Angioplasty : शरीरातील कोणत्याही मुख्य धमनीमध्ये क्लॉटिंग किंवा गुठळीसारखा अडथळा निर्माण होणे वा हृदय किंवा फुफ्फुसांपर्यंत रक्तपुरवठा न होणे अशा समस्या असलेल्या व्यक्तीसाठी प्राणरक्षक ठरणारी अशी ही एक अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे. मात्र या प्रक्रियेचे अद्यापही असे अनेक पैलू आहेत जे लोकांना समजत नाहीत. इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट डॉ. मयुर जैन यांनी या प्रक्रियेशी निगडित भ्रामक समजूतींचे केलेले निरसन व तिच्या आरोग्याशी संबंधित बाजूंचे विश्लेषण.


अँजिओप्लास्टी म्हणजे काय?


अँजिओप्लास्टी ही एक नॉन-सर्जिकल अर्थात शस्त्रक्रियेविना, शरीराचा कमीत कमी छेद घेऊन केली (मिनिमली इन्व्हेजिव्ह) जाणारी प्रक्रिया आहे, जी ब्लॉक झालेल्या अरुंद झालेल्या धमन्या (आर्टरीज) आणि रक्तवाहिन्या खुल्या करते. या प्रक्रियेमध्ये सर्वसाधारणपणे रुग्णाला छेद घेण्याच्या जागेपुरता लोकल अॅनेस्थेशिया दिला जातो आणि मांडीतील फेमोरेल शिरेमार्गे एक अतिशय बारीक ट्यूब शरीरातील इप्सित ठिकाणी पोहोचवली जाते. या ट्यूबचे एक टोक म्हणजे एक हवा भरता येण्याजोगा ‘बलून’ असते.


जेव्हा ही ट्यूब (किंवा कॅथेटर) अडथळा असलेल्या निरूंद जागी किंवा ब्लॉकेजपर्यंत पोहोचते तेव्हा तुमचे डॉक्टर ती धमनी उघडण्यासाठी हा बलून फुगवू शकतात आणि रक्तप्रवाहामध्ये अडथळा आणणाऱ्या साचलेल्या थरांना बाजूला ढकलू शकतात. हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या हार्ट आर्टरीजच्या बाबतीत तिच्यामध्ये असा थर (प्लाक) जमा झाल्यास त्यामुळे बरेचदा हृदयाकडे आणि/किंवा हृदयाकडून होणाऱ्या रक्तपुरवठ्यावर मर्यादा येते, त्यामुळे बरेचदा या प्रक्रियेतून नव्याने खुल्या झालेल्या जागेला तसेच ठेवण्यासाठी एक स्टेन्टही बसविली जाते. 


अँजिओप्लास्टी कुणासाठी?


कोरोनरी आर्टरी डिजिज असलेल्या व्यक्तींचे हार्ट ब्लॉकेजेस दूर करण्यासाठी या प्रक्रियेचा सर्वाधिक प्रमाणात वापर केला जातो. 
मात्र, शरीराच्या इतर भागांतील जसे की मान, बाहू आणि पाय, किडन्या आणि पेल्व्हिस भागातील अरुंद झालेल्या इतर धमन्यांवरील उपचारांसाठीही त्यांचा वापर होऊ शकतो. या प्रक्रियेमुळे शरीरातिल अतिमहत्त्वाच्या अवयवांना अधिक प्रमाणात रक्तपुरवठा होतो आणि जेव्हा इतर निदानात्मक तपासण्यांतून एखाद्या ब्लॉकेजचे निदान होते तेव्हा तातडीने हस्तक्षेप करण्यासाठी बरेचदा ही प्रक्रिया वापरली जाते. 


उपचार: अँजिओप्लास्टीची पारंपरिक पद्धत परिणामकारक असली तरीही त्यात धमनी पुन्हा अरुंद होण्याची शक्यता असते. म्हणूनच कार्डिओलॉजीच्या क्षेत्रामध्ये विरघळणाऱ्या स्‍टेन्ट्सचा किंवा औषध सोडणाऱ्या (ड्रग एल्युटिंग) बलून्सचा वापर करणाऱ्या धातूविरहित अँजिओप्लास्टीसारख्या नाविन्यपूर्ण उपायांचा शोध लागताना दिसत आहे.


