मुंबई : केदार शिंदे दिग्दर्शित श्रीयुत गंगाधर टिपरे ही मालिका मराठी रसिक कधीच विसरणारे नाहीत. त्या मालिकेतल्या सगळ्या व्यक्तिरेखांनी मराठी मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. म्हणून, टिपरे आजोबा साकारणारे दिलीप प्रभावळकर, राजन भिसे, शुभांगी गोखले ही मंडळी तर लक्षात आहेतच. शिवाय, शलाका आणि शिऱ्यालाही लोक विसरले नाहीत. तरी शलाका पुढे तितकी दिसली नाही. मात्र शिऱ्या अधेमधे दिसत होता. आता मात्र हा शिऱ्या अर्थातच आपला विकास कदम कोविड वॉरिअर बनला आहे. अनेकांना माहीत नसेल पण त्याचं काम बघून अनेक लोक थक्क होतायत. शिवाय त्याचं कौतुकही करतायत. 


विकासने टिपरे केल्यानंतर हिंदीत आपलं स्थान निर्माण केलं. रोहित शेट्टी, अजय देवगण यांच्या सिनेमांच्या कोअर टिममध्ये विकास काम करत होता. सिनेमाची रेकी करण्यापासून अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या तो निभावत होता. विकास पुढे लोकांना दिसला तो सिंघममध्ये. लोकांनी त्याची ती भूमिकाही लक्षात ठेवली. आता मात्र तो कोव्हिड वॉरिअर बनला आहे. बीकेसीमध्ये त्याने कोव्हिड टेस्टिंग लॅब उभी केली आहे. कोणताही गाजावाज न करता विकास हे काम करत होता. गेल्या सहा ते आठ महिन्यांपासून तो हे काम करतोय. एबीपी माझाने त्याच्याशी संपर्क साधला असता, खरंतर या कामाचा गाजावाजा होऊ नये असंच त्याला वाटत असल्याचं त्याने बोलून दाखवलं. पण हे काम लोकांपर्यंत जाणं महत्वाचं असल्याचं पटवून दिल्यावर तो म्हणाला, खरंतर पहिली कोव्हिड लाट मी जवळून अनुभवली. त्यावेळीही मी सॅनिटायझर, मास्क मोठ्या प्रमाणात दिले. त्याबद्दल काम केलं. पण त्यानंतर माझ्या एका मित्राने फार्मा केलं आहे. त्यातून कोव्हिडची लॅब टाकायचं ठरलं. सगळ्या बाबींची पूर्तता केली आणि कोव्हिड टेस्टिंगची मशिनरी घेतली.


गेल्या जवळपास आठ महिन्यांपासून ही लॅब 24 तास चालू आहे. बांद्रा, कुर्ला इथली मुलं इथे काम करतात. त्यांना प्रशिक्षण देण्यात आलं आहे. अनेक मराठी मुलंही आहेत. कोव्हिडशी संबंधित टेस्ट करणे, त्याचे रिपोर्ट देणे असं अव्याहत चालू आहे. यामध्ये मलाही दोनदा कोव्हिड होऊन गेला आहे. आमच्या मुलांनाही हा संसर्ग होतोय. पण आमचा सगळा स्टाफ काम करतोय. कोव्हिडची लाट जशी वाढते तसा कामावर ताण येतो. पण हे काम महत्वाचं आहे याची जाणीव आमच्या प्रत्येक स्टाफला आहे. कारण टेस्ट करणारा प्रत्येकजण आतुरतेनं रिपोर्टची वाट पाहात असतो. '


विकासच्या या कामाचं कौतुक अनेक जण करतायत. रेल्वेत काम करणाऱ्या लोकांचे स्वॅब विकासच्या लॅबमध्ये येतात. शिवाय मुंबई पालिका कर्मचारी, पोलीस आदींचे स्वॅब विकासच्या बांद्र्यातल्या लॅबमध्ये येतात. सिनेसृष्टीतल्या अनेक कलाकारांनीही विकासच्या कामाचं कौतुक केलं आहे. अनेक कलाकारांना असलेली टेस्टची गरज लक्षात घेऊन विकासच्या टीमने ती गरज भागवली आहे. 


विकास या कामाबद्दल बोलताना म्हणतो, मला या कामाचा गाजावाजा करायचा नाहीय. गेले आठ महिने मी हे काम करतोय. माझी कसलीच अपेक्षा नाहीय. सध्या जी गरज आहे ती भागणं महत्वाचं. सिनेमा, त्यातून अभिनय हे कोव्हिड गेल्यानंतर करता येणार आहेच. पण आज लॅब असणं आणि टेस्ट करणं ही कामाची गरज आहे.