3rd May 2022 Important Events : मे महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व आहे. या दिनविशेषच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला इतिहासातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा देणार आहोत. मे महिन्यात सामाजिक, आर्थिक आणि दैनंदिन जीवनात त्या दिवसाचं महत्त्व नेमकं काय आहे हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात 3 मे चे दिनविशेष.
3 मे - अक्षय्य तृतीया
वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया ही हिंदू धर्मात अक्षय्य तृतीया म्हणून साजरी केली जाते आणि हा दिवस खास साडेतीन मुहूर्तांपैकी एक म्हणून पाळला जातो. यावेळी 3 मे रोजी अक्षय्य तृतीया आहे. या दिवशी केलेली सोने-चांदीची खरेदी अनेक पटीने लाभदायक ठरते.
3 मे - रमजान ईद
रमजान ईद हा मुस्लिम धर्मातील एक महत्त्वाचा धार्मिक सण आहे. याला ईद उल्-सगीर असेही म्हटले जाते. हिजरी कालगणनेनुसार नवव्या रमजान महिन्यात सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत उपवास केले जातात, ज्यांना रोजे पाळणे असे म्हणतात. रमजानचा पवित्र आणि शुभ महिना संपल्यावर चंद्रदर्शन होताच शव्वाल ह्या दहाव्या महिन्याचा प्रारंभ होतो. या दिवशी उपवासाचे पारणे फेडले जाते. या दिवसाला ईद अल्-फित्र असे म्हणतात.
3 मे बसवेश्वर जयंती
लिंगायत धर्माचे धर्मगुरु, विश्वगुरु महात्मा म्हणजेच बसवेश्वर यांचा जन्मदिन वैशाख शुद्ध तृतीया अर्थात अक्षय तृतीयेला झाला अशी धारणा असल्याने हा दिवस बसवेश्वर जयंती म्हणून साजरा केला जातो. त्यांचे अनुयायी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश या भागात हा दिवस विशेष उत्साहाने साजरा करतात.
3 मे परशुराम जयंती
हिंदू कॅलेंडरनुसार,परशुराम जयंती वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तिसऱ्या दिवशी साजरी केली जाते. या दिवशी भगवान विष्णूने पृथ्वीवरील अन्यायाचा नाश करण्यासाठी परशुराम म्हणून जन्म घेतला. वैशाख शुक्ल पक्षाची तृतीया अक्षय्य तृतीयेसह, भगवान परशुरामांची जयंती साजरी केली जाते. धर्मग्रंथानुसार भगवान परशुरामांचा जन्म प्रदोष काळात वैशाख महिन्यातील तृतीया तिथीला झाला होता. भगवान परशुराम हे भगवान विष्णूचे सहावे रूप मानले जाते. पुराणानुसार महर्षि जमदग्नींनी पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ केला आणि त्यानंतर देवराज इंद्राला प्रसन्न करून पुत्रप्राप्तीचे वरदान मिळाले, वैशाख शुक्ल तृतीयेला महर्षींची पत्नी रेणुका हिने परशुरामाला जन्म दिला. यावर्षी परशुराम जयंती 3 मे रोजी साजरी होणार आहे.
1897 : मराठी चित्रपटसृष्टीचे महर्षी भालजी पेंढारकर यांचा जन्म.
महर्षी भालजी पेंढारकर हे भारतीय चित्रपटसृष्टीचा पाया घालणाऱ्या चित्रकर्मींमधले अग्रणी चित्रपट दिग्दर्शक, निर्माते, पटकथालेखक, संवादलेखक आणि गीतकार होते. भालजी पेंढारकरांच्या बोलपटांच्या सुरुवातीलाच ‘बहु असोत सुंदर…’हे महाराष्ट्रगीत असे. चतुरंग प्रतिष्ठानचा जीवनगौरव पुरस्कार, अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचा चित्रभूषण पुरस्कार, गदिमा प्रतिष्ठानचा ग. दि. माडगूळकर पुरस्कार तसेच भारतीय चित्रपटक्षेत्रातल्या प्रदीर्घ कामगिरीसाठी त्यांना 1992 साली दादासाहेब फाळके पुरस्कार या चित्रपटसृष्टीतल्या सर्वोच्च सन्मानाने त्यांना गौरविण्यात आले. त्यांच्या साधी माणसं (1966) आणि तांबडी माती (1970) या चित्रपटांना सर्वोच्च मराठी चित्रपटांचे राष्ट्रीय पुरस्कार मिळाले.
1913 : दादासाहेब फाळके यांचा राजा हरिश्चंद्र हा पहिला भारतीय मूक चित्रपट प्रदर्शित झाला.
दादासाहेब फाळके यांनी दिग्दर्शित केलेला ’राजा हरिश्चंद्र’ हा पहिला भारतीय मूक चित्रपट प्रदर्शित होऊन भारतीय चित्रपट उद्योगाची सुरूवात झाली. भारताचा पहिला चित्रपट राजा हरिश्चंद्र सहा महिन्यांत पूर्ण करून तो मुंबईच्या त्यावेळच्या सँड्हर्स्ट रोडवरील नानासाहेब चित्रे यांच्या कोरोनेशन थिएटरमध्ये 3 मे 1913 रोजी प्रदर्शित केला. हा चित्रपट एकूण 23 दिवस चालला.
1939 : नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना केली.
1969 : भारताचे तिसरे राष्ट्रपती, शिक्षणतज्ज्ञ पद्मविभूषण आणि भारतरत्न डॉ. झाकीर हुसेन यांचे निधन.
भारताचे तिसरे राष्ट्रपती, एक ख्यातनाम शिक्षणतज्ज्ञ आणि भारत सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या सर्वोच्च अशा भारतरत्न पुरस्काराचे मानकरी (1963) होते. जर्मन भाषेमध्ये त्यांनी महात्मा गांधींचे चरित्र लिहिले, तसेच प्लेटोच्या रिपब्लिकचे उर्दूत भाषांतर केले. त्यांनी स्वयंशिक्षणावर भर देऊन नव्या शैक्षणिक कल्पना जामिआ मिल्लियामध्ये रुजविल्या. ते अलीगढ मुस्लिम विद्यापीठाचे कुलगुरू झाले. 1956 साली ते राज्यसभेवर निवडून आले. पुढे ते बिहारचे राज्यपाल झाले आणि नंतर उपराष्ट्रपती म्हणून निवडले गेले. 1967 मध्ये ते भारताचे राष्ट्रपती झाले. झाकिर हुसेन यांनी अनेक शैक्षणिक समित्यांवर काम केले. त्यांपैकी यूनेस्को, विद्यापीठ अनुदान आयोग, मध्यवर्ती माध्यमिक मंडळ, विद्यापीठीय शैक्षणिक आयोग ह्या काही महत्त्वाच्या संस्था होत. त्यांना अनेक परदेशीय आणि भारतीय विद्यापीठांनी डी. लिट्. ही सन्माननीय पदवी देऊन गौरविण्यात आले आहे. भारत सरकारने त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील कार्याचा यथोचित गौरव पद्मविभूषण (1954) हा पुरस्कार देण्यात आला.
1981 : हिंदी चित्रपट अभिनेत्री फातिमा रशीद ऊर्फ नर्गिस यांचे निधन.
हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री. नर्गिस यांनी मदर इंडिया या चित्रपटामधील राधाच्या भूमिकेसाठी अभिनय कौशल्याच्या वेगवेगळ्या छटा दाखविल्या. या चित्रपटातील राधाच्या भूमिकेसाठी त्यांना फिल्मफेअरचा ‘सर्वोत्तम अभिनेत्री’चा पुरस्कार मिळाला. या चित्रपटाचे ऑस्करसाठी नामांकनही झाले होते. 1958 मध्ये पद्मश्री पदवीने भारत सरकारने नर्गिस यांना सन्मानीत केले. हा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या पहिल्या भारतीय चित्रपट अभिनेत्री होत्या.
2006 : भाजपाचे जेष्ठ नेते, केंद्रीय मंत्री आणि राज्यसभा खासदार प्रमोद महाजन यांचे निधन.
प्रमोद व्यंकटेश महाजन हे मराठी भारतीय राजकारणी होते. मराठवाड्यासारख्या मागास भागात जन्मलेले प्रमोद महाजन हे महत्त्वाकांक्षी आणि आधुनिक जागतिक विचाराचे राजकारणी नेते होते.
महत्वाच्या बातम्या :