Premachi Goshta : 'प्रेमाची गोष्ट' (Premachi Goshta) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ही मालिका प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. टीआरपीच्या शर्यतीतदेखील ही मालिका पहिल्या पाचमध्ये आहे. आता या मालिकेत लगीनघाईला सुरुवात होणार आहे. सागर-मुक्ताच्या हळदीला दादूस हजेरी लावणार आहे.
'प्रेमाची गोष्ट' मालिकेत लगीनघाई!
'प्रेमाची गोष्ट' या मालिकेत मुक्ता आणि सागरच्या लग्नाची धामधूम सुरू आहे. सईवरच्या प्रेमाखातर दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. हो - नाही म्हणता म्हणता, मुक्ता सागर अखेर विवाहबंधनात अडकणार आहेत. दोन्ही कुटुंबाची मतं, रितीरिवाज वेगवेगळे असले तरी या दोन्ही कुटुंबांना जोडणारा दुवा म्हणजे सई. सईवरच्या याच प्रेमापोटी फक्त सागर आणि मुक्ता नाही तर गोखले आणि कोळी परिवार एकत्र येणार आहे.
सागर-मुक्ताच्या हळदीला दादूस लावणार हजेरी
आता कोळी म्हटलं की हळदीला धुमशान झालं नाही तर नवल. सागरच्या हळदीसाठी त्याच्या संपूर्ण कुटुंबाने जय्यत तयारी केली आहे. एरव्ही मॉडर्न अंदाजात दिसणारा सागर हळदीसाठी पारंपरिक कोळी वेशात दिसणार आहे. खास बात म्हणजे हळदी कार्यक्रमासाठी गायक दादूस हजेरी लावणार आहे.
हळदी कार्यक्रमात दादूस कोळी गाणी गाऊन धमाल करणार आहे. दादूसच्या धमाकेदार कोळी गाण्यांवर संपूर्ण परिवार ठेका धरणार आहे. तिकडे मुक्ताच्या हळदीसाठीही संपूर्ण गोखले कुटुंब एकत्र येणार आहे. मुक्ताला आशीर्वाद देण्यासाठी 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेतील कलाची आई म्हणजेच संगीता देखील खास हजेरी लावणार आहे. त्यामुळे मुक्ता-सागरच्या हळदीची रंगत द्विगुणीत होणार आहे. 'प्रेमाची गोष्ट' ही मालिका रात्री 8 वाजता प्रेक्षकांना पाहता येईल.
'प्रेमाची गोष्ट' मालिकेबद्दल जाणून घ्या...
'प्रेमाची गोष्ट' ही मालिकादेखील नात्यांची गुंफण आहे. चिमुकल्या सईवरच्या प्रेमापोटी दोन विभिन्न स्वभावाचे मुक्ता आणि सागर कसे एकत्र येतात आणि त्यांच्यातलं प्रेम कसं बहरत जातं हे सांगणारी सुंदर, तरल कथा म्हणजे 'प्रेमाची गोष्ट' ही मालिका आहे.
'प्रेमाची गोष्ट' या मालिकेत प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री तेजश्री प्रधान मुक्ता गोखले ही भूमिका साकारत असून राज हंचनाळे सागर कोळीच्या भूमिकेत दिसेल. यासोबतच शुभांगी गोखले, संजीवनी जाधव, अपूर्वा नेमळेकर, संजय शेजवळ, योगेश केळकर, उमेश घाडगे, सुप्रीत कदम आणि बाल कलाकार इरा पारवडे अशी दिग्गज कलाकारांची फौज मालिकेतून भेटीला येईल.
संबंधित बातम्या