Rupali Chakankar: अश्लील शो बंद करा, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांच्या पोलिसांना सूचना
Rupali Chakankar on Ranveer Allahbadia: रणवीर इलाहाबादियाच्या तक्रारी महिला आयोगासमोर आल्या असल्याने रूपाली चाकणकरांनी कडक कारवाईचे संकेत दिले आहेत.

Ranveer Allahbadia: गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्याच अडकलेल्या रणवीर अलाहाबादियाचे पाय आणखी खोलात जाताना दिसत आहेत. आई-वडिलांबाबत अश्लील टिप्पणी करणाऱ्या रणवीर अलाहाबादियाला सर्वोच्च न्यायालयाने देखील फटकारलं आहे. काही दिवसांपूर्वी युट्यूबर समय रैनाच्या 'इंडियाज गॉट लेटेंट' शोमध्ये रणवीर अलाहाबादियानं आई-वडिलांबाबत आक्षेपार्ह्य टिप्पणी केली होती. ज्यामुळे देशभरात खळबळ उडालेली. अशातच आता याप्रकरणी पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. या प्रकरणी अनेक ठिकाणी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. अशातच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी देखील या प्रकरणावर भाष्य करत कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.
या संदर्भात बोलताना रूपाली चाकणकर म्हणाल्या, 'इंडियाज गॉट लेटेंट' या कार्यक्रमासंदर्भात तक्रार आली होती. हा शो अश्लील असल्याने बंद करावा अशी मागणी केली होती. रणवीर अलाहाबादी यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. मात्र, उच्च न्यायालयाचा निर्णय आला आहे की, विविध तक्रारी देशभरातून दाखल झाल्या आहेत, त्या एका ठिकाणी कराव्यात आणि रणवीर अलाहाबादी यांना सहकार्य करण्यास देखील पोलिसांना सांगितले आहे. आम्ही निर्णयाचे स्वागत करतो. सोशल मीडियावर अनेक शो सध्या सुरु आहेत. अशा तक्रार आल्यास आम्ही यासंदर्भात कारवाई करु. अश्लील शो बंद करावेत अशी सूचना आम्ही पोलिसांना केली आहे, अशी माहिती रूपाली चाकणकर यांनी बोलतताना दिली आहे.
विविध शहरांतून अनेक एफआयआर दाखल
रणवीर अलाहाबादिया विरोधात देशाच्या विविध शहरांतून अनेक एफआयआर दाखल करण्यात आल्या आहेत. काही दिवसांपुर्वी , युट्यूबरनं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, ज्यामध्ये त्याच्याविरुद्धचे सर्व एफआयआर एकत्र करावेत, अशी विनंती करण्यात आली होती. तसेच, याप्रकरणी लवकर सुनावणी घेण्याची मागणीही रणवीरनं केली होती. आज 18 फेब्रुवारी रोजी न्यायमूर्ती एन. कोटेश्वर यांनी या प्रकरणी सुनावणी केली आहे. त्यांनी रणवीर अलाहाबादिया यांना कडक शब्दांत फटकारलं आणि असं भाष्य करताना त्यांना लाज वाटली पाहिजे असं म्हटलं आहे. मुख्य न्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांचे पुत्र वकील अभिनव चंद्रचूड यांनी न्यायालयात रणवीर अलाहबादियाची बाजू मांडली.
कोण आहे रणवीर अलाहाबादिया?
रणवीर अलाहाबादिया ( Ranveer Allahbadia ) हा प्रसिद्ध युट्यूबर आहे, तो ‘बीयरबाइसेप्स’ म्हणून देखील ओळखला जातो. त्याचा पॉडकास्ट शो चांगलाच चर्चेत असतो. अनेक मोठ्या मान्यवरांनी त्याच्या पॉडकास्टला उपस्थिती लावली आहे. त्याने मुंबईतील ‘धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल’मधून शिक्षण घेतलं आहे. त्यानंतर रणवीरने त्याचं उच्च शिक्षण ‘द्वारकादास जे सांघवी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग’ येथून पूर्ण केलं आहे. रणवीरने शाळेत असतानाच युट्यूब चॅनेल सुरू केलं होतं. तो एकूण तो 7 यूट्यूब चॅनेल चालवतो. ‘बीयरबाइसेप्स’ हे त्याचं युट्यूब चॅनेल चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहे. या चॅनेलचे तब्बल 12 मिलियन फॉलोअर्स आहेत. एका शोवेळी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सध्या तो चर्चेत आला आहे.























