नवी दिल्ली: देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे आता रुग्ण संख्येची त्सुनामी येत असल्याचं दिसून येतंय. गेल्या 24 तासात देशात 4,01, 993 नव्या रुग्णांची भर पडली असून 3,523 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. शुक्रवारी देशात जवळपास तीन लाख रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. त्या आधी गुरुवारी देशात 3.86 लाख रुग्णांची भर पडली होती. कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. जगभरातील एकाच दिवशी वाढणाऱ्या रुग्ण संख्येपैकी 40 टक्के रुग्णसंख्या ही एकट्या भारतात वाढत असल्याचं समोर आलं आहे. 


देशातील आजची कोरोना स्थिती : 



  • एकूण कोरोनाबाधित रुग्ण : एक कोटी 91 लाख 64 हजार 969

  • एकूण कोरोनामुक्त रुग्ण : एक कोटी 56 लाख 84 हजार 406

  • एकूण अॅक्टिव्ह रुग्ण : 32 लाख 68 हजार 710

  • एकूण मृत्यू : 2 लाख 11 हजार 853

  • देशात आतापर्यंत लसीकरणाची आकडेवारी : 15 कोटी 49 लाख 89 हजार 635 डोस 


महाराष्ट्राची स्थिती
राज्यात कोरोनाची दुसरी लाट झपाट्याने वाढत असताना शुक्रवारी दिलासादायक बातमी आली आहे. शुक्रवारी तब्बल 69 हजार 710 कोरोना रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. राज्यात आजपर्यंत एकूण 38,68,976 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचेप्रमाण  84.06% एवढा झाला आहे. तर आज राज्यात 62,919 नवीन रुग्णांचे निदान झाले. दरम्यान आज 828 कोरोना बाधित रुग्णांनी आपला जीव गमावला. सध्या राज्यातील मत्यूदर 1.5% एवढा आहे.


तिसऱ्या टप्प्याच्या लसीकरणास आजपासून सुरुवात
देशातील कोरोना लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला आजपासून सुरुवात होणार आहे. या टप्प्यात 18 ते 45 वर्षामधील नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. या तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाचे रजिस्ट्रेशन 28 एप्रिलपासून सुरू झालं असून आतापर्यंत 80 लाखांहून अधिक लोकांनी आपल्या नावाची नोंद केली आहे. असं असलं तरी या देशभर राबवण्यात येणाऱ्या या तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाच्या कार्यक्रमासमोर काही अडचणी आहेत. महाराष्ट्र, दिल्ली, पश्चिम बंगालसहित देशातील 11 राज्यांमध्ये आजपासून या टप्प्यातील लसीकरणाला सुरुवात करता येणं शक्य नसल्याचं त्या राज्यातील सरकारांनी स्पष्ट केलं आहे. लसींची असलेली कमतरता हे यामागचे कारण सांगण्यात येतंय. 


महत्वाच्या बातम्या: