Prashant Damle Damodar Natyagruha : अभिनेते प्रशांत दामले यांचा उपोषणाचा इशारा, 100 वर्ष जुने नाट्यगृह वाचवण्यासाठी कलाकार रस्त्यावर उतरणार
Prashant Damle On Damodar Natyagruha : सोशल सर्व्हिस लीगचे दामोदर नाट्यगृह 1 नोव्हेंबर 2023 पासून पुनर्बांधणीच्या कारणांनी बंद आहे. या ऐतिहासिक नाट्यगृहाच्या जागी खासगी शाळेची वास्तू उभारण्याचा प्रस्ताव आहे. याविरोधात नाट्यकर्मींमध्ये नाराजी आहे.
Prashant Damle On Damodar Natyagruha : मुंबईतील 100 वर्षांचा इतिहास असलेले नाट्यगृह वाचवण्यासाठी आता रंगकर्मी सरसावले आहेत. परळसारख्या मराठमोळ्या भागात असलेले दामोदर नाट्यगृह वाचवण्यासाठी आता अभिनेते-निर्माते आणि अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले (Prashant Damle) यांनी कलाकारांसह उपोषणाचा इशारा दिला आहे.
मुंबईतील परळ येथे असणारे सोशल सर्व्हिस लीगचे दामोदर नाट्यगृह 1 नोव्हेंबर 2023 पासून पुनर्बांधणीच्या कारणांनी बंद आहे. या ऐतिहासिक नाट्यगृहाच्या जागी खासगी शाळेची वास्तू उभारण्याचा प्रस्ताव आहे. याविरोधात नाट्यकर्मींमध्ये नाराजी आहे. नाट्यगृह आहे त्याच जागी तब्बल 900 आसन क्षमतेचे असावे अशी मागणी करण्यात आली आहे. विधीमंडळाच्या अधिवेशनात या नाट्यगृहाच्या पुर्नबांधणीच्या कामाचे पडसाद उमटले. त्यानंतर अधिवेशनात नाट्यगृहाच्या तोडकामाला स्थगिती देण्याची घोषणा करण्यात आली. मात्र, सोशल सर्व्हिस लीगने मे महिन्यापासून पुन्हा तोडकाम सुरू केले आहे.
सोशल सर्व्हिस लीगच्या या निर्णयाचा नाट्य परिषदेने तीव्र निषेध केला आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी सांगितले की, ‘हा विषय सामोपचाराने सुटेल अशी अपेक्षा होती, मात्र तसे न होता स्थगितीला न जुमानता तोडकाम सुरू झाले आहे. याविरोधात सोशल सर्व्हिस लीगला पत्र लिहिले जाणार आहे. जर त्यांनी ऐकले नाही तर नाटय़गृह बचावासाठी कलाकारांना घेऊन रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा अभिनेते-निर्माते प्रशांत दामले यांनी दिला आहे.
दामोदर नाट्यगृहाची पुनर्बांधणी करताना पूर्वी पेक्षा लहान आणि त्या जागेवर दुसरी शाळेची वास्तू उभारली जात आहे. त्यामुळे नाट्यगृहाच्या चुकीच्या पुनर्बांधणी विरोधात आणि नाट्यगृह मोठं आणि अत्याधुनिक उभाराव, जुन्या संस्थांना, कलाकारांना कार्यालयं द्यावी या मागणीसाठी यापूर्वी सोशल सर्व्हिस लीगने आणि कलाकार मंडळी यांनी आंदोलन केलं होतं. मात्र प्रशासन दाद देत नसल्याने आता कलाकार मंडळी पुन्हा उपोषण करण्याचा तयारीत आहेत.
दामोदर नाट्यगृहाबद्दल जाणून घ्या...
परळच्या दामोदर नाट्यगृहात विविध समाजसंस्थांचे कार्यक्रम तसेच नाटकांच्या तालमीदेखील होत असे. लहान-मोठ्या कलाकारांसाठी ते हक्काचं व्यासपीठ होतं. मराठी मनोरंजनसृष्टी गाजवणाऱ्या अनेक रंगकर्मींच्या कारकिर्दीचं ते उमगस्थान आहे.
मुंबईतील सर्वात जुनं नाट्यगृह म्हणून दामोदर नाट्यगृहाची ओळख आहे. कामगार वर्गातील कलाकारांना हक्काचं व्यासपीठ मिळावं यासाठी सोशल सर्व्हिस लीगने 1992 मध्ये या नाट्यगृहाची उभारणी केली होती. मराठी मनोरंजनसृष्टीतील आघाडीच्या सर्वच कलाकारांनी या नाट्यगृहात आपली कला सादर केली आहे.