यातील नवीनतम शोध असलेले विघटनक्षम स्टेन्ट्स किंवा विरघळणाऱ्या स्टेन्ट्स पारंपरिक धातूच्या स्टेन्ट्सप्रमाणेच काम करण्याच्या दृष्टीने तयार करण्यात आले असले तरीही त्यात एक खूप महत्त्वाचा फरक आहे. हे स्टेन्ट्स कालांतराने हळूहळू हार्ट आर्टरीमध्ये विरघळून जातात आणि अखेर ही धमनी आपल्या मूळ स्थितीमध्ये परत येते. ही स्टेन्ट्स धमनीला कायमस्वरूपी जखडून ठेवत नसल्याने पारंपरिक धातूच्या स्टेन्ट्सशी संबंधित दीर्घकालीन धोका किमान पातळीवर आणला जाऊ शकतो किंवा अगदी नाहीसाही होऊ शकतो. 


उपचारांतील प्रगती: हार्ट अटॅकच्या रुग्णांच्या उपचारांमध्ये धातू-विरहित अँजिओप्लास्टी हा उपचारांसाठी पसंतीचा पर्याय म्हणून उदयास येऊ लागला आहे. एक कार्डिओलॉजिस्ट म्हणून मला खात्री आहे की धातूविरहित अँजिओप्लास्टी, बायेरिअब्जॉर्बेबल स्कॅफोल्ड्स (BRS)आणि ड्रग-कोटेड बलून्स (DCBs) साठी रुग्णांची काळजीपूर्वक निवड केल्यास धमनीमधील ब्लॉकेजेससाठी तत्काळ उपचारांची गरज आणि धमनी बरी होण्याचे दीर्घकालीन उद्दीष्ट यांच्यातील तफावत लक्षणीयरित्या कमी होण्यास मदत होऊ शकेल.


DCBs मुळे आपल्यासमोर उपचारांचे एक असे अभिनव धोरण उपलब्ध झाले आहे, जे समस्येच्या फैलावास प्रतिबंध करणारी औषधे थेट धमनीच्या भित्तिकांपर्यंत पोहोचवते आणि कायमस्वरूपी आधार (स्कॅफोल्ड) मागे न सोडता रेस्टेनॉसिसच्या समस्येचा प्रभावीपणे प्रतिबंध करते. या पद्धतीमध्ये हृदयविकाराची समस्या हाताळण्याच्या पद्धतीमध्ये क्रांतिकारी परिवर्तन घडवून आणण्याची हमी आहे, जी रुग्णांना अधिक सूक्ष्म स्तरावर काम करणारे आणि परिणामकारक उपचार देऊ करते. 


बरे होण्यासाठीचा कालावधी


अँजिओप्लास्टिमधून बरे होण्यासाठी हॉस्पिटलमध्ये अवघ्या काही तासांसाठी किंवा एका रात्रीपुरते वास्तव्य करण्याची गरज भासते. तुमचे डॉक्टर्स तुम्हाला घरच्या घरी देखभालीसाठी काही औषधे देतील आणि तुमच्या स्थितीनुसार आहारात किंवा जीवनशैलीमध्ये काही बदलांचा अंतर्भाव करण्याचा सल्ला तुम्हाला देतील. 


फायदे


ही प्रक्रिया पारंपरिक शस्त्रक्रियेच्या तुलनेत मिनिमली इन्व्हेसिव्ह आहे. कॅथेटर आत टाकण्यासाठी घेण्यात येणारा छेद बऱ्यापैकी लहान असतो आणि तो लगेचच बरा होतो. वैद्यकीय सेवा पुरविणारे गरज भासल्यास धमनी खुली ठेवण्यासाठी आत स्टेन्ट बसवू शकतात. वयोमानामुळे किंवा इतर आजारांमुळे शस्त्रक्रियेचा पर्याय उपलब्ध नसलेल्या रुग्णांना तुलनेने अधिक सुरक्षित पर्याय मिळू शकतो. लक्षात ठेवा, निरोगी हृदय हा निरोगी आयुष्याचा पाया आहे.


आपले हृदय कसे काम करते हे समजून घेत आणि त्याला निरोगी ठेवण्यासाठी सक्रियपणे पावले उचलत तुम्ही एक दीर्घ आणि उत्साही आयुष्य जगण्यासाठी स्वत:ला सक्षम बनवू शकता. तुम्हाला हृदयाच्या आरोग्याविषयी काही शंका असतील तर व्यक्तिगत सल्ल्यासाठी आपल्या कार्डिओलॉजिस्टबरोबर संवाद साधा.



(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )


ही बातमी वाचा : 


Lipstick Hacks : अरे देवा.. ओठांवर लावलेली लिपस्टिक लगेच गेली.. चिंता करू नका, 'या' टिप्सची मदत घ्या