Angarki Sankashti Chaturthi 2022 : आज गणेशभक्तांसाठी महत्त्वाची असणारी अंगारकी संकष्टी आहे. मंगळवारी चतुर्थी तिथी आल्यावर त्याला अंगारकी चतुर्थीचा म्हणतात. ही चतुर्थी अतिशय शुभ आणि फलदायी मानली जाते. हिंदू परंपरेनुसार चतुर्थी महिन्यात दोनदा येते. भगवान गणेशाचा जन्म चतुर्थी तिथीला झाला होता, म्हणून ही तिथी गणेशाला समर्पित आहे. अमावस्येनंतर येणार्‍या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला विनायक चतुर्थी आणि पौर्णिमेनंतर येणार्‍या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी म्हणतात. पण जर चतुर्थी तिथी मंगळवारी आली तर तिला अंगारकी चतुर्थी म्हणतात. यावेळी अंगारकी चतुर्थी वैशाख महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या तिसऱ्या तारखेला आहे म्हणजेच हा आज 19 एप्रिल 2022 रोजी आहे. अंगारकी चतुर्थीला 'संकष्टी चतुर्थी' असंही म्हणतात.


'अंगारकी चतुर्थी' हे नाव कसं पडलं?
अंगारकी चतुर्थीला गणेशाची विधिवत पूजा केली जाते आणि उपवास केला जातो. अंगारकी चतुर्थीला उपवास केल्याने वर्षभर चतुर्थी तिथीचे फळ मिळते आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात, असा समज आहे. अंगारकी चतुर्थीच्या दिवशी गणेशाचे स्वरूप चतुर्मुखी आणि चार हातांचे असते असे मानले जाते. गणेशाच्या या रूपाला 'संकटमोचन गणेश' म्हणतात. मंगळदेवाने श्री गणेशाचे तप केले होते, त्यावर प्रसन्न होऊन गणरायाने जी चतुर्थी तिथी मंगळवारी येईल, त्या दिवशी अंगारकी गणेश चतुर्थी म्हणून ओळखले जाईल, असे वरदान दिले होते. त्यामुळे मंगळवारी येणाऱ्या चतुर्थी तिथीला अंगारकी चतुर्थी म्हणतात.


संकष्टी श्री गणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त



  • चतुर्थी तिथी प्रारंभ : मंगळवार, 19 एप्रिल, संध्याकाळी 04:38 वाजता

  • चतुर्थी तिथी समप्ती : 20 एप्रिल बुधवारी दुपारी 01:54 वाजता

  • चंद्रोदयाची वेळ : 19 एप्रिल रात्री 09:50 वाजता

  • अभिजीत मुहूर्त : सकाळी 11:54 ते दुपारी 12:46 वाजेपर्यंत


अंगारकी संकष्टी चतुर्थी पूजा विधी
अंगारकी चतुर्थी व्रत करणार्‍यांनी ब्रह्म मुहूर्तामध्ये स्नान करावे. लाल रंगाचे वस्त्र धारण करा यामुळे मंगळ ग्रह अनुकुल राहील. यानंतर 'ॐ गं गणपतये नम:' मंत्राचा जप करत श्री गणेशाची प्रार्थना करा. चौरंगावर स्वच्छ लाल रंगाचं वस्त्र अंथरुण त्यावर गणपतीची मूर्ती किंवा फोटो ठेवा. आता गंगा जल शिंपडून संपूर्ण स्थान पवित्र करा. यानंतर फुलांच्या मदतीने गणपतीला जल अर्पण करा. मग लाल रंगांचं फूल, दुर्वा, जान्हवं, पानाचा विडा, लवंग, इलायची आणि गुळ, खोबरं ठेवा. यानंतर नारळ आणि प्रसादात मोदक अर्पण करा. गणपतीला दक्षिणा अर्पण करुन 21 मोदकांचा नैवेद्य दाखवा. सर्व सामग्री अर्पण केल्यानंतर धूप, दिवा आणि उदबत्तीने गणपतीची आरती करा.


श्री गणेश मंत्र
गजाननं भूत गणादि सेवितं, कपित्थ जम्बू फल चारू भक्षणम्।
उमासुतं शोक विनाशकारकम्, नमामि विघ्नेश्वर पाद पंकजम्।।


अंगारकी चतुर्थीची उपासना पद्धत


व्रत करणाऱ्या व्यक्तीने पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून गणेशाची पूजा करावी.
उपवास न करणाऱ्या व्यक्तींनीही गणेशाची पूजा करावी. 
श्री गणेशाला दुर्वा, धूप-दीप आणि मोदक किंवा लाडू यांसारख्या आवडत्या वस्तू अर्पण करा. यानंतर गणेश चालीसा, गणेश गणेश स्तोत्र किंवा गणेश अथर्वशीर्षाचे पठण करा. गणेशाच्या पूजेमध्ये तुळशीचा वापर करू नये.
पूजेच्या दिवसभर 'ॐ गं गणपतये नम:' या मंत्राचा जप करत राहा. यासोबतच उपवासाचे नियम पाळून तुम्ही फळेही खाऊ शकता.
चंद्र उगवण्यापूर्वीच गणेशाची आराधना करा.


 


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha