Majha Katta : सलग 10 वर्ष प्रेक्षकांना खळखळून हसवल्यानंतर 'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya) या कार्यक्रमाने प्रेक्षकांचा निरोप घेतला. पण त्याआधीच या कार्यक्रमाचा कॅप्टन ऑफ द शिप म्हणजेच डॉ. निलेश साबळे (Nilesh Sabale) याने हा कार्यक्रम सोडण्याचा निर्णय घेतला. निलेशच्या या निर्णयामुळे प्रेक्षकांना चांगला धक्का बसला होता. पण त्यावेळी निलेशने सध्या त्याच्याकडे इतर काही गोष्टी असल्याने कार्यक्रम सोडल्याचं सांगितलं होतं. आता लवकरच निलेश साबळे कलर्स मराठीवरील ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’ या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यानिमित्ताने त्याने माझा कट्टावर हजेरी लावली होती. 


यावेळी निलेश साबळे हवा येऊ द्या बंद होण्यामागची कारणं त्याचप्रमाणे त्याने या कार्यक्रमातून बाहेर पडण्याचा निर्णय का घेतला याविषयी खुलासा केला आहे. निलेशने हवा येऊ द्या कार्यक्रमातून निर्णय घेतल्यानंतर ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’ या कार्यक्रमाशी तो कसा जोडला गेला याविषयी देखील सांगितलं आहे. 


म्हणून 'चला हवा येऊ द्या'मधून बाहेर पडण्याचा निर्णय


निलेश साबळेला माझा कट्टावर हवा येऊ द्या मधून बाहेर पडण्याबाबत कारण विचारण्यात आलं. त्यावर बोलताना निलेशने सांगितलं की, 'आम्हाला सुरुवातीला सांगितला की कार्यक्रम काही महिन्यांसाठी बंद करावा लागेल. आम्हाला जानेवारीमध्ये हे सांगण्यात आलं. बरं जेव्हा सांगण्यात आलं तेव्हा महिने निश्चित नव्हते. त्यानंतर असं सांगितलं गेलं की, जानेवारीमध्ये बंद करुन ऑगस्टमध्ये पुन्हा सुरु करायचं. त्यामुळे 8 महिने कार्यक्रम बंद राहणार होता. माझं चॅनलवाल्यांशी बोलणं सुरु होतं. पण त्यांना तो स्लॉट हवा होता. त्यांनाही काही नवीन प्रयोग करायचे होते. त्यामुळे पुन्हा कधी सुरु होणार याची माहिती नव्हती. 8 महिने जरी घरी बसून राहिलं तरी करायचं काय हा प्रश्न होता.त्यामुळे मी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.'


‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’ कार्यक्रम कसा मिळाला?


‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’ हा कार्यक्रम कसा मिळाला यावर बोलताना निलेशने सांगितलं की, 'मी जेव्हा हवा येऊ द्या सोडलं तेव्हा मला केदार सरांचा फोन आला की, सध्या काही हातात आहे का? मी त्यांना सांगितलं सध्या मेजर असं काही नाही. तेव्हा ते म्हणाले अशी अशी कल्पना आहे तू करशील का. मग आमचं बोलणं झालं. शोचं नाव आम्हाला सुचत नव्हतं. तेव्हा सर म्हणाले तू नेहमी जो प्रश्न विचारतो तेच नाव आपण देऊन आणि ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’ या कार्यक्रमाची सुरुवात झाली.' 


ही बातमी वाचा : 


Ram Gopal Varma on Jai Ho Song : ऑस्कर विजेतं 'जय हो' गाणं ए.आर रेहमानचं नाहीच! राम गोपाल वर्मा यांचा मोठा खुलासा