Deepali Sayyad Exclusive : ठाकरे गटाचा सेलिब्रिटी चेहरा दिपाली सय्यद (Deepali Sayyad) आता शिंदे गटात जाणार का? असा सवाल उपस्थित होत आहे. कारण एबीपी माझाला (ABP Majha Exculsive) मुलाखत देताना दीपाली सय्यद यांनी एक सूचक वक्तव्य केलं आहे. दिपाली सय्यद यांच्या या वक्तव्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तुम्ही नेमक्या कोणत्या गटात आहात? असा प्रश्न एबीपी माझाच्या प्रतिनिधींनी विचारल्यावर 'मी सध्या वेट अँड वॉच'च्या भूमिकेत आहे, असं वक्तव्य सय्यद यांनी केलं आहे. तसेच, जो निर्णय घेईन तो तुम्हाला लवकरच कळेल, असंही त्या म्हणाल्या आहेत. त्यामुळे आता दिपाली सय्यद यांचा कल कोणत्या गटाकडे? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
अभिनेत्री दिपाली सय्यद बोलताना म्हणाल्या की, "मी राजकारणात येण्याच्या आधीपासूनच समाजकारण करत होते. राजकारणात आल्यानंतरही मी माझं काम सुरु ठेवलं. आता राजकारण एका वेगळ्या पातळीवर पोहोचलं आहे. त्यामुळे माझी काही समाजकारणातील रखडलेली कामं होती, जी झाली नव्हती, ती कामं मी करुन घेतली. मी सातत्यानं पुरुषांप्रमाणेच महाराष्ट्र केसरी ही मानाची स्पर्धा महिलांसाठीही भरवण्यात यावी, यासाठी प्रयत्न करत आहे. त्यासंदर्भात माझं काम सुरु आहे." तसेच, त्या पुढे बोलताना म्हणाल्या की, "एवढंच आहे की, मी स्क्रिनवर येऊन तू तू मै मै करत नाही आहे. जेव्हा गरज होती तेव्हा मी केली. तेव्हा नक्कीच अंगावर मी सगळ्या गोष्टी घेतल्या.", असंही त्या म्हणाल्या.
शिवसेनेला आता खरी गरज असताना शिवसेनेसाठी यापूर्वी उभ्या राहणाऱ्या रणरागिनी उर्मिला मातोंडकर आणि तुम्ही मागे का? या प्रश्नावर बोलताना त्या म्हणाल्या की, "आम्ही मागे आहोत असं म्हणणं चुकीचं आहे. इतकी वर्ष आम्ही कामं करतोय. मी महाराष्ट्रभर काम केली आहेत. सुषमा अंधारे यांनी आता शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांना प्रूव्ह करायचंय की, माझं एक अस्तित्व आहे. मला आता शिवसेनेत साडेतीन वर्ष झाली आहेत. शिवसेनेत काम करते, त्यामुळे गरजेचं नाही की, स्क्रिनवर प्रत्येक वेळी येऊन टीका टिपणी करावी आणि टीका-टीप्पणी केल्यावरच तुम्ही राजकारणात सक्रिय असता, असं म्हणणं चुकीचं आहे."
पाहा व्हिडीओ : सुषमा अंधारे यांच्या एन्ट्रीनंतर दिपाली सय्यद शिंदे गटात जाणार?
"एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे यांना एकत्र आणण्याचा मी प्रयत्न केला होता. मात्र ते आता कधी होईल माहीत नाही. स्क्रीनवर नसले तरी मी राजकारणात सक्रिय आहे. ग्राउंड लेव्हलला माझं काम सुरू आहे.", असं दिपाली सय्यद म्हणाल्या आहेत. दसरा मेळाव्याला मी इथे नव्हते कारण मी पुण्यात होते. प्रचंड गर्दी दसरा मेळाव्याला होती. मात्र मला असं वाटलं की, दोन्ही माणसं आपलीच आहेत, असं त्या म्हणाल्या.
लवकरच माझाही गट दिसेल : दिपाली सय्यद
"वेट अँड वॉच मी नक्कीच करत होते, कारण मला असं वाटत होतं दोन्ही गट एकत्र यावं. प्रत्येक जण आपलं मत मांडतंय, प्रत्येकाचाआपापले गट तयार झाले आहेत. लवकरच माझाही गट दिसेल.", असंही त्या म्हणाल्या आहेत. मलाही सध्या वेट अँड वॉच भूमिकेत राहावं लागेल. काम करताना एक फॉर्म डिसिजन असणं गरजेचं आहे. त्यामुळे मी त्याची वाट बघते फॉर्म डिसिजन घेणं आणि कामाला सुरुवात करणं गरजेचं आहे, असंही त्या म्हणाल्या.
मी सध्या वेट अँड वॉच भूमिकेत : दिपाली सय्यद
तुम्ही सध्या उद्धव ठाकरे सोबतच आहात ना? असं विचारल्यावर दिपाली सय्यद म्हणाल्या की, "नाही... मी सध्या वेट अँड वॉच भूमिकेत आहे. जो काय निर्णय घेईन, तो मी लवकरच कळवेन."