Chala Hawa Yeu Dya Show Latest News : मागील 10 वर्षांपासून छोट्या पडद्यावर प्रेक्षकांना खळखळून हसवणारा कॉमेडी शो 'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu dya) आता प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची शक्यता आहे. सध्या या शोला 10 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने विशेष एपिसोड सुरू आहे. त्यानंतर आता हा शो ऑफ एअर जाणार आहे. 'चला हवा येऊ द्या'च्या ऐवजी नवीन मालिका सुरू होणार आहेत. मागील काही महिन्यांपासून 'चला हवा येऊ द्या' ऑफ एअर जाणार असल्याची चर्चा होती. 


'चला हवा येऊ द्या'चा कॅप्टन ऑफ द शिप असलेला डॉ. निलेश साबळे याने काही दिवसांपूर्वीच शो सोडला. त्यानंतर या मालिकेचे सूत्रसंचालन श्रेया बुगडे, कुशल बद्रिके करताना दिसले. काही दिवसांपूर्वीच कुशल बद्रिकेने देखील 'झी मराठी'चे आभार मानणारे पत्र लिहिले. त्यावेळी कुशल बद्रिकेही शो सोडणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. कुशल बद्रिके हिंदी रिएलिटी शोमध्ये झळकणार आहे. आता, 'चला हवा येऊ द्या' बंद होणार असल्याचे समजते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चला हवा येऊ देचे चित्रीकरण आता थांबवण्यात आले आहे. मात्र, हा शोमधील ब्रेक आहे की फायनल पॅकअप आहे, हे समजू शकले नाही. 


'चला हवा येऊ द्या' ऑफ एअर?


झी मराठीवर नव्या मालिका सुरू होणार आहेत. त्यामुळे 'चला हवा येऊ द्या' आता ऑफ एअर जाणार की त्याच्या वेळेत बदल करण्यात येणार हे अद्याप स्पष्ट करण्यात आले नाही. येत्या काही दिवसात वाहिनीकडून यावर भाष्य करण्यात येईल अशी शक्यता आहे.  


'झी मराठी'वर नव्या मालिका सुरू होणार


झी मराठीवर दोन नव्या मराठी मालिका सुरू होणार आहे. येत्या 18 मार्चपासून या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. ‘नवरी मिळे हिटलरला’ ही मालिका 18 मार्चपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रोज रात्री 10 वाजता ही मालिका प्रसारित केली जाणार आहे. या मालिकेची निर्मिती शर्मिष्ठा राऊत आणि तेजस देसाई यांनी केली. या मालिकेत राकेश बापट, वल्लरी विराज, शर्मिला शिंदे, भुमिजा पाटील, सानिका काशीकर यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. 


तर, 18 मार्चपासून  ‘पुन्हा कर्तव्य आहे’ ही मालिका सुरू होणार आहे. ही मालिका रात्री 9.30 वाजता दररोज प्रसारीत होणार आहे. अक्षय म्हात्रे आणि अक्षया हिंदळकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.


झी मराठीवर सुरू होणाऱ्या दोन्ही मालिका या रिमेक असल्याची चर्चा रंगली. पुन्हा कर्तव्य आहे’ ही मालिका हिंदीमधील ‘पुनर्विवाह’ मालिकेचा रिमेक आहे. तर, ‘गुड्डन तुमसे ना हो पायेगा’ या मालिकेचा रिमेक ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेच्या रुपाने मराठी छोट्या पडद्यावर येणार आहे.