामध्ये आपल्याला 23 तारखेला रविवारी धनत्रयोदशी साजरी करायची आहे. नेहमीच्या पद्धतीने धनत्रयोदशीला आपल्या घरातील धनाची पूजा, अलंकारांची पूजा करून करायची आहे. तसेच, धन्वंतरी जो वैद्यांचा देव आहे तर आरोग्यम् धनसंपदा म्हणजे आरोग्य हेसुद्धा एक प्रकारचं धन आहे आणि त्याचंसुद्धा आपल्याला पूजन करता यावं म्हणून धन्वंतरीची पूजा आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी आपण सगळ्यांनी करायची आहे.
नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन (24 ऑक्टोबर) : 24 तारखेला नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन असे दोन्ही एकाच दिवशी आहेत. गेल्या वर्षीसुद्धा हे दोन्ही सण एकाच दिवशी आले होते. त्यामुळे या दिवशी पहाटे अभ्यंगस्नान करायचं आहे. दिवाळीचा फराळ करायचा आहे. आणि संध्याकाळी परंपरेप्रमाणे लक्ष्मीपूजन करायचे आहे. हे लक्ष्मीपूजन आपल्याला दुपारी 3 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत कधीही करता येईल. विशेषत: प्रदोष काळ म्हणजे सूर्यास्तानंतर साधारण अडीच तास हा जो लक्ष्मीचा येण्याचा काळ आहे. त्या काळामध्ये करणं हे जास्त योग्य राहील. पण, त्याशिवाय इतर वेळीसुद्धा तुम्ही ही पूजा करू शकता. सायन्न काळापासून रात्री 12 पर्यंत आपल्याला लक्ष्मीपूजन करता येईल.
लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्या दिवशी मात्र एक भाकडदिवस आलेला आहे. पण तो अनेक वेळेला येऊ शकतो. पण यावर्षी मात्र त्या दिवशी 25 ऑक्टोबरला खंडग्रास सूर्यग्रहण असून ते भारतात सगळीकडे दिसणार आहे. त्याचा वेध हा मंगळवारी पहाटेपासून सुरु होतोय. हा वेध जरी सुरु झाला तरी त्या वेधकाळामध्ये आपण सर्व प्रकारच्या देवपूजा, नित्यकर्म, कुलाचार, श्राद्ध इत्यादी सर्व गोष्टी करू शकतो. शास्त्राने फक्त आपल्याला या काळात भोजन घेऊ नये एवढा दंडक सांगितलेला आहे. दुपारी साडेचार वाजल्यापासून ते संध्याकळी साडेसहा पर्यंत आपल्याला हे ग्रहण दिसणार आहे. तो ग्रहणाचा पर्व काळ असणार आहे. त्या पर्वकाळात आपल्याला ज्या गोष्टींचे पालन करायचे असतील त्याचे नियम पंचांगात पाहावे. भारतातला ग्रहणमोक्ष हा उशिरात उशिरा संध्याकाळी 6 वाजून 32 मिनिटांनी होतोय. त्यामुळे सगळ्यांनी मोक्ष स्नान जे करायचं आहे ते 6:32 नंतर करावं आणि तिथून आपले नित्य व्यवहार आपल्याला करता येतील.
दिवाळी पाडवा आणि भाऊबीज (26 ऑक्टोबर) : दुसऱ्या दिवशी 26 तारखेला ग्रहणाचा करी दिन आहे. आणि साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ दिवस दिवाळीचा पाडवा पण आहे. हा दिवस करी दिन असला तरी तेवढाच शुभ आहे. करी दिन असताना आपल्याला लग्न, मुंज, वास्तुशांत यांसारखी मंगल कार्य करता येत नाहीत. परंतु, दिवाळीचा पाडवा हा एक शुभ दिवस असल्या कारणाने आपल्याला सर्व प्रकारच्या वस्तूंची खरेदी आणि गोडधोड पदार्थ या सगळ्या गोष्टी आपण त्या दिवशी करू शकतो. पत्नीनेसुद्दा पतीला ओवाळून त्यांच्याकडून ओवाळणी घ्यायची असते. पण त्याच दिवशी भाऊबीज असल्यामुळे भावानेसुद्धा बहिणीला ओवाळणी द्यायची आहे. बहिणीने भावाला ओवाळायचं आहे. त्यामुळे पाडवा आणि भाऊबीज हे दोन्ही दिवस एकाच दिवशी आले आहेत.
पाहा व्हिडीओ :
महत्वाच्या बातम्या :
Diwali 2022 : दिवाळीत अभ्यंगस्नानाला आहे विशेष महत्त्व; जाणून घ्या उटणे लावण्याचे फायदे