Ram Gopal Varma on Jai Ho Song : ऑस्कर, ग्रॅमी, बाफ्टा अशा अनेक पुरस्कारांवर नाव कोरणारं 'जय हो' (Jai Ho) हे गाणं आजही तितकचं पसंतीस उतरतं. 2008 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आलेल्या 'स्लमडॉग मिलेनियर' या चित्रपटामधील हे गाणं ए.आर रेहमान (A.R Rehman) यांनी संगीतबद्ध केलं होतं. त्यावेळी या गाण्याला तुफान प्रसिद्धी मिळाली होती. पण नुकतच या गाण्याबबात दिग्दर्शक राम गोपाल वर्मा (Ram Gopal Varma) यांनी मोठा खुलासा केला आहे.
राम गोपाल वर्मा यांनी यावेळी या गाण्याचे अनेक किस्से देखील सांगितले आहेत. त्याचप्रमाणे ए.आर रेहमान आणि सुभाष घई यांच्यातील वादाचे नेमकं कारण काय होतं याचा देखील खुलासा त्यांनी यावेळी केला आहे. त्यामुळे राम गोपाल वर्मा यांनी नेमका काय खुलासा केला याविषयी सविस्तर जाणून घेऊयात.
'जय हो' गाणं ए.आर रेहमानचं नाहीच - राम गोपाल वर्मा
दिग्दर्शक सुभाष घई यांनी ए.आर रेहमानला युवराज या चित्रपटासाठी साईन केलं होतं. पण त्याचवेळी एका संगीताच्या ट्युनमुळे ए.आर रेहमान आणि सुभाष घई यांच्या कडाक्याचं भांडण झालं. राम गोपाल वर्मा यांनी नुकतच 'फिल्म कम्पेनियन'ला दिलेल्या मुलाखतीत या गाण्याबद्दल खुलासा केला आहे. त्यांनी म्हटले की, जेव्हा सुभाष घई यांनी रेहमानला संगीत तयार करण्यास सांगितले, तेव्हा त्याला इतर कामांमुळे ते जमले नाही. संगीत तयार करायला उशीर झाला आणि सुभाष घई रेहमानवर बरेच चिडले. त्यावेळी रेहमान लंडनला होते आणि त्यांनी सुखविंदरला एका गाण्याची ट्युन तयार करण्यास सांगितली.
पुढे त्यांनी म्हटलं की, जेव्हा ते लंडनवरुन परतले तेव्हा सुखविंदर सिंह यांच्या स्टुडिओमध्ये सुभाष घई भेटणार असल्याचे सांगितले. दिलेल्या वेळेनुसार सुभाष घई जेव्हा सुखविंदर सिंहच्या स्टुडिओत गेले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की, ए.आर. रहमानच्या जागी सुखविंदर सिंग यांनी ती ट्युन तयार केली आहे. तेव्हा त्यांनी सुखविंदरला याबाबत विचारणा केली आणि त्यांनी सांगितलं की मला रेहमानने ही ट्युन तयार करण्यास सांगितली आहे. त्याचवेळी रेहमानही स्टुडिओमध्ये पोहचला आणि त्या ट्युनबाबत सुखविंदरला विचारलं. तिथे त्यांनी सुभाष घई यांचं मत देखील विचारलं.
सुभाष घई आणि सुखविंदर यांच्यातील वाद
रेहमानच्या या गोष्टीमुळे सुभाष घई चांगलेच भडकले आणि त्यांनी ए.आरला म्हटलं की,मी तुला करोडो रुपये फी देतो, तुला संगीत दिग्दर्शक बनवले आणि सुखविंदरने बनवलेले म्युझिक तू मला देतोस? माझ्यासमोर हे बोलायची हिम्मत आहे का? जर मला सुखविंदरला साइन करायची असेल तर मी त्यालाच करेन. पण माझे पैसे घेऊन सुखविंदरला माझ्या चित्रपटाची ट्यून तयार करायला लावणारा तू कोण आहेस. इथूनच त्यांच्यातील वादाला सुरुवात झाली. त्यानंतर सुभाष घई यांनी युवराज चित्रपटात ती ट्युन वापरलीच नाही.
पुढे ए.आर रेहमानने 2008 मध्ये तीच ट्युन 'स्लमडॉग मिलेनियर' या चित्रपटासाठी वापरली आणि त्याला ऑस्कर पुरस्कार मिळाला. पण मुळात ती ट्युन सुखविंदर सिंगने तयार केली होती, असा मोठा खुलासा राम गोपाल वर्मा यांनी केला आहे.