Vijay Kenkare In Sshhh....Ghabraycha Nahi Marathi Play: रत्नाकर मतकरींच्या लेखणीतून जन्मलेल्या रहस्यकथेला 'स्पेशल टच'; 'श्श… घाबरायचं नाही'मध्ये विजय केंकरेंचा नवा नाट्य प्रयोग
Vijay Kenkare In Sshhh....Ghabraycha Nahi Marathi Play: उत्कृष्ट लिखाण आणि दिग्दर्शनामुळे 'श्श… घाबरायचं नाही' नाटक सध्या चर्चेत आहे. आता या नाटकाला विजय केंकरेंचा 'स्पेशल टच' मिळणार आहे.

Vijay Kenkare In Sshhh....Ghabraycha Nahi Marathi Play: रत्नाकर मतकरी (Ratnakar Matkari) यांच्या लेखणीतून जन्मलेली रहस्यकथा आणि त्याला रंगभूमीवरील दृश्यरूप देणारा कल्पक, अनुभवी दिग्दर्शक म्हणजे विजय केंकरे (Vijay Kenkare). उत्कृष्ट लिखाण आणि दिग्दर्शनामुळे 'श्श… घाबरायचं नाही' (Sshhh....Ghabraycha Nahi) नाटक सध्या चर्चेत आहे. बदाम राजा प्रॉडक्शन प्रस्तुत या सादरीकरणात 'पावसातला पाहुणा' आणि 'जेवणावळ' या मतकरींच्या दोन गूढ कथांचं एक नाट्यमय रूप प्रेक्षकांसमोर उभं राहणार आहे. विजय केंकरे या नाटकाचं दिग्दर्शन करत असून त्यांचं गूढ कथांवरील प्रेम, तितक्याच प्रभावीपणे रंगमंचावर उतरवलेलं दिसतं.
विजय केंकरे सांगतात की, "रत्नाकर मतकरींच्या कथांमध्ये एक गूढ सच्चेपणा आहे, त्यात रोमान्स आहे, मानसशास्त्र आहे, चकवा आहे. त्याचं दृश्यरूपांतर करणं खूप मोठं आव्हान होतं. पण अभिनय, प्रकाश, संगीत आणि नेपथ्य यांचा समन्वय साधत आम्ही प्रेक्षकांना त्या कथांचा थेट अनुभव देण्याचा प्रयत्न केला आहे."
या सादरीकरणाचं वैशिष्ट्य म्हणजे, ते केवळ अभिवाचन स्वरूपात मर्यादित नसून, ते एक संपूर्ण दृश्यनाट्य म्हणून सादर केलं जात आहे. विशेषतः रहस्यभाव वाढवण्यासाठी केंकरे यांनी प्रकाशयोजना (शितल तळपदे), पार्श्वसंगीत (अजित परब), नेपथ्य (नीरज शिरवईकर), वेशभूषा (मंगल केंकरे), रंगभूषा (राजेश परब) यांचं कौशल्य वापरलं आहे.
विजय केंकरे यांचं रंगमंचाशी नातं अनेक दशके जुनं आहे. 'हा शेखर कोसला कोण आहे?', 'मास्टर माईंड', '2 वाजून 22 मिनिटांनी', 'यू मस्ट डाय' आणि 'अ परफेक्ट मर्डर' यांसारख्या नाट्यप्रयोगांमधून त्यांनी मराठी रंगभूमीवर सस्पेन्स आणि थ्रिलरची एक नवी लाट निर्माण केली आहे. त्यांच्या दिग्दर्शनात नाटक केवळ दृश्य माध्यम राहत नाही, तर तो एक संवेदनशील अनुभव बनतं.
या नाटकातील कलाकारांविषयी बोलताना ते म्हणतात, "पुष्कर श्रोत्री, डॉ. श्वेता पेंडसे आणि डॉ. गिरीश ओक या तिघांमध्ये एक विशेष रसायन आहे. हे कलाकार नुसते संवाद म्हणत नाहीत, ते कथेला जगवतात. मतकरींच्या लेखनातला गूढपणा आणि मानसशास्त्रीय गुंतवणूक ते प्रभावीपणे रंगमंचावर उलगडतात."
कोविड काळात याच कथांचं ऑनलाइन सादरीकरण केलं गेलं होतं. पण त्यातून जन्मलेली कल्पना आता एका पूर्ण सजीव नाट्यरूपात प्रेक्षकांसमोर येतेय. "हे केवळ वैयक्तिक वाचन नाही, तर सामूहिक अनुभव आहे," असं केंकरे म्हणतात.
'श्श… घाबरायचं नाही' नाटकाचा पुढील प्रयोग सादर होणार आहे. मतकरींच्या लेखनाच्या गूढतेशी नव्यानं नातं जोडणारी ही एक अनोखी संधी आहे आणि रंगभूमीच्या निष्ठावान प्रेक्षकांनी ती नक्की अनुभवायलाच हवी.
पाहा व्हिडीओ :























