Aadesh Bandekar Home Minister : आदेश बांदेकर (Aadesh Bandekar) यांचा 'होम मिनिस्टर' (Home Minister) हा कार्यक्रम गेल्या 19 वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. आता या कार्यक्रमाने 20 व्या वर्षात पदार्पण केलं आहे.  प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन करणाऱ्या या कार्यक्रमाची महाराष्ट्रभर क्रेझ आहे. या कार्यक्रमाने महाराष्ट्रासोबतच संपूर्ण भारतभरातील वहिनींचा सन्मान करून त्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटवलं आहे.


19 वर्षांचा प्रवास, हजारो एपिसोड, हजारो पैठण्या, कित्येक आठवडे, लाखो माणसं आणि आयुष्यभराच्या आठवणी असा हा प्रवास 'होम मिनिस्टर' या कार्यक्रमाने आणि महाराष्ट्राचे लाडके भाऊजी आदेश बांदेकर यांनी केला आहे. होम मिनिस्टर या कार्यक्रमाने आता 20 व्या वर्षात पदार्पण केलं आहे.


'होम मिनिस्टर'चा पहिला एपिसोड कुठे शूट झाला?


'होम मिनिस्टर'चा पहिला एपिसोड कुठे शूट झाला याबद्दल  एबीपी माझाशी बोलताना आदेश बांदेकर म्हणाले,"13 सप्टेंबर 2004 या दिवशी 'होम मिनिस्टर'चा पहिला एपिसोड लालबागमध्ये शूट झाला होता. हा दिवस माझ्यासाठी खूप महत्त्वाचा ठरला. महाराष्ट्राच्या घराघरांत्या माऊलींचा सन्मान, स्त्रिचा सन्मान एवढं एकच या कार्यक्रमाचं ब्रिदवाक्य होतं. 13 दिवसांसाठी सुरू झालेल्या या प्रवासाने आता विसाव्या वर्षात पदार्पण केलं आहे. महाराष्ट्राच्या घराघराने आदेशला माझा म्हटलं म्हणून हे विसावं वर्ष माझामध्येच आज साजरं होतंय यासारखा दुसरा आनंद नाही". 


'होम मिनिस्टर' या कार्यक्रमाची सुरुवात कशी झाली याबद्दल बोलताना आदेश बांदेकर म्हणाले,"एका दिवशी झी मराठीच्या ऑफिसमध्ये नितीन वैद्य केबिनमध्ये बसले होते आणि बाहेर काही महिला बसल्या होत्या. त्यावेळी मी पटकन त्यांना काहीतरी विचारलं आणि त्या सगळ्या जणी हसल्या. मोठ्याने कोण हसलं हे पाहायला नितीन वैद्य बाहेर आले आणि मला म्हणाले हे आता जसं हसण्याचं वातावरण झालं आहे तसं घरात जाऊन लोकांशी करशील का आणि कार्यक्रम सुरू झाला. 'होम मिनिस्टर' या कार्यक्रमाला महाराष्ट्राने आपलसं केलं आणि माझं चांगलं स्वागत केलं". 


पैठणीला ग्लॅमर मिळवून देण्याचं काम होम मिनिस्टर या कार्यक्रमाने केलं आहे. 'होम मिनिस्टर' या कार्यक्रमात जिंकणाऱ्या महिलेला पैठणीच का दिली जाते याबद्दल बोलताना बांदेकर म्हणाले,"होम मिनिस्टर हा कार्यक्रम सुरू होण्याआधी एक महिना सुचित्राने मला सांगितलं होतं की, आम्ही सगळ्या मैत्रिणी पैठणीसाठी बिशी काढतोय. त्यानंतर या कार्यक्रमाची चर्चा झाली तेव्हा मी सांगितलं की, महाराष्ट्राचं असं एक वस्त्र आहे ज्याची क्रेझ महिलांना आहे. सुरुवातीला प्रायोजकही नव्हते. 13 एपिसोडसाठी 13 पैठण्या विकत आणल्या होत्या". 


'होम मिनिस्टर' या कार्यक्रमात अगदी उच्चभ्रू कुटुंबापासून ते सर्वसामान्य कुटुंब सहभागी झाले आहेत. 'होम मिनिस्टर' या कार्यक्रमाच्या शूटिंगदरम्यान मी अशा किती तरी घरांमध्ये गेलो आहे तिथे बसायला बाकडा, खूर्चीही नव्हती. अगदी गॅसच्या सिलेंडरवर बसून शूट केलेलं आहे. औक्षण करताना कितीतरी घरांमध्ये माझ्या कपाळावर साखर लावली आहे आणि तोंडात तांदुळ घातलेत. पण ते कायमच मला नारळीभातापेक्षा गोड लागले आहेत". 


संबंधित बातम्या


Aadesh Bandekar : दुधीच्या रसाने जेव्हा जीव जाता जाता राहिला, तेव्हा वाटलं बाप्पा माझ्या पाठिशी; आदेश बांदेकरांनी सांगितला 'पुनर्जन्मा'चा किस्सा