बूस्टर डोस म्हणजे काय? कोणाला दिला जातो?, पाहा तज्ज्ञ काय म्हणतात...
सावधगिरी म्हणून अशाप्रकारे डोस देण्याची गरज काय आणि त्यासाठी फक्त याच समूहांची निवड का करण्यात आली आहे ते समजून घेऊ.
- डॉ किंजल मोदी
आरोग्यसेवा कर्मचारी आणि सहव्याधी असलेल्या ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना लसीचे अतिरिक्त डोस दिले जाणार असल्याची घोषणा डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात भारत सरकारने करताच बूस्टर डोससाठी पात्रतेविषयी अनेक प्रश्न आणि शंका आरोग्यसेवा क्षेत्रातील व्यक्तींना विचारल्या जाऊ लागल्या. म्हणूनच बूस्टर डोस आणि सावधगिरी म्हणून दिला जाणारा डोस यातील नेमका फरक लोकांना समजणे गरजेचे आहे हे प्रकर्षाने जाणवले.
लोकांनी सर्वात आधी हे ध्यानात घेतले पाहिजे की सरकारने ज्याची सुरुवात केली आहे तो बूस्टर डोस नाही. बूस्टर डोस हा सर्वांसाठी असतो, तो काही विशिष्ट समूहांसाठी म्हणून दिला जात नाही. स्पष्ट वैद्यकीय भाषेत सांगायचे तर, भारतात ज्याची सुरुवात झाली आहे तो प्रिकॉशनरी डोस आहे अर्थात ज्यांना संसर्गाचा धोका सर्वात जास्त आहे अशा समूहांना आधीच खबरदारी घेतली जावी म्हणून दिला जाणारा डोस आहे. आरोग्यसेवा कर्मचारी हे सतत रुग्णांच्या संपर्कात असल्याने त्यांना आजाराचा संसर्ग होण्याचा धोका सर्वात जास्त असतो. त्याचप्रमाणे सहव्याधी असलेल्या आणि वय ६० वर्षांपेक्षा जास्त असलेल्या व्यक्तींना देखील संसर्गाचा धोका सर्वाधिक असतो. त्यामुळे त्यांना आधीच खबरदारी म्हणून डोस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा बूस्टर डोस नव्हे जो देशात सरसकट सर्वांना दिला जातो.
बूस्टर आणि सावधगिरी: कोणत्या प्रकारचे लोक
सावधगिरी म्हणून अशाप्रकारे डोस देण्याची गरज काय आणि त्यासाठी फक्त याच समूहांची निवड का करण्यात आली आहे ते समजून घेऊ.
सावधगिरी म्हणून लसीचा डोस: लसीचे दोन डोस घेतले जावेत अशी शिफारस करण्यात आली आहे. ते दोन डोस एखाद्या व्यक्तीला मिळाल्यानंतर त्याच्या व्यतिरिक्त हा अतिरिक्त डोस दिला जातो. अशाप्रकारे अतिरिक्त डोस दिला जाण्यामागे एक कारण आहे. लसीचे दोन डोस घेतल्यानंतर देखील एखाद्या व्यक्तीची रोगप्रतिकारशक्ती विषाणूच्या विरोधात लढण्यासाठी संरक्षणाचा जो स्तर गाठणे आवश्यक आहे तो गाठता न येण्याची शक्यता असते. शरीरातील रोगप्रतिकार यंत्रणेला अधिक कणखर होण्यासाठी प्रोत्साहन मिळावे म्हणून लसीच्या दुसऱ्या डोसनंतर काही विशिष्ट कालावधीनंतर (सर्वसामान्यतः ९ महिने) लसीचा एक अतिरिक्त डोस दिला जातो.
सावधगिरी म्हणून लसीचा डोस कोणाला दिला जाणार?
आता असा प्रश्न उपस्थित राहतो की, देशातील संपूर्ण लोकसंख्येला असा अतिरिक्त डोस का दिला जात नाही? (देशातील संपूर्ण लोकसंख्येला दिला जात असेल तर तो बूस्टर डोस असतो.) या अतिरिक्त डोसचे लाभार्थी म्हणून काही विशिष्ट समुहांचीच निवड का केली जाते? यामागे देखील एक तार्किक कारण आहे. एखाद्या व्यक्तीच्या शरीरातील रोगप्रतिकार यंत्रणा विषाणूच्या विरोधात चांगले संरक्षण देत असेल पण जर ती व्यक्ती अशा वातावरणात सतत राहत असेल जिथे विषाणूंचा वावर सर्वात जास्त असण्याची सर्वाधिक शक्यता असते तर त्या व्यक्तीला देखील संसर्ग होण्याची दाट शक्यता असते, इतकेच नव्हे तर ती व्यक्ती इतरांपर्यंत संसर्ग पोहोचवू शकते. आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांच्या बाबतीत हे घडू शकते. त्यांच्यापैकी जवळपास सर्वांचे लसीकरण पूर्ण झालेले आहे पण त्यांना दररोज, दिवसाचे अनेक तास रुग्णांच्या सहवासात काढावे लागतात, परिणामी विषाणूंचा संसर्ग होण्याची शक्यता त्यांच्या बाबतीत खूप जास्त असते.
बूस्टर डोस :
बूस्टर शॉट म्हणजे कोविड-१९ लसीचा अतिरिक्त डोस जो सर्व लोकांना दिला गेला पाहिजे. पहिल्या दोन डोसेसचे संरक्षण कमी पडत आहे असे दिसून आल्यास पुन्हा संरक्षण देणे हा बूस्टर डोसचा उद्देश असतो.
बूस्टर डोस कोणाला दिला जातो?
संपूर्ण जगभरात बूस्टर डोस सर्वांना दिला जात आहे, काम, व्यवसाय कोणताही असो हा डोस सर्वांना दिला जातो. १८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्ती आणि रोगप्रतिकार शक्ती कमी करणाऱ्या आजारांनी त्रस्त असलेल्या व्यक्ती बूस्टर डोस घेण्यासाठी पात्र असतात.
आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त इतर वयोगट जे सावधगिरी म्हणून अतिरिक्त डोस घेण्यासाठी पात्र मानले गेले आहेत त्यांच्याबद्दल समजून घेऊ. जसजसे वय वाढत जाते तसतशी शरीरातील रोगप्रतिकार शक्ती कमी होत जाते हे तर आपण सर्वजण जाणतोच. वाढते वय आणि त्यासोबत सहव्याधी देखील असतील तर संसर्ग होण्याचा धोका देखील वाढतो. साधारणपणे ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींची रोगप्रतिकार शक्ती क्षीण होऊ लागते. अर्थात याला अपवाद असलेल्या देखील अनेक व्यक्ती असतात. पण सर्वसाधारणपणे रोगप्रतिकार शक्ती कमी होत जाते. मधुमेह, कर्करोग, हृदय आणि रक्तवाहिन्यांचे विकार, स्टेम सेल ट्रान्सप्लांट, किडनी विकार किंवा डायलिसिसवर असणे, सिऱ्होसिस, सिकल सेल विकार या व्याधी असल्यास आणि दीर्घकाळापासून स्टिरॉइड्सचा किंवा इम्युनोसप्रेसेंट औषधांचा वापर करत असल्यास रोगप्रतिकार शक्ती कमी होते आणि त्यामुळे त्या व्यक्तीला विषाणूचा संसर्ग पटकन होण्याची शक्यता असते. अशा सहव्याधी असलेल्या वयस्क व्यक्तींना विषाणूंचा धोका सर्वात जास्त असतो, इतकेच नव्हे तर संसर्ग झाल्यास आजार गंभीर होत जाऊन मृत्यू ओढवण्याचाही धोका त्यांच्या बाबतीत खूप असतो.
जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून दिले जाणार असलेले लसीचे अतिरिक्त डोस हे फक्त काही समूहांसाठीच असणार आहेत. कदाचित भविष्यात देशात सर्वांना बूस्टर डोस देण्याबाबत सरकार विचार करू शकेल.
सध्या आपण सर्वांनी एक गोष्ट नक्की समजून घेतली पाहिजे, ती म्हणजे आपले अतिरिक्त लसीकरण झालेले असो अथवा नसो, आपण सर्वांनी अतिरिक्त सावधगिरी मात्र बाळगलीच पाहिजे. म्हणजेच आपण सर्वांनी कोविडपासून बचावासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना आणि खबरदारीचे पालन काटेकोरपणे केले पाहिजे. व्यक्तीचे लसीकरण झालेले असो किंवा नसो, मास्क वापरणे आणि सोशल डिस्टंसिंगचे पालन करणे अत्यावश्यक आहे, प्रत्येकाला संसर्गापासून वाचवण्याचा तो सर्वोत्तम मार्ग आहे. योग्यप्रकारे मास्क घालणे, हातांची स्वच्छता राखणे आणि सोशल डिस्टंसिंगचे पालन करून तुम्ही स्वतःला आणि तुमच्या आजूबाजूच्या सर्वांना या त्रासदायक विषाणूपासून वाचवू शकता.
(लेखक कन्सल्टन्ट पल्मोनोलॉजी, पी. डी. हिंदुजा हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटर, खार येथे कार्यरत आहेत.)