Punyashlok Ahilya Bai : अहिल्याबाई होळकर यांचे कर्तृत्व, सुजाणता आणि हिंमत या गुणांनी भारतीय इतिहासात आपला ठसा उमटवला आहे. या महान सम्राज्ञीचे गौरवगान करणार्या सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई’ (Punyashlok Ahilya Bai) या मालिकेत अहिल्याबाईंचे जीवन चरित्र प्रेक्षकांपुढे उलगडून दाखवले आहे. आपले सासरे मल्हारराव होळकर यांच्या भक्कम आधाराने त्यांनी समाजातील अनिष्ट रूढींना आव्हान दिले, लिंगभेदाचा विरोध केला आणि समाज कल्याणाची आणि विशेषतः स्त्री कल्याणाची कामे करून समाजात शांती प्रस्थापित करण्याचे महान काम केले.
त्यांच्या महान सामाजिक कार्याचे आणि आपल्या जनतेविषयीच्या त्यांच्या निःस्वार्थ भावनेचे गुणगान करत पुण्यश्लोक अहिल्याबाई या मालिकेतील कलाकार सांगत आहेत की, अहिल्याबाईंचे चरित्र हे त्या सर्वांसाठी किती प्रेरणादायक आहे आणि त्यांच्या कथेमधून त्यांना काय विशेष बोध मिळाला आहे.
मला खरोखर धन्यता वाटते : ऐतशा संझगिरी
अहिल्याबाईंची भूमिका करणारी ऐतशा संझगिरी म्हणते की, ‘महाराणी अहिल्याबाई होळकर हे भारतीय इतिहासातील एका महान व्यक्तिमत्व पडद्यावर जिवंत करण्याची संधी मला मिळाली याची मला खरोखर धन्यता वाटते. आपल्या काळाच्या खूप पुढे असलेल्या अहिल्याबाई होळकरांनी हे आपल्या जीवनातून सिद्ध करून दाखवले की, माणूस त्याच्या कर्तृत्वाने मोठा होत असतो; जन्माने नाही. त्या आमच्यासाठी प्रेरणामूर्तीच आहेत. हे व्यक्तिमत्व साकारण्याचा अनुभव खूप समृद्ध करणारा आहे. कारण त्यांच्या लोककल्याणाच्या कामाविषयीची प्रत्येक गोष्ट काहीतरी शिकवणारी आहे. मला तर त्यातून जीवनाला अर्थ देणारे असे बरेच काही गवसले आहे. त्यापैकी मला सगळ्यात जास्त भावलेली गोष्ट म्हणजे, त्यांची निःस्वार्थी वृत्ती. समाजाच्या कल्याणासाठी कुणी इतक्या निरपेक्षतेने काम करते हे पाहून आपण दिपून जातो. त्यांचे काही गुण स्वतःमध्ये देखील उतरवण्याचा माझा प्रयत्न असतो. आणि, मला ठामपणे असे वाटते की, आमच्या या मालिकेतून जवळजवळ 300 वर्षांपूर्वीची गोष्ट मांडलेली असली तरी त्यातील अनेक सामाजिक दूषणे आजही समाजात जिवंत आहेत. त्यामुळे आजच्या पिढीला देखील या मालिकेतून बोध घेण्यासारखे बरेच काही आहे.’
मराठा सम्राज्ञीची कहाणी सांगण्याचे काम करतोय : राजेश शृंगारपुरे
मल्हारराव होळकरांची भूमिका करणारा राजेश शृंगारपुरे म्हणतो, ‘आजच्या पिढीला मातोश्री अहिल्याबाई होळकर या अजिंक्य मराठा सम्राज्ञीची कहाणी सांगण्याचे काम आम्ही करत आहोत, ही आमच्यासाठी गौरवाची गोष्ट आहे. त्यांच्या जीवनचारित्रातून बरेच काही शिकण्यासारखे, प्रेरणा घेण्यासारखे, अनुसरण्यासारखे आहे. आपल्या लहानपणापासून समंजसपणा, वीरता आणि निर्धार हे गुण अहिल्याबाई होळकरांमध्ये दिसतात. त्यांच्या द्रष्टेपणामुळेच त्यांच्यातली एक सर्वसामान्य मुलगी पुढे जाता, आपल्या सासर्यांच्या म्हणजे मल्हारराव होळकरांच्या साहाय्याने एक महान शासक बनली. कोणताही चांगला विचार प्रत्यक्षात उतरवण्याचा त्यांचा निर्धार मला घ्यावासा वाटतो. त्यांनी महेश्वरी साडीचे उत्पादन सुरू केले, हा आपल्या इतिहासातील एक तेजस्वी अध्याय आहे. महेश्वरी साडीसाठी काम करताना त्या प्रांतातील स्त्रिया आत्मनिर्भर तर झाल्याच पण शिवाय माळवा प्रांताच्या आर्थिक विकासात हातभार लावून त्या सक्षम देखील झाल्या. अहिल्याबाईंनी खूप सुंदरपणे हे सिद्ध करून दिले की, साडी हे केवळ स्त्रीचे प्रतीक नाही तर तिची ताकद आहे. अहिल्याबाई सगळ्या पिढ्यांसाठी प्रेरणास्वरूप आहेत आणि भविष्यातही राहतील.’
त्या दैवत आहेत : गौरव अमलानी
खंडेरावाची भूमिका करणारा गौरव अमलानी म्हणतो की, ‘देवी अहिल्याबाई होळकर यांनी त्यांच्या अगदी लहानपणापासून आयुष्यभर जी लोककल्याणाची कामे केली त्यामुळे, आमच्यापैकी अनेकांचे तर त्या दैवत आहेत. मला तर या गोष्टीचे नवल वाटते की, 17व्या शतकात, जेव्हा स्त्रियांना स्वतःचा आवाज नव्हता, स्वतंत्र मत नव्हते, तेव्हा अहिल्याबाईंनी स्त्रियांवरील या अवाजवी मर्यादांच्या शृंखला झुगारण्याचा विचार केला आणि सामाजिक पातळीवर तसे करूनही दाखवले. इतरांच्या हक्कांविषयी, त्यांच्या सुखाविषयी इतकी तळमळ असणे आणि त्यासाठी सच्च्या उद्दिष्टाने लढा देणे हे फार महान कृत्य आहे. लहान वयात पती, मुलगा आणि पित्यासमान आधारस्तंभ असलेले सासरे यांच्या मृत्यूनंतर स्वतःचे दुःख पचवून त्यांनी आपले आयुष्य जनकल्याणासाठी वेचले. वैयक्तिक दुःखांच्या पलीकडे जाऊन लोकांची सेवा करण्याची ही वृत्ती त्यांच्याकडून घेण्याचा माझा प्रयत्न आहे. आपल्याला त्यांच्यासारख्या आणखी अनेक लोकांची गरज आहे.’
सामाजिक रूढी मोडीत काढणाऱ्या राणी : स्नेहलता वसईकर
गौतमाची भूमिका करणारी स्नेहलता वसईकर म्हणते, ‘अहिल्याबाई होळकर अशी स्त्री होती, जिने समाजाच्या भल्यासाठी अनेक सामाजिक रूढी मोडीत काढल्या. त्यांनी केलेला अपार त्याग तर माझ्या कल्पनेपलीकडचा आहे. त्यांचे असे मत होते की, प्रत्येकजण समानता आणि न्याय यासाठी पात्र आहे आणि जर कुणी खरा असेल, तर त्याने आपल्या सत्यासाठी लढले पाहिजे. ही एक गोष्ट मी त्यांच्या चरित्रातून शिकले आहे आणि माझ्या जीवनात ती अंगिकारण्याचा मी प्रयत्न करेन, ती म्हणजे अधिकारासाठी आवाज उठवणे.’
हेही वाचा :
- Entertainment News Live Updates 4 June : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!
- S. P. Balasubrahmanyam Birth Anniversary : ‘दक्षिणेतील रफी’ अशी ओळख, ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्येही कोरले नाव! वाचा एस. पी. बालासुब्रमण्यमबद्दल...
- Salman Khan Trolled : गिफ्ट देणाऱ्या चाहत्यालाच तोंड वाकडं करून दाखवलं! सलमान खान सोशल मीडियावर होतोय ट्रोल! पाहा Video