Prajakta Mali : अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) ही लवकरच एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्राजक्ताचा फुलवंती हा सिनेमा येत्या 11 ऑक्टोबरपासून सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. पण त्याआधीच या सिनेमाचं शिर्षकगीत प्रेक्षकांच्या भेटीला आलंय. आर्या आंबेकर हिच्या आवाजात हे गाणं संगीतबद्ध करण्यात आलं आहे.
पेशवाईत लोककला आणि लोककलावंत ह्यांना मोठा राजश्रय मिळत होता. ह्याच काळात ‘फुलवंती’ आपली कला सादर करण्यासाठी मुघल दरबारात हजर झाली. ‘फुलवंती’ चे अस्मानी सौन्दर्य आणि आणि मनमोहक नृत्यकला ह्यांचे दर्शन आपल्याला ‘फुलवंती’ ह्या शीर्षकगीतातून होणार आहे.गीतकार वैभव जोशी, विश्वजित जोशी आणि स्नेहल तरडे ह्यांच्या लेखणीतून साकारलेले हे गीत आर्या आंबेकर हिच्या आवाजात संगीतबद्ध करण्यात आले आहे.
'हे एक मोठं आव्हान'
‘फुलवंती’ हा संगीतप्रधान ऐतिहासिक चित्रपट असून ह्या चित्रपतील सर्वात महत्वाची भूमिका ही संगीतदिग्दर्शकाची होती.म्हणूनच ‘फुलवंती’विषयी अविनाश-विश्वजित म्हणतात की ‘फुलवंती’ च्या गाण्यांमध्ये असणारी भव्यता, नजाकत, तो काळ आणि सुमधुर संगीत ह्यांचा मेळ साधणं हे एक मोठं आव्हान होतं.त्यासाठी केलेली मेहनत आजपासून प्रेक्षक अनुभवणार आहेत. ह्याची खूप उत्सुकता आहे. तसेच ही पखवाज आणि घुंगरांची जुगलबंदी प्रेक्षकांना नक्की आवडेल ह्याची आम्हाला खात्री आहे.
‘फुलवंती'..शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेली अलौकिक कलाकृती चित्रपटरुपात आपल्यासमोर अवतरणार आहे.या चित्रपटाचे संवाद लेखन प्रविण विठ्ठल तरडे यांचे असून दिग्दर्शन स्नेहल प्रविण तरडे करीत आहेत. चित्रपटाच्या छायाचित्रणाची जबाबदारी महेश लिमये यांनी सांभाळली आहे. कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, मंगेश पवार, श्वेता माळी, प्राजक्ता माळी चित्रपटाचे निर्माते आहेत. अमोल जोशी प्रोडक्शन, मुरलीधर छतवानी, रविंद्र औटी चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. सहाय्यक निर्माते विक्रम धाकतोडे आहेत. चित्रपटाच्या संगीत वितरणाची जबाबदारी पॅनोरमा म्युझिकने सांभाळली आहे.