मयुरी म्हणतेय स्पीक अप!, इन्स्टावरच्या व्हिडीओचं अनेकांकडून कौतुक
शीतल आमटे यांच्या मृत्यूने बसलेला धक्का पचवता येणं कठीण असल्याचं सांगत अभिनेत्री मयुरी देशमुखने इन्स्टाग्राम व्हिडीओद्वारे या घटनेमुळे तिला बसलेल्या धक्क्याला वाट मोकळी करुन दिली. स्ट्रेंथ या टर्मिनॉलॉजीला आपण खूप चुकीचं डिफाईन केल्याचं तिने म्हटलं.
मुंबई : लॉकडाऊनने अनेक वेगवेगळे दिवस आपल्या सगळ्यांना दाखवले. आता हळूहळू जीवन पूर्वपदावर येत असतानाच काही अघटित घटनांच्या बातम्यांनी मन सुन्न होतं. अशीच एक घटना काही दिवसांपूर्वी घडली. ती होती आमटे कुटुंबियांपैकी असलेल्या शीतल आमटे-करजगी यांची आत्महत्या. शीतल आमटे यांच्या आत्महत्येनं संपूर्ण महाराष्ट्र हळहळला. आमटे कुटुंबिय आणि शीतल यांच्यात मधल्या काळात वाद उद्भवले होते. मानसिक ताण आणि नैराश्यामुळेच शीतल यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक निष्कर्ष निघाला आहे. असं असतानाच अभिनेत्री मयुरी देशमुखने आपल्या एका इन्स्टाग्राम पोस्टद्वारे या घटनेमुळे तिला बसलेल्या धक्क्याला वाट मोकळी करुन दिली आहे.
अभिनेत्री मयुरी देशमुख हे नाव मराठी मनोरंजनसृष्टीला नवं नाही. लॉकडाऊन काळात तिचा जोडीदार आशुतोष भाकरे यानेही नैराश्याने राहत्या घरी आत्महत्या केली होती. तो दाखला मयुरीने दिला आहे. मयुरी या व्हिडीओत म्हणते, "शीतल आमटे यांच्या मृत्यूने बसलेला धक्का पचवता येणं कठीण आहे. कारण शीतल आमटे यांनी मधल्या काळात स्वत: माझ्याशी संपर्क साधला. त्यांनी स्वत: मला धीर दिला. त्यानंतर आमच्या फोन नंबर एक्स्चेंज झाले. आम्ही बोलू लागलो. आशुतोष असतानाही आमची ओळख नव्हती. पण त्याचे व्हिडीओज मी पाहात होते. त्यांनी नैराश्यातून बाहेर येण्यासाठी केलेली पेंटिंग थेरपी मी पाहिली होती. आशुलाही दाखवली होती. त्यानंतर आमच्यात चांगला परिचय झाला होता. असं असताना अचानक त्यांच्या जाण्याच्या बातमीने सगळं हादरुन गेलं आहे. शीतल यांचा तो व्हिडीओ पाहिल्यानंतर मी त्यांना फॉलो करत होते. अशाने त्यांचं जाणं हे मी माझा पर्सनल लॉस मानते."
View this post on Instagram
शीतल आमटे यांच्यासारख्या व्यक्तिमत्वाला आत्महत्या करावी वाटणं गैर आहेच. पण यावर विचार करताना मयुरी म्हणते, "डिप्रेशन आणि त्याची कारणं वेगवेगळी असतात. त्यात मी आता हात घालणार नाही. पण स्ट्रेंथ या टर्मिनॉलॉजीला आपण खूप चुकीचं डिफाईन केलं आहे. स्ट्रेंथ म्हणजे सगळ्या गोष्टी सहन करणं.. एखाद्या गोष्टीची जबाबदारी एखाद्या मोठ्या हुद्द्यावरच्या लोकांवर टाकून ते सगळं नीट करतील असं समज आपण असं करत असतो. पण स्ट्रेंथ काय असते, तर आपलं काहीतरी बिनसलं आहे ते बिनसलेपण समोरच्याला सांगता येणं याला स्ट्रेंथ म्हणतात. आपण ओके नाही आहोत हे समोरच्याला सांगता येणं.. ते आपण मान्य करणं याला स्ट्रेंथ म्हणतात. म्हणून आपल्याला एक असा माणूस हवा ज्याच्यासमोर आपण हे सगळं बोलू शकतो. त्याला सगळं सांगू शकतो. एकदा नाही अनेकदा. पण आपण हे बोलत राहायला हवं."
मयुरीच्या या व्हिडीओचं इंडस्ट्रीतल्या अनेकांनी कौतुक केलं आहे. दाद दिली आहे. स्पृहा जोशी, अद्वैत दादरकर आदी अनेकांनी मयुरीचा हा मुद्दा योग्य असल्याचं म्हटलं आहे.
Mayuri Deshmukh | अभिनेत्री मयुरी देशमुखचं जोरदार कमबॅक, हिंदी मालिकेतून नवा शुभारंभ