मुंबई : अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), संजय दत्त (Sanjay Dutt), जॉन अब्राहम (John Abraham) यांच्यासोबत ‘विरुध्द’ (2005) आणि नंदिता दास ओम पुरी यांच्यासोबत ‘कगार’ (2003) या चित्रपटात झळकलेले ज्येष्ठ अभिनेते अमिताभ दयाल (Amitabh Dayal) यांचे आज पहाटे 4.30 वाजता हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मृत्यूसमयी ते 61 वर्षांचे होते.


त्यांच्या मृत्यूची पुष्टी करताना अमिताभ दयाल यांच्या पत्नी मृणालिनी पाटील (Mrunalinni Patil) यांनी एबीपी न्यूजला सांगितले की, ‘हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना 17 जानेवारी रोजी मुंबईतील नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. नंतर तपासणीत ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले. उपचारानंतर शनिवारी त्यांना डॉक्टरांनी कोरोनामुक्त घोषित केले होते. पण, आज पुन्हा एकदा त्यांना हृदयविकाराचा झटका आला, त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.’


‘या’ चित्रपटातही केलेय काम


अमिताभ दयाल यांनी ‘विरुध्द’ आणि ‘कगार’सारख्या चित्रपटांमध्ये काम करण्याव्यतिरिक्त ‘धूम’ (2001), ‘रंगदारी’ (2012), ‘ये दिल्लगी' (2013) या त्यांच्या पत्नी मृणालिनी पाटील दिग्दर्शित चित्रपटांमध्येही काम केले होते.


अभिनेते अमिताभ दयाल यांचा जन्म बिलासपूर, छत्तीसगड येथे झाला होता. अमिताभ दयाल यांचे काही नातेवाईक छत्तीसगडहून येण्याची वाट पाहत आहेत, त्यानंतर आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील, अशी माहिती त्यांची पत्नी मृणालिनी यांनी दिली.



हेही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha