Chala Hawa yeu Dya : 'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय विनोदी कार्यक्रम आहे. गेल्या 10 वर्षांपासून हा कार्यक्रम प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. 10 वर्ष निखळ मनोरंजन केल्यानंतर आता हा कार्यक्रम प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. आज या कार्यक्रमाचं शेवटचं शूटिंग पार पडणार आहे. 


'चला हवा येऊ द्या' हा कार्यक्रमाच्या पहिला एपिसोडचं 18 ऑगस्ट 2014 रोजी प्रसारण झालं होतं. अल्पावधीतच हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. 'चला हवा येऊ द्या'ने आपला वेगळा प्रेक्षकवर्ग निर्माण केला होता. आता हा कार्यक्रम बंद होत असल्याने चाहते नाराज झाले आहेत. 


'या' दिवशी प्रसारित होणार शेवटचा एपिसोड


'चला हवा येऊ द्या' हा कार्यक्रम 10 वर्षांपूर्वी अर्थात 2014 मध्ये सुरू झाला. कार्यक्रमात होणाऱ्या वेगवेगळ्या प्रयोगांमुळे हा कार्यक्रम नेहमीच लक्षवेधी राहिला. अनेक वाहिन्यांवर वेगवेगळे विनोदी कार्यक्रम आले असले तरी झी मराठीच्या (Zee Marathi) 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाची जागा कोणाला घेता आली नाही. आता या कार्यक्रमाच्या शेवटच्या एपिसोडची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. या कार्यक्रमाचा शेवटचा एपिसोड शूट करताना कलाकारांना अश्रू अनावर होतीलच. पण दुसरीकडे चाहत्यांचेही डोळे पाणावतील. 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाचा शेवटचा एपिसोड प्रेक्षकांना येत्या शुक्रवारी 15 मार्च 2024 रोजी पाहायला मिळणार आहे. 


10 वर्षांचा रंजक प्रवास अखेर थांबणार...


'चला हवा येऊ द्या' हा कार्यक्रम एकीकडे प्रेक्षकांचं मनोरंजन करत असला तरी टीआरपीच्या शर्यतीत मात्र हा कार्यक्रम मागे आहे. गेल्या आठवड्याच्या टीआरपी रिपोर्टनुसार हा कार्यक्रमाला फक्त 1.6 रेटिंग मिळाले आहे. सोनी मराठीवरील (Sony Marathi) 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) हा कार्यक्रम सुरू झाल्यापासून 'चला हवा येऊ द्या'च्या टीआरपीमध्ये घसरण होताना पाहायला मिळत आहे. अखेर आता 10 वर्षांनी हा रंजक प्रवास थांबणार आहे. 


टीआरपी अन् चॅनलची गणितं


TRP या तीन अक्षरांभोवती अख्खी टेलिव्हिजन इंडस्ट्री फिरतेय. टीआरपीमध्ये सध्या चांगलीच चूरस पाहायला मिळत आहे. टीआरपीवर चॅनलची गणितं अवलंबून असतात. 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाच्या टीआरपी रेटिंगमध्ये गेल्या काही दिवसांत घसरण होत आहे. त्यामुळे झी मराठी वाहिनीने हा कार्यक्रम बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. एकंदरीतच टीआरपीवर चॅनलची गणितं अवलंबून आहेत. 'चला हवा येऊ द्या' हा कार्यक्रम बंद होणार असल्याच्या चर्चा काही दिवसांकडून सुरू होत्या. पण 'हवा येऊ द्या'च्या टीममधील काही मंडळींना वाहिनीकडून किंवा प्रोडक्शन हाऊसकडून आज शूटिंगचा शेवटचा दिवस असल्याचं आणि कार्यक्रम बंद होणार असल्याचं सांगण्यात आलेलं नाही.  काही दिवसांपूर्वी डॉ. निलेश साबळेने हा कार्यक्रम सोडला होता. 


प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलेला कार्यक्रम


'चला हवा येऊ द्या' हा कार्यक्रम प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला आहे. डॉक्टर निलेश साबळे (Nilesh Sable), भाऊ कदम (Bhau Kadam), सागर कारंडे (Sagar Karande), श्रेया बुगडे (Shreya Bugde), कुशल बद्रिके (Kushal Badrike), भारत गणेशपुरे (Bharat Ganeshpure), अंकुर वाढवे हे विनोदवीर या कार्यक्रमाचा महत्त्वाचा भाग आहेत. थुकटरवाडी, पोस्टमन, 'होऊ दे व्हायरल','सेलिब्रिटी पॅटर्न','लहान तोंडी मोठा घास' असे अनेक पर्व, मराठीसह बॉलिवूड सिनेमाचं प्रमोशन अशा अनेक गोष्टींची प्रेक्षकांना आता आठवण येईल. पण तीन महिन्यांनी पुन्हा हा कार्यक्रम सुरू होणार असल्याचीही चर्चा आहे.


संबंधित बातम्या


Chala Hawa Yeu Dya : अखेर 'चला हवा येऊ द्या'घेणार प्रेक्षकांचा निरोप! सेटवरून आली मोठी अपडेट