Holi 2022 Celebration : स्टार प्रवाहनवरील (Star Pravah) मालिका प्रेक्षक आवडीनं पाहतात. या मालिकेमधील कलाकारांच्या अभिनयाला तसेच मालिकेच्या कथानकाला प्रेक्षकांची पसंती मिळते. या मालिकांमधील कलाकार आता रंगामध्ये रंगणार आहेत.


रंगांची मनसोक्त उधळण करून आपापसातले सारे हेवेदावे विसरायला लावणारा सण म्हणजे होळी. मराठी परंपरा मराठी प्रवाह हे ब्रीदवाक्य जपणाऱ्या स्टार प्रवाहच्या मालिकांमध्ये होळी आणि धुळवडीचा जल्लोष पाहायला मिळणार आहे.


ठिपक्यांची रांगोळी (Thipkyanchi Rangoli) मालिकेत अप्पू आणि शशांकची लग्नानंतरची पहिलीच होळी आहे. कानेटकर कुटुंबात या खास दिवसाची खास तयारी करण्यात आली आहे. पुरणपोळीचा सुग्रास बेत तर आहेच. पण अप्पुच्या इच्छेखातर संपूर्ण कानेटकर कुटुंबाने राधा कृष्णाचं रूप धारण केलंय. छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधणाऱ्या कानेटकर कुटुंबात होळीच्या सणाला गोकुळ अवतरणार आहे असंच म्हणावं लागेल.


आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) मालिकेतही दरवर्षी प्रमाणे होळी आणि धुळवड साजरी होणार आहे. कोणताही सण असला की अरुंधतीची आधीपासूनच तयारी सुरू होते. इतकी वर्ष कुटुंबाच्या आनंदात आपला आनंद शोधणारी अरुंधती यंदा मात्र कोणत्याही बंधनात न अडकता आपल्या इच्छेनुसार सण साजरा करणार आहे.


यंदाचा होळीचा सण सहकुटुंब सहपरिवार (Sahkutumb Sahaparivar) मालिकेतील अंजी पश्यासाठी खास ठरणार आहे. रंगांची उधळण करत हे दोघही आपल्या प्रेमाची कबुली देणार आहेत. खरतर या क्षणाची सर्वांनाच उत्सुकता होती. त्यामुळे अंजी पश्याच्या नात्याला नवी कलाटणी मिळणार हे नक्की. अंजी पश्या प्रमाणेच रंग माझा वेगळा मालिकेतील दीपा आणि कार्तिकच्या आयुष्यातही पुन्हा प्रेमाचे रंग भरले जातील का हे मालिकेच्या पुढील भागांमधून पाहायला मिळेल.


मुरांबा (Murabba) मालिकेतही होळीचा जल्लोष पाहायला मिळणार आहे. रेवासोबत रंग खेळण्याची स्वप्न पाहणाऱ्या  अक्षयला योगायोगाने रमासोबत रंग खेळावा लागतो. त्यामुळे अक्षयवर कुणाच्या प्रेमाचा रंग चढणार याची उत्सुकता आहे.
 


मुलगी झाली हो, स्वाभिमान आणि सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतही होळीची धामधूम अनुभवायला मिळेल. तेव्हा पाहायला विसरू नका स्टार प्रवाहवरील मालिकांचे होळी विशेष भाग.


हेही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha