मुंबई : लोकप्रिय टीव्ही अभिनेता अनिरुद्ध दवेला (वय 36 वर्ष) 10 दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली आहे. मध्य प्रदेशच्या भोपाळमध्ये गेल्या काही दिवसांपासून वेब शोसाठी शूटिंग करणारा अनिरुद्ध दवेला 23 एप्रिल रोजी कोरोनाची लागण झाल्याची त्याने स्वत: सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती दिली होती. पण आता प्रकृती अधिक बिघडल्यामुळे अनिरुद्धला भोपाळच्या एका खासगी रुग्णालयाच्या आयसीयू वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती एबीपी न्यूजला मिळाली आहे.
टीव्ही अभिनेत्री आणि अनिरुद्धची चांगली मैत्रीण असलेल्या आस्था चौधरीने एबीपी न्यूजच्या या वृत्ताला दुजोरा देत म्हटले आहे की, भोपाळमधील एका वेब शोच्या शूटिंगच्या वेळी कोरोनाची लागण झाल्याने अनिरुद्धने स्वत:ला आयसोलेट केलं होतं आणि तो बरा होता. तो स्वत: ची काळजी घेत होता. परंतु दोन दिवसांपूर्वी सीटी स्कॅन केल्यानंतर असे दिसून आले की त्याच्या फुफ्फुसांमध्ये कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यानंतर अनिरुद्धला एका खासगी रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये दाखल करावे लागले आहे.
चाहत्यांना प्रार्थना करण्याचे आवाहन
आयसीयूमध्ये भरती झाल्याची बातमी मिळताच आस्थाने सांगितले की, अनिरुद्धची बहीण व मेहुणे दोघेही भोपाळ येथे पोहोचले असून आज त्याचा भाऊ नितीनही भोपाळला पोहोचणार आहे. तुम्ही सर्वजण अनिरुद्ध लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना करा, असं भावनिक आवाहन आस्थाने केलं. अनिरुद्ध दवे यावर्षी फेब्रुवारी महिन्यात वडील बनला आहे. लहान बाळामुळे पत्नी शुभी आहूजा भोपाळला जाऊ शकली नाही.
अनिरुद्धने आतापर्यंत काम केलेले चित्रपट आणि मालिका
अनिरुद्धने राजकुमार आर्यन, वो रहनेवाली महलों की, मेरा नाम करेगी रोशन, फुलवा अशा अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केले आहे. मालिकांमध्ये काम करण्याशिवाय अनिरुद्धने अक्षय कुमार आणि अनुष्का शर्मा स्टारर फिल्म 'पटियाला हाऊस' मध्येही काम केले होते. याशिवाय तेरे संग आणि शोरगुल सारख्या चित्रपटांमध्येही तो दिसला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Corona Vaccination : ...तर आपल्याला लसींची कमतरता भासली नसती : अजित पवार
- भारतातील कोरोना स्थिती भयावह, लॉकडाऊन लावणं गरजेचं; अमेरिकेचे वैद्यकीय सल्लागार डॉ. अॅन्थनी फाऊची यांचं मत
- Coronavirus Updates: देशात कोरोनाच्या रुग्णसंख्येचा नवा विक्रम, एकाच दिवसात चार लाख नव्या रुग्णांची भर तर 3523 जणांचा मृत्यू