Google Doodle Today : गुगलने आपल्या डूडलच्या माध्यमातून आज अमेरिकन समलैंगिकांच्या अधिकारासाठी लढणाऱ्या फ्रॅंक कामेनी यांना अनोखी मानवंदना दिली आहे. गुगलने फ्रॅंक कामेनी यांचा फोटो डूडलवर शेअर करताना त्यांच्या गळ्यात एक रंगीबेरंगी फुलांची माळ असल्याचं दाखवलं आहे. फ्रॅंक कामेनी यांची आणखी ओळख म्हणजे ते एक प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ होते, तसेच त्यांनी दुसऱ्या महायुद्धात भाग घेतला होता. 

 

एलजीबीटी समुदायाच्या हक्कांसाठी लढणाऱ्या फ्रॅंक कामेनी यांचा जन्म 21 मे 1925 साली न्यूयॉर्क या शहरात झाला. त्यांनी हॉवर्ड विद्यापीठातून खगोलशास्त्राची डॉक्टरेट घेतली. अमेरिकन सरकारच्या खगोल शास्त्र विभागात नोकरीला लागलेल्या फ्रॅंक कामेनी यांना समलैंगिक असल्याच्या कारणावरुन नोकरीवरुन काढून टाकण्यात आलं. 

फ्रॅंक कामेनी यांच्या मनावर या घटनेचा मोठा परिणाम झाला. त्यामुळे त्यांनी समलैंगिक लोकांच्या अधिकारासाठी लढण्याचा निर्णय घेतला. 1961 साली त्यांनी समलैंगिकांच्या अधिकारासाठी त्यांनी पहिल्यांदा आंदोलन केलं. 

फ्रॅंक कामेनी यांनी अमेरिकन सायकियॉट्रिक असोसिएशनच्या समलैंगिकता हा मानसिक विचार असल्याच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान दिलं. त्यानंतर अमेरिकन सिव्हिल कमिशनने एलजीबीटी कर्मचाऱ्यांवर लावण्यात आलेले निर्बंध मागे घेतले. 

समलैंगिक असल्याच्या कारणावरुन नोकरीवरुन काढून टाकल्याने अमेरिकन सरकारने फ्रॅंक कामेनी यांची 2009 साली पहिल्यांदाच माफी मागितली. 2010 साली फ्रॅंक कामेनी यांच्या सन्मानार्थ न्यूयॉर्कमधील एका रस्त्याचं नाव 'फ्रॅंक कामेनी वे' असं ठेवण्यात आलं. वयाच्या 86 व्या वर्षी फ्रॅंक कामेनी यांचा मृत्यू 2011 साली झाला. 

महत्वाच्या बातम्या :