Hindavi Patil on Nikki Tamboli Baii Song : बिग बॉसच्या घरातून (Bigg Boss Marathi New Season) अनेक गोष्टी सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यंदाच्या सीझनमधल्याही अनेक गोष्टी यावेळी सोशल मीडियावर व्हायरल झाल्याच पण अनेक कार्यक्रमांमध्येही त्यांना स्थान मिळालं. बिग बॉसमध्ये निक्की तांबोळी (Nikki Tamboli) आणि वर्षा उसगांवकर यांचा वाद अगदी पहिल्या आठवड्यापासूनच गाजला. याच भांडणात निक्कीचं 'बाई काय प्रकार' हे वाक्य खूप गाजलं. इकतच नव्हे तर यावर गाणं तयार करुन ते अनेक कार्यक्रमांमध्ये वाजलंही.
पण सध्या एका वेगळ्या कारणामुळे या गाण्याची चर्चा आहे. एका कार्यक्रमात नृत्यांगणा हिंदवी पाटील हिने हे गाणं थेट बंदच करायला सांगितलं. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत असून पुन्हा हे गाणं न वाजू देण्याचा इशाराही हिंदवीने यावेळी दिला असल्याचं पाहायला मिळतंय.
नेमकं काय झालं?
हिंदवी एका कार्यक्रमात लावणी सादर करत असताना ती माईकवरुन तिथे आलेल्यांशी संवाद साधत असते. त्यावेळी तिच्या मागे 'बाई काय प्रकार' हे गाणं वाजतं. सुरुवातीला जेव्हा हे गाणं वाजलं तेव्हा हिंदवी शांत राहिली. पण त्यानंतर मात्र हिंदवीने थेट इशाराच दिल्याचं पाहायला मिळालं. त्यावेळी हिंदवी म्हणते की, एक मिनिटं एक मिनिटं, हे पांचट बाई पुन्हा वाजवलं ना तर बाई मी वाजवणार परत. त्यामुळे या बाई गाण्यावर हिंदवीने तिचा संताप व्यक्त केल्याचं पाहायला मिळतंय.
बाई गाणं सोशल मीडियावर व्हायरल
दरम्यान बाई या गाण्यावर आतापर्यंत बरेच रिल झाल्याचं पाहायला मिळतंय. तसेच अनेकांना या गाण्यावर ठेका धरायलाय. पण आता हिंदवीने घेतलेल्या भूमिकेमुळे या गाण्यावरुन वाद होण्याची चिन्ह निर्माण झाली आहे.