मुंबई : 'कॉफी विथ करण' या शोमध्ये महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पंड्या आणि लोकेश राहुल यांना प्रत्येकी वीस लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. बीसीसीआयचे लोकपाल डी के जैन यांनी हे आदेश दिले आहेत.


हार्दिक आणि राहुल यांना ठोठावलेल्या 20 लाखातील दहा लाख हे शहीद झालेल्या निमलष्करी दलातील जवानांच्या कुटुंबीयांना द्यायचे आहेत. दहा कुटुंबांना प्रत्येकी एक लाखांची मदत करण्याचे आदेश लोकपालांनी दिले आहेत. तर उर्वरित दहा लाखांची रक्कम अंध क्रिकेट निधी आणि प्रसिद्धीसाठी देण्यासही सांगण्यात आलं आहे.

पुढील चार आठवड्यात दोघं दंडाची रक्कम देण्यास असमर्थ ठरल्यास सामन्यांच्या मानधनातून दंडाची रक्कम कापण्यात येईल, असंही लोकपालांनी स्पष्ट केलं. देशात क्रिकेटरकडे रोल मॉडेल म्हणून पाहिलं जात असल्यामुळे त्यांनी केलेल्या बेजबाबदार वक्तव्यांविषयी लोकपालांनी खंत व्यक्त केली.

काय आहे प्रकरण?

दिग्दर्शक करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' या शोमध्ये 25 वर्षीय हार्दिक पंड्या आणि लोकेश राहुल यांना बोलवण्यात आलं होतं. "एकच मेसेज अनेक मुलींना पाठवण्यात मला काहीच गैर वाटत नाही आणि मी त्या 'उपलब्ध' असण्याबाबत खुलेआम चर्चा करतो," असं हार्दिकने निर्लज्जपणे या शोमध्ये सांगितलं होतं.

मी अनेक तरुणींसोबत रिलेशनशीपमध्ये होतो आणि ही गोष्ट माझ्या पालकांनाही माहित होती, अशी कबुली हार्दिक पंड्याने शोमध्ये दिली होती. "जेव्हा मी कौमार्य गमावलं, त्यावेळी आई-वडिलांना 'आज मी करुन आलोय' असं सांगितलं होतं, असंही तो म्हणाला होता.

हार्दिक पंड्याविरोधात सोशल मीडियावर संतापाची लाट पसरली होती. बीसीसीआयने दोघांना ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरुन परत बोलावलं होतं. तर हॉटस्टारनेही 'कॉफी..'चा संबंधित एपिसोड हटवला होता.

आपली चूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर हार्दिकने एका ट्वीटच्या माध्यमातून खेद व्यक्त करत माफी मागितली होती. "कॉफी विद करणध्ये माझ्या टिप्पणीमुळे ज्यांची मनं दुखावली किंवा ज्यांना अपमानास्पद वाटलं त्या सर्वांची मी माफी मागतो. मी जरा जास्तच बोललो. मला कोणाच्याही भावना दुखवायच्या नव्हत्या." असं हार्दिक म्हणाला होता.

सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश डीके जैन यांची बीसीसीआयच्या लोकपालपदी नियुक्ती करण्यात आली होती. डीके जैन हे बीसीसीआयचे पहिले लोकपाल आहेत. बीसीसीआयमधल्या प्रशासकीय सुधारणांसाठी लोढा समितीच्या शिफारशीनुसार लोकपालाची नियुक्ती करण्यात आली होती. हार्दिक पंड्या आणि लोकेश राहुल यांच्या वक्तव्याची चौकशी डीके जैन यांनी चौकशी केली.