Diwali 2022 : आनंदाचा, उत्साहाचा आणि भरभराटीचा असा दिवाळी (Diwali 2022) सणाला 21 ऑक्टोबरपासून सुरुवात होतेय. आश्विन महिन्यातील अमावास्येला दिवाळी साजरी केली जाणार आहे. पाच दिवस चालणाऱ्या या उत्सवात विविध सणांची, प्रथांची रेलचेल पाहायला मिळतेय. दिवाळीत घरासमोर आकर्षक रांगोळी काढली जाते. दिव्यांची रोषणाई केली जाते. दिवाळीत मातीचे दिवे लावणे हे विशेष महत्त्वाचे मानले जाते.


लंका जिंकून भगवान राम जेव्हा सीतेसह अयोध्येला परतले तेव्हा संपूर्ण शहर दिव्यांनी उजळून निघाले होते. श्रीरामाच्या स्वागतासाठी सर्वत्र विद्युत रोषणाई करण्यात आली होती. शुभ कार्यापूर्वी दिवा लावण्याची परंपरा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. दिवाळीत दिवा लावणे आणि रांगोळी काढण्याचे नेमके महत्त्व काय ते जाणून घ्या.


दिवाळीत रांगोळी काढण्याचे महत्व 


रांगोळी ही भारताची प्राचीन सांस्कृतिक परंपरा आहे. रांगोळीचा हेतू म्हणजे शक्ती, उदारता जाणवणे आणि नशीब मिळविणे हे आहे. संस्कृत भाषेत रांगोळीला रंगवल्ली म्हटले जाते. सौंदर्याचा साक्षात्कार आणि मंगलाची सिद्धी हे रांगोळीचे उद्देश मानले जातात. रांगोळी म्हणजे रांगोळीच्या दगडाच्या चूर्णापासून आणि रंगांच्या साहाय्याने रेखाटलेल्या ओळींपासून तयार झालेली आकृती. भारतीय संस्कृतीमध्ये रांगोळीला खूप महत्त्व आहे. सण, उत्सव, मंगलसमारंभ, पूजा, कुलाचार, कुलधर्म, संस्कारविधी, व्रतवैकल्ये यांच्याशी सामान्यपणे ही कला निगडित आहे. रांगोळी काढण्याची प्रथा वर्षानुवर्षे सुरू आहे. शुभ कार्यात मैदा, तांदळाचे पीठ आणि आता अनेक रंगांची रांगोळी काढली जाते. 'रांगोळी' म्हणजे 'रंग' आणि 'अवल्ली' (पंक्ती). दिवाळी लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी वेगवेगळ्या रंगांचा वापर करून रांगोळी काढली जाते.
असे म्हटले जाते की, रांगोळी उत्साहाचे प्रतीक आहे आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करते. त्यामुळे दिवाळीत प्रत्येक दिवशी विविध डिझाईनची रांगोळी काढणं महत्वाचं आहे. सध्याच्या काळात या परंपरेला स्पर्धेचं रूपदेखील आलं आहे.   


दिवाळीत दिवा का लावावा?


दिवाळीच्या दिवशी मातीचे दिवे लावणे खूप शुभ मानले जाते. मातीचा दिवा पाच घटकांनी बनलेला असतो ज्यामुळे घर आणि आजूबाजूच्या वातावरणात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. दिव्यांच्या प्रकाशाने कीर्ती मिळते. सुख आणि समृद्धी लाभण्यासाठी दिवाळीला प्रत्येक घरात  लक्ष्मीची पूजा केली जाते. त्यामुळे या दिवशी घराचा कोणताही कोपरा अंधारात ठेवू नये. 


महत्वाच्या बातम्या : 


Diwali 2022 : या दिवाळीत फराळही खा आणि हेल्दी राहा; जाणून घ्या आरोग्यदायी फराळाची पद्धत