Tv actress Crime News: चारित्र्यावर संशय, दागिनेही ठेवून घेतले, आईवडीलांशी बोलण्यास मज्जाव ; प्रसिद्ध TV अभिनेत्रीच्या सासरच्या मंडळींवर हिंसाचाराचा गुन्हा
लग्नानंतर अवघ्या दोन-तीन दिवसांतच पतीच्या वागण्यात बदल झाला. तो तिच्या कपड्यांवर आक्षेप घेऊ लागला आणि किरकोळ कारणांवरून वाद घालू लागला.

Tv Actress crime News: टीव्ही आणि चित्रपट अभिनेत्री अदिती शर्माने (वय 29) मुंबईतील गोरेगाव पोलीस ठाण्यात पती, सासू आणि नणंदाविरोधात कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी 31 जुलै रोजी तिचे पती अभिनीत विद्यानंद कौशिक, सासू उर्मिला कौशिक (वय 65) आणि नणंद कीर्ती कौशिक (वय 29) यांच्याविरोधात गोरेगाव पोलिसांनी गुन्हा (एफआयआर) नोंदविला आहे. अभिनेत्री अदितीने आपल्या तक्रारीत पती आणि सासरच्या मंडळींवर शारीरिक व मानसिक छळ, कौटुंबिक हिंसाचार, मारहाण, शिवीगाळ, चारित्र्यावर संशय घेणे तसेच तिच्या स्त्रीधनाचा गैरवापर केल्याचे आरोप केले आहेत.
नेमकं प्रकरण काय?
पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, जून 2021 मध्ये ऑनलाइन अभिनय वर्गादरम्यान अदिती आणि अभिनीत यांची ओळख झाली. त्यानंतर मैत्रीचे रूपांतर प्रेमसंबंधात झाले. दोन्ही कुटुंबांच्या संमतीने 12 नोव्हेंबर 2024 रोजी विवाह करण्यापूर्वी, सप्टेंबर 2024 पासून हे जोडपे गोरेगाव पश्चिम येथील एका फ्लॅटमध्ये लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते.
अभिनेत्री अदिती शर्माच्या म्हणण्यानुसार, लग्नानंतर अवघ्या दोन-तीन दिवसांतच पतीच्या वागण्यात बदल झाला. तो तिच्या कपड्यांवर आक्षेप घेऊ लागला आणि किरकोळ कारणांवरून वाद घालू लागला. तसेच, घरखर्चात मदत करण्याऐवजी पती तिच्याकडूनच पैसे घेत असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे.
शिवीगाळ, मानसिक छळाचे आरोप
अदिती शर्माने तक्रारीनुसार, 1 जानेवारी 2025 रोजी कॉफीवरून झालेला वाद शिवीगाळीपर्यंत पोहोचला. त्यानंतर पतीने तिच्या चारित्र्यावर संशय घेत, तिचे विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप केला. तसेच, तो नियमितपणे तिचा मोबाईल फोन तपासू लागला आणि वेगळ्या खोलीत झोपू लागल्याचे तिने म्हटले आहे. याशिवाय, तिला तिच्या आई-वडिलांशी बोलण्यासही मज्जाव करण्यात आल्याचा आरोप तिने केला आहे.
अदितीने सासूवर लग्नातील दागिने, ज्यामध्ये सोन्याची साखळी, अंगठ्या, हिऱ्याची अंगठी, मंगळसूत्र आणि बांगड्यांचा समावेश आहे, स्वतःकडे ठेवून वारंवार मागणी करूनही परत न दिल्याचा आरोप केला आहे.तसेच, वाद मिटवण्यासाठी सासू आणि नणंद घरी आल्या असता त्यांनी पतीची बाजू घेतली आणि आपला अधिक मानसिक छळ केल्याचाही आरोप अदिती यांनी केला आहे. या तक्रारीच्या आधारे गोरेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.






















