बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायकाला थेट जीवे मारण्याची धमकी; 10 कोटींची मागितली खंडणी, बिश्नोई गँगचं नाव समोर
Death Threat to B Praak via Friend: गायक बी प्राकला 10 कोटी रुपयांच्या खंडणीसाठी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.

Death Threat to B Praak via Friend: सिनेसृष्टीतून एक मोठी बातमी समोर येत आहे. गायक बी प्राकला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीने 10 कोटी रूपयांची मोठी खंडणी मागितली आहे. 'जर एका आठवड्यात पैसे मिळाले नाही, तर बी प्राकला संपवून टाकणार', अशी त्यानं धमकी दिली आहे. दरम्यान, या धमकीमुळे संपूर्ण संगीत क्षेत्रात भीती आणि चिंतेचं वातावरण निर्माण झाले आहे. गायक बी प्राकला धमकी का देण्यात आली? धमकी देण्यामागचं कारण काय? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, ही धमकी थेट बी. प्राक याला देण्यात आली नाही. बी प्राकला धमकी त्याचा मित्र आणि पंजाबी सिंगर दिलनूर बबलू याच्याद्वारे देण्यात आली आहे. दिलनूर बबलू मोहालीतील सेक्टर 99 येथील वन राईज सोसायटीमध्ये राहतो. धमकी मिळाल्यानंतर दिलनूरने तात्काळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तसेच त्यांना संपूर्ण घटनेची माहिती दिली.
तक्रारीनुसार, दिलनूर बबलूला 5जानेवारी रोजी दुपारी 3:11 वाजता एका परदेशी नंबरवरून दोन मिस्ड कॉल आले. दुसऱ्या दिवशी ६ जानेवारी रोजी दुपारी २:२४ वाजता त्याच नंबरवरून एक कॉल आला. दिलनूरने दोन्ही कॉल रिसीव्ह केले नाही. त्यानंतर त्याला एक व्हॉइस मेसेज आला. ज्यात त्याने स्वत:ची ओळख आरजू बिश्नोई अशी सांगितली. तसेच बी. प्राक यांना 10 कोटी रूपयांची व्यवस्था करण्याची मागणी केली.
व्हॉइस मेसेजमध्ये, गायकाला धