Himachal Congress Candidate List: मंडीमध्ये कंगनाला तगडं आव्हान, काँग्रेसनं माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाला उतरवलं लोकसभेच्या रिंगणात
Himachal Congress Candidate List: हिमाचाल प्रदेशात काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली असून माजी मुख्यमंत्र्यांचा मुलगा लोकसभेच्या रिंगणात उतवरण्यात आला आहे.
Himachal Congress Candidate List: लोकसभा निवडणुकांसाठी (Lok Sabha Election) भाजपकडून (BJP) अनेक कलाकारांची वर्णी लागली असतानाच विरोधी पक्षाकडून त्यांना तगडं आव्हान देण्यात येतंय. भाजपकडून बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranuat) हिला हिमाचल प्रदेशातील मंडी या लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आलीये. त्यातच आता त्याच लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडूनही (Congress) उमेदवार घोषित करण्यात आलाय. पक्षाने हिमाचलमधील लोकसभेच्या चारपैकी दोन जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत.
हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री विक्रमादित्य सिंह यांच्या मुलाला काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे काँग्रेसकडून विनोद सुलतानपुरी यांना शिमला मतदारसंघातून तिकीट देण्यात आलंय. विनोद सुलतानपुरी हे भाजपचे उमेदवार सरेश कुमार कश्यप यांच्या विरोधात लढणार आहेत.
काँग्रेसने विक्रमादित्य सिंह यांना दिली उमेदवारी
मंडीच्या विद्यमान खासदार प्रतिभा सिंह यांनी आगामी निवडणूक लढवण्यास आधीच नकार दिला होता. त्यामुळे त्यांच्या जागी पक्षाला दुसरा उमेदवार निवडण्याची गरज निर्माण झाली होती. त्यातच त्यांचा मुलगा विक्रमाआदित्य सिंह हा पक्षासमोर दुसरा चांगला पर्याय तयार झाला. विक्रमादित्य सिंग यांच्या माध्यमातून काँग्रेस हायकमांड हिमाचल प्रदेशात सुरू असलेली गटबाजी कमी करण्याचा प्रयत्न करत असल्याचं म्हटलं जात आहे. त्याचवेळी हिमाचल प्रदेशातील सुख्खू सरकारचे अस्तित्वही 1 जून रोजी होणाऱ्या विधानसभा पोटनिवडणूक आणि निकालांवर अवलंबून आहे. दरम्यान विक्रमादित्य सिंह हे हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांचे सुपुत्र आहेत.
मंडीतून भाजपकडून कंगनाला उमेदवारी
हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातून भाजपने अभिनेत्री कंगना रणौतला उमेदवारी दिली आहे. सध्या ती मंडीमध्ये निवडणुकांच्या प्रचारात व्यस्त असल्याचं पाहायला मिळतंय. मागील अनेक दिवसांपासून कंगना राजकारणात येणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. त्यातच कंगनाच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळेही ती लोकसभेच्या रिंगणात येणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. त्यावर कंगनाला लोकसभेचं तिकीट मिळवत या संपूर्ण चर्चांना पूर्णविराम दिल्याचं पाहायला मिळालं.
हिमाचल प्रदेशात एकाच टप्प्यात निवडणुका होणार
हिमाचल प्रदेशच्या चारही जागांवर एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. 1 जून 2024 रोजी हिमाचल प्रदेशातील सर्व जागांसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. लोकसभा निवडणुकीव्यतिरिक्त हिमाचलच्या 6 विधानसभा जागांवर पोटनिवडणूकही होणार आहे,ज्यासाठी 1 जून रोजी मतदान होणार आहे.
ही बातमी वाचा :
Nita Ambani : अजय-अतुलच्या झिंगाटवर नीता अंबांनींनी धरला ठेका, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल