मुंबई : "भारतात सुरुवातीला तयार होणारी लस आधी परदेशात पाठवण्याची गरज नव्हती. जर ती पाठवली नसती तर आपल्याला लसींची कमतरता भासली नसती, असं माझं स्पष्ट मत आहे. पण जे झालं ते झालं. मात्र आता किमान तेवढ्याच प्रमाणात लस आयात करण्याची सोय करावी," असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी अजित पवार यांनी कौन्सिल हॉलला बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते.


अजित पवार म्हणाले की, जुलै-ऑगस्ट महिन्यात तिसरी लाट येण्याची शक्यता असल्याचं काही तज्ज्ञ सांगत आहेत. त्या अनुषंगाने राज्य सरकारने तयारी सुरु केली आहे. आता यावर नियंत्रण मिळवण्यासाठी लसीकरण महत्त्वाचं आहे. परदेशातून लस आयात करण्याची परवानगी केंद्र सरकारने दिली तर खूप बरं होईल. भारत बायोटेक आणि सीरम इन्स्टिट्यूट या दोन्ही कंपन्यांकडून लस बनवण्याची क्षमता पाहता, भारतातील लसीकरण व्हायला बराच कालावधी लागेल.


लसीकरणाचा चांगला परिणाम दिसत आहे. त्याचा उपयोग होत आहे. इतर देशातील आकडेवारी पाहता हे लक्षात येतं. इस्रायल हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. त्यामुळे हाच एक कार्यक्रम व्यवस्थित राबवावा लागेल. एकमेकांना मदत करुन लवकरात लवकर हे पार पाडूयात, असं अजित पवार म्हणाले.


"ही राजकीय टीकाटिप्पणी करण्याची वेळ नसल्याचं अजित पवारांनी सांगितलं. पण जे झालं ते झालं. आधी याला सामोरं जाऊ. नागरिकांचे प्राण महत्त्वाचे आहेत. त्यांचे जीव वाचवण्याला प्राधान्य देऊ," असं ते म्हणाले.


दरम्यान देशातील कोरोना स्थितीवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारत अनेक प्रश्न विचारले आहेत. त्यावर अजित पवार म्हणाले की, "देशात जी लस तयार होते, तो केंद्र सरकारच्या अखत्यारितील विषय आहे. त्याचं वाटपही केंद्र सरकार करते. न्यायालय देखील यावर लक्ष ठेवून आहे. तेही वेगवेगळे आदेश देत आहेत. न्यायालयाने गांभीर्याने घेतलं आहे. त्यामुळे सोशल मीडियामध्ये काय चर्चा सुरु आहे ती राहू दे."


अजित पवार पुढे म्हणाले की, "आधी परदेशात लस पाठवायची काय गरज होती? लस आधी परदेशात पाठवली नसती तर लसींची कमतरता भासली नसती. पण जे झालं ते झालं. मात्र आता किमान तेवढ्याच प्रमाणात लस आयात करण्याची सोय करावी."


कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शेवटचा उपाय म्हणजे लॉकडाऊन : अजित पवार 
15 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शेवटचा उपाय म्हणून लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या जास्त असेल तर बेड्सची कमतरता भासणार नाही.