Actress Alka Kubal : अभिनेत्री-निर्मात्या अलका कुबल (Alka Kubal) यांच्या लेकीचा विवाह सोहळा नुकताच थाटामाटात पार पडला. या लग्नसोहळ्यात अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती. अभिनेते मिलिंद गवळी (Milind Gawali) देखील या लग्नाला उपस्थित होते. ईशानीच्या लग्नांचं निमित्त साधत मिलिंद गवळी यांनी अलका कुबल यांच्यासोबतची एक आठवण शेअर केली.


मिलिंद गवळी आणि अलका कुबल यांनी अनेक चित्रपटात एकत्र काम केले आहेत. शिवाय या दोघांचे कौटुंबिक स्नेहसंबंध देखील आहेत. एकमेकांच्या कौटुंबिक कार्यक्रमात हे कलाकार हजेरी लावत असतात. ईशानीला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देताना एक पोस्ट लिहिली आहे. यात त्यांनी अलका कुबल यांचा एक किस्सा शेअर केला आहे.


काय लिहिलंय ‘या’ पोस्टमध्ये?


‘माणसाच्या आयुष्यात सगळ्यात मौल्यवान किंवा जीव की प्राण काय असेल तर ती असते "लेक". लेकी कशा पटकन मोठ्या होतात आणि एक राजकुमार येतो, दोघ उंच भरारी घेतात, आपण आनंदानं त्यांचं उडणं पहात राहायचं.


समीर आठले आणि अलकाताईची लेक ईशानी ती खरंच एक पायलेट आहे आणि तिचा विवाह ज्याच्याशी झाला निशांत वालिया तोसुद्धा पायलेटच आहे, म्हणजे खरंच ते आकाशात दोघेही भरारी घेतात.  ईशानी परदेशात विमान चालवायचं प्रशिक्षण घेण्यासाठी निघाली होती, तेव्हा मी तिला म्हणालो होतो एक दिवस मला तू जे विमान चालवतेस त्या विमानाने प्रवास करायचा आहे.  माझ्या काही स्वप्नांपैकी ते एक स्वप्न आहे.


लेकी जेव्हा अशा भरारी घेतात, यशस्वी होतात, त्यामागे आई-वडिलांचे खूप परिश्रम असतात, आईचे थोडे जास्तच.. मी आणि अलकाताई गेली वीस वर्ष एकत्र सिनेमांमध्ये काम करत आहोत. आमचे प्रोफेशनल रिलेशन तर आहेतच, पण त्यापेक्षाही फॅमिली रिलेशन जास्त आहेत.


ईशानी आणि कस्तुरीला मी त्यांच्या लहानपणापासून ओळखतो. अलका ताई आणि समीरने त्यांच्यावर जे संस्कार केले आहेत, ते मी अनेक वर्ष जवळून पाहात आलोय. आपण आदर्श ठेवावा असं हे दांपत्य आहे. दोघेही नवरा बायको कर्तृत्वाने खूप मोठे आहेत, पण माणूस म्हणून ते त्याच्यापेक्षाही अनेक पटीने महान आहेत. अनेक कुटुंबांना त्यांनी वर्षानुवर्ष पोसली सांभाळली आहेत.  अनेक वर्ष सिनेमांमध्ये काम करूनसुद्धा ते दोघं कधीही फिल्मी झाले नाहीत. कामानिमित्ताने सातत्याने दोघांना महाराष्ट्रभर फिरावं लागत होतं, पण एक घार जशी आपल्या पिल्लांवर आकाशातून नजर ठेवत असते, तसंच समीर आणि अलका ताईंनी दोन्ही मुलींकडे पूर्ण लक्ष देऊन त्यांना घडवलं.


अलकाताईचं एक उदाहरण मी माझ्या जन्मात कधी विसरणार नाही.  नागपूरला मराठा बटालियन या सिनेमाच्या शूटिंगला ईशानी आणि कस्तुरीला घेऊन आल्या होत्या. चित्रपटाचा कॅमेरामन समीरच होता. मुली लहान होत्या. शूटिंग संपवून आम्ही एअरपोर्टला निघालो होतो,


अर्ध्या रस्त्यावर अलकाताईनी गाडी वळवायला सांगितली, ज्या गेस्टहाऊस मध्ये आम्ही उतरलो होतो त्या गेस्टहाऊस मध्ये परत घ्यायला सांगितलं. माझं महत्त्वाचं काम राहील, जावंच लागेल गेस्टहाऊसवर.. अलकाताईंनी पटकन पन्नास-शंभर रुपये काढून प्रोडक्शनवाल्याला दिले.  मी विचारलं एवढ्यासाठी आपण का परत आलो? अलका ताईंचे उत्तर ऐकून मी थक्क झालो.


ताई म्हणाल्या, सकाळी दूध मागवलं होतं मुलींसाठी.. त्याचे पैसे द्यायचे राहून गेले होते.  मी म्हणालो त्यात काय एवढं.. अलकाताई म्हणाल्या, कोणी म्हणायला नको, अलका ताईंच्या मुलींचे दुधाचे पैसे आम्ही दिले म्हणून...’



हेही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha