(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Viral Video : विद्यार्थ्यानं गायलेल्या 'चंद्रा' लावणीनं नेटकऱ्यांना लावलं वेड; अमृता खानविलकरकडून कौतुक, व्हिडीओ तुफान व्हायरल
चंद्रा हे गाणं गाणाऱ्या एका मुलाचा व्हिडीओ नुकताच सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
Viral Video : आपल्या नृत्यशैलीनं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) ही गेल्या काही दिवसांपसून तिच्या चंद्रा या चंद्रमुखी चित्रपटातील लावणीमुळे चर्चेत आहे. या लावणीनं संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं. या लावणीवरील डान्सचे व्हिडीओ सध्या अनेक नेटकरी सोशल मीडियावर शेअर करत आहेत. गायिका श्रेया घोषालनं गायलेल्या या गाण्याला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. चंद्रा हे गाणं गाणाऱ्या एका मुलाचा व्हिडीओ नुकताच सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओला कमेंट करुन अनेक नेटकऱ्यांनी गाणं गाणाऱ्या जयेश खरे या मुलाच्या आवाजाचं कौतुक केलं आहे. सहावी इयत्तेत शिकणाऱ्या या मुलाची सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे.
कृष्णा राठोड यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरुन जयेश खरे या विद्यार्थ्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओला त्यांनी कॅप्शन दिलं, 'श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय, करजगाव या शाळेत बदली झाल्यानंतर इयत्ता सहावीच्या वर्गावर गेलो. विद्यार्थ्यांची ओळख झाल्यानंतर त्यांच्यातील विशेष गुणांची तपासणी करत असताना जयेश खरे नावाच्या विद्यार्थ्यांनी एक अप्रतिम गाणं सादर केले. गाणं ऐकल्यानंतर पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांचं एक वाक्य आठवलं या मातीमध्ये अनेक प्रकारची रत्ने तुम्हाला सापडतील फक्त ती माती ढवळण्याची गरज आहे.'
पाहा व्हिडीओ:
व्हिडीओला कलाकारांच्या कमेंट्स
जयेश खरे या विद्यार्थ्याच्या या व्हायरल व्हिडीओला कलाकारांनी आणि नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. अभिनेत्री अमृता खानविलकरनं 'कमाल' अशी कमेंट करुन जयेश खरेच्या गाण्याचं कौतुक केलं. तर संगीत दिग्दर्शक अतुल गोगावलेनं, 'प्रचंड अभिमान आणि आनंद देणारा हा व्हिडीओ आहे.. धन्यवाद कृष्णा राठोड' अशी कमेंट या व्हिडीओला केली आहे.
चंद्रमुखी या चित्रपटानं प्रेक्षकांची पसंती मिळवली. या चित्रपटात अभिनेत्री अमृता खानविलकरसोबतच अभिनेता आदिनाथ कोठारे, अभिनेत्री मृण्मणी देशपांडे आणि समीर चौघुले या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली. या चित्रपटातील गाण्यांना आणि कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या :