मुंबई : गेल्या 15 महिन्यांपासून लॉकडाऊन चालू आहे. मनोरंजन क्षेत्र थांबलं आहे. मधल्या काळात काही प्रमाणात चित्रिकरणं सुरु झाली. पण त्यावरही आता मर्यादा आल्या आहेत. मराठी चित्रपटसृष्टीची पालकसंस्था म्हणून अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाकडे पाहिलं जातं. म्हणूनच अमिताभ बच्चन, माधुरी दीक्षित, रितेश देशमुख आदींनी चित्रपट महामंडळाला भरघोस मदत केली. पण ही मदत राज्यभर पोचलीच नाही. उलट केवळ आपल्या हितचिंतकांपुरतीच ती मदत देण्यात आली असा आरोप राष्ट्रवादी पक्षाचे चित्रपट, साहित्य, कला, सांस्कृतिक विभागाचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी एका पत्राद्वारे केला आहे. 


आतापर्यंत करण्यात आलेल्या या सगळ्या मदतीचा हिशेब देण्याची मागणी बाबासाहेब पाटील यांनी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्याकडे केली आहे. त्याचवेळी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावत हा प्रसिद्धीचा स्टंट असल्याचं म्हटलं आहे. 


एबीपी माझाशी बोलताना बाबासाहेब पाटील म्हणाले, "गेल्या लॉकडाऊनपासून चित्रपट महामंडळाला मदत होते आहे. अनेक कलाकारांनी ही मदत केली आहे. यात अमिताभ बच्चन, रितेश देशमुख, माधुरी दीक्षित, निर्माते पुनीत बालन आदींनी मदत केली. महामंडळाने ही किती मदत झाली ती जाहीर करावी. इतकंच नव्हे, तर चित्रपट महामंडळाची शाखा केवळ मुंबई आणि पुण्यात नाहीय. कोल्हापूर, नाशिक, सातारा, औरंगाबाद, जळगाव आदी महाराष्ट्रभर या शाखा आहेत. इथे सगळीकडे सदस्य आहेत. गरजवंत आहेत. इथे कुणालाच ही मदत झालेली नाही. केवळ मुंबई-पुण्यातल्या लोकांना मदत करण्यात महामंडळाने धन्यता मानली आहे." 


कलाकार, तंत्रज्ञांना रेशन किटचे वाटप झाल्याचं सांगितलं जातं, पण हे वाटप कधी, कुणाकुणाला झालं ते कळायला हवं अशी मागणी पाटील यांनी केली. यासंदर्भात त्यांनी एक पत्र लिहिले असून, ते उपमुख्यमंत्री अजित पवार आणि धर्मादाय आयुक्तांना पाठवून दिलं आहे. यासंदर्भात आपण अजित पवार यांची गुरुवारी भेट घेणार आहोत, असंही पाटील यांनी यावेळी सांगितलं. 


या आरोपांबाबत चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, "हा केवळ प्रसिद्धीसाठीचा स्टंट आहे. पाटील यांनी कलाक्षेत्रात राजकारण आणू नये. महामंडळाने केलेली सगळी मदत ही रीतसर आहे. महामंडळाच्या कार्यालयातून याची सगळी माहिती संबंधितांना मिळू शकते. शिवाय, झालेली सर्व मदत बॅंकेतूनच झाली आहे. त्याचे सर्व दाखले महामंडळात आहेत. झालेल्या या आरोपाची महामंडळ गांभीर्याने दखल घेणार आहे आणि यापुढील कार्यवाही आम्ही कऱणार आहोत."


महत्वाच्या बातम्या :