Aadesh Bandekar On Kalavantancha Ganesh : गपणती बाप्पा (Ganapati Bappa) हा प्रत्येकासाठी स्पेशल असतो. आदेश बांदेकरांचंही (Aadesh Bandekar) बाप्पासोबत खूप छान नातं आहे. बाप्पाबद्दल एबीपी माझाशी बोलताना आदेश बांदेकर म्हणाले,"गणपती आणि माझं नातं खूप जिव्हाळ्याचं आणि अत्यंत प्रेमाचं, सन्मानाचं नातं आहे. मुळात बाप्पा हा माझा मित्र आहे. त्यामुळे कायम तो माझ्या सोबत असतो. आमच्या बांदेकर कुटुंबाचा गणपती असतो. 100 वर्षांहून अधिक काळ आमच्या बाप्पाला झाला आहे".
...अन् बांदेकरांना वाटलं बाप्पा माझ्या पाठीशी
आदेश बांदेकर म्हणाले,"बाप्पा माझ्या पाठीशी आहे, असं मला कायमच वाटतं. पण एकदा मी दुधीचा रस प्यायलो होतो. त्यानंतर माझे सर्व पॅरेमीटर हलले होते. रक्ताच्या उलट्या होत होत्या. डॉक्टरांनाही आता आमच्या हातात काही नाही, असं सांगितलं होतं. पण नंतर अचानक माझ्या शरीरातले सर्व पॅरेमीटर्स पुन्हा नॉर्मल झाले आणि मी डोळे उघडले. त्यावेळी बाप्पा माझ्या पाठीशी आहे, असं मला आणि माझ्या कुटुंबियांना वाटलं".
आदेश बांदेकर पुढे म्हणाले," काही दिवसांपूर्वी आमच्या घरातला साडे चौदा वर्षांचा सिम्बा (श्वान) हा आमच्या घरातलाच सदस्य आहे. अचानक त्याचं पोट दुखायला लागलं आणि लक्षात आलं त्याच्या पोटाला पिळ पडलाय. त्यानंतर त्याला तसचं उचललं आणि गाडीतून घेऊन गेलो पुढे त्याचं ऑपरेशन झालं. डॉक्टर बापटांच्या रुग्णालयात त्याला दाखल केलं आणि डॉक्टर वैभव पवार यांच्या रुपात आम्हाला गणपती बाप्पा पावला असं वाटलं. सिम्बा आता तो पुन्हा घरी आला असून बाप्पाचं आगमन काही दिवस आधीच आमच्या घरी झालं आहे".
गणेशोत्सवाबद्दल बोलताना बांदेकर म्हणाले,"अभ्युदयनगरमध्ये माझं बालपण गेलं. त्याच गणपती बाप्पाच्या मिरवणुकीत ढोल वाजवायचो. तसेच लालबागचा राजाही खूप जवळचा होता. मी दरवर्षी न चुकता लालबागच्या राजाच्या मिरवणुकीत अनंत चतुर्दशीला आजही जातो. याचं कारण दरवर्षी बाप्पाला मला ताठमानेनं सांगता येतं की, मी गेल्यावर्षी या चांगल्या गोष्टी केल्या आहेत आणि पुढच्या वर्षी आणखी चांगलं काम करण्याचा आशीर्वाद दे. जे करेन ते उत्तम करेन. त्यामुळे जगात कुठेही असलो तरी अनंत चतुर्दशीला मी लालबागच्या राजाच्या आणि अभ्युदयनगरच्या मिरवणुकीला असतोच".
आदेश बांदेकर पुढे म्हणाले,"माझे नैराश्येचे दिवस होते. यश मिळत नव्हतं. त्यावर्षी आमचा गणपती वाडोसला होता. रात्री घरातील सर्व मंडळी झोपली होती आणि साडे बारा वाजता हळूच मी बाप्पाच्या देवघरात गेलो. बाप्पा एकटा समईच्या प्रकाशात शांत बसलेला होता. त्यावेळी मी बाप्पाकडे पाहिलं आणि मनोभावे सांगितलं,"बाप्पा मी इतकी मेहनत करतोय पण काही घडत नाही. तू सर्व जानतोच. त्यामुळे मी काही मागणार नाही. पण मला चांगली सेवा करू दे. सेवा करण्यासाठी माझे हात बळकट कर, ताकद दे. त्यानंतर मी दुसऱ्या दिवशी मुंबईत आलो आणि दुरदर्शनवरुन फोन आला, की अनंत चतुर्दशीच्या विसर्जनाचं निवेदन आणि लाईव्ह रेकॉर्डिंग तुला करायचं आहे. त्यावेळी आमच्या घरीही फोन नव्हता. शेजारी राहणाऱ्या रहाटे काकुंच्या घरी फोन आला होता. हे बाप्पाच्या विसर्जनाचं लाईव्ह रेकॉर्डिंग हे माझं पहिलं लाईव्ह रेकॉर्डिंग आहे. त्यामुळे माझ्या यशात बाप्पा खूप लकी आहे".
सिद्धीविनायकाबद्दल बोलताना आदेश बांदेकर म्हणाले,"ज्या रांगेतून सिद्धीविनायकाचं दर्शन घ्यायचो आज त्याच मंडळाचा अध्यक्ष मला होता आलं आहे. हे माझ्यासाठी खूप भाग्याचं आहे. ज्यादिवशी उद्धव ठाकरेंनी मला फोन केला की, आदेश तुला अध्यक्ष म्हणून काम करायचं आहे. पण चपला जशी लोक बाहेर काढतात तसं तिथे गेल्यावर पक्ष, जात, धर्म काही न बघता जितक्या लोकांना मदत करता येईल तेवढी करायची. आज वैद्यकीय मदतीसाठी 60 कोटींपेक्षा अधिक रुपयांची मदत बाप्पाने माझ्याकडून करुन घेतली आहे. सिद्धीविनायक गणपती मंदीर आणि तो बाप्पा लाखो भाविकांचं श्रद्धास्थान आहे. हे भाविक जे दान टाकतात ते मानसातल्या देवासाठी खर्च करण्याचं भाग्य आम्हाला मिळालं आहे. त्यामुळे या भाविकांच्या एक-एक रुपयाच्या दानाचं मोल आहे".
आदेश भाऊजींचा आवडता मोदक कोणता?
आवडत्या मोदकाबद्दल बोलताना आदेश बांदेकर म्हणाले,"सुचित्राची आई म्हणजे आमच्या आक्का त्यांच्या हातचा मोदक फारच चविष्ट असतो. मला वाटतं, एकदातरी प्रत्येकाने या मोदकाची चव चाखली पाहिजे. या मोदकाचं आवरण प्रेमाच्या पीठाचं तर असतचं. पण आतमध्ये मनापासून भरलेलं मायेचं सारण असतं. या माऊलीच्या मोदकांची चव फार वेगळी आहे".
संबंधित बातम्या