Dnyaneshwar Mauli : 'ज्ञानेश्वर माऊली' (Dnyaneshwar Mauli) या मालिकेने प्रेक्षकांना भक्तिरसात तल्लीन केलं आहे. संतांची परंपरा उलगडणारी ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. आता या मालिकेत संत कान्होपात्रा ही व्यक्तिरेखा अभिनेत्री तितिक्षा तावडे (Titeeksha Tawde) साकारणार आहे.
माउली आणि त्यांची भावंडं यांचे चमत्कार, रेड्यामुखी वेद, श्रीसार्थ ज्ञानेश्वरी, विश्वरूप दर्शन, पसायदान हे सगळं प्रेक्षकांना आवडलं. अलौकिक हरिभक्तीच्या या प्रवासाचे प्रेक्षक साक्षीदार झाले आहेत. मालिकेतल्या प्रत्येक व्यक्तिरेखेवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं. माउली, त्यांची भावंडं, इतकंच नव्हे तर मालिकेत माउलींच्या कार्याला विरोध करणारे विसोबा या व्यक्तिरेखांवरही प्रेक्षकांनी प्रेम केलं. पण आता मालिकेत विविध संतांची मांदियाळी अनुभवायला मिळणार आहे.
संतांच्या प्रवासाची सुरुवात संत कान्होपात्रा यांच्या येण्याने होणार आहे. माउलींच्या चमत्काराबरोबरच संतांच्या चमत्कारांची पर्वणीही प्रेक्षकांना भक्तिरसात तल्लीन करेल. संत कान्होपात्रा ही व्यक्तिरेखा अभिनेत्री तितिक्षा तावडे साकारणार आहे. छोट्या पडद्यावर प्रमुख भूमिका साकारून तितिक्षाने प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. तितिक्षा नव्या वेषात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
साधी साडी, हातात वीणा आणि चिपळ्या अशा मोहक रूपात तितिक्षा असेल. तिची ही पहिलीच आध्यात्मिक भूमिका असल्याने तिने यासाठी खूप मेहनत घेतली आहे. विठ्ठलाची निस्सीम भक्त असलेली कान्होपात्रा आणि ज्ञानेश्वर माउली यांची जेव्हा भेट होईल, तेव्हा कोणते चमत्कार बघायला मिळतील याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे.
दिग्पाल लांजेकर आणि चिन्मय मांडलेकर निर्मित ही मालिका गेले अनेक महिने प्रेक्षकांना भक्तिरसात तल्लीन करते आहे. माऊलींचे चमत्कार, त्यांनी केलेलं गीता पठण यातून प्रेक्षकांना ज्ञानेश्वरांबद्दलची माहिती मिळाली. मालिकेत दाखवली गेलेली गोष्ट प्रेक्षकांना भावली आणि म्हणूनच प्रेक्षकांच्या मनात मालिकेनी स्थान निर्माण केलं.
संबंधित बातम्या