मुंबई : कंगना रनौतच्या नादाला अलिकडे फार कलाकार लागत नाही. कुणीच काही बोलायच्या फंदात पडत नाही. सुशांतच्या आत्महत्येनंतर कंगनाने अनेक कलाकारांवर आरोप केले होते. अनेक मोठ्या कलाकारांची नावं घेत त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं होतं. पण तिच्या विरोधात कोणीही काहीही बोललं नाही. आता कंगना थलैवीच्या चित्रिकरणात व्यस्त आहे. पण तिथूनही तिने आपला हट्ट सोडला नाही. आता तिने आपला मोर्चा यू-ट्यूबर्सकडे वळवला आहे.
सुशांतच्या मृत्यूनंतर कंगनाने अनेक वक्तव्यं केली. त्यात तिने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, गृहमंत्री यांनाही सोडलं नाही. त्यावेळी मुंबई पालिकेने तिच्या ऑफिसचं अतिक्रमण पाडायचा घाट घातला. त्यावरून मोठा गदारोळ उडाला. त्यावेळी अनेकांनी अनेक बातम्या केल्या. त्यात वेगवेगळे यू-ट्यूबर आघाडीवर होते. कंगनाच्या मते या यू-ट्यूबर्सना मानधन मिळत असल्यामुळेच त्यांनी माझ्याविरोधात बातम्या केल्या. यात तिने ध्रुव राठीचं नाव घेतलं. तिने आता ध्रुव राठीला तुरुंगात डांबण्याचा विडा उचलला असण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. कंगनाने ट्वीट करताना सांगितलं की, 'माझ्या घराबाबत बीएमसीने नोटीस बजावल्याची चुकीची माहीती यू-ट्यूबर्सनी दिली. ध्रुव राठीही त्यात होता. अशी बातमी देण्यासाठी त्याला 60 लाख रुपये देण्यात आले. मी ठरवलं तर मी त्याला तुरुंगात टाकूच शकते.' असं ती म्हणते.
कंगनाच्या या वक्तव्यानंतर मात्र अनेक यू-ट्यूबर्स नाराज झाले आहेत. बातमी देणं आमचं काम आहे. आमची एखादी बातमी जेव्हा आम्ही देतो तेव्हा अत्यंत खात्रीलायक सोर्स त्यात असतात. कंगनाने ज्या चॅनलवर अनेक गोष्टी मांडल्या, त्या चॅनलचा काळा कारभारही लोकांसमोर आला. त्यांच्यावर अशी कारवाई होत नाही. पण आम्ही एकटे असल्यामुळे अशा पद्धतीचा धाक दाखवला जातो, असं त्यांचं म्हणणं आहे. असं म्हणतानाही कुणीही नावानिशी पुढे आलेलं नाही. यातूनच कंगनाचा दरारा आणि तिच्या पाठिशी असलेलं पाठबळ यांचा अंदाज येतो.
कंगनाच्या वक्तव्यांनी ती नेहमीच चर्चेत असते. सुशांतच्या मृत्यूनंतर तिने सातत्याने महेश भट, आदित्य चोप्रा, करण जोहर यांच्यावरही टीका केली. पुढे रणवीर सिंग, रणबीर कपूर, विकी कौशल यांच्यावरही तिने शालजोडीतून टीका केली. बॉलिवूड कशा पद्धतीने अमली पदार्थांच्या विळख्यात आहे, याचे दाखलेही तिने दिले. काही वर्षांपूर्वी आपणही कसे असे पदार्थ सेवन करत होतो, हे तिनं सांगितलं. सुशांतचा मृत्यू ही हत्याच असल्याचं सांगत तिने अनेक सन्माननीय पदावरच्या लोकांचा एकेरी उल्लेख करत अपमानजनक टिप्पणी केली होती.
महत्त्वाच्या बातम्या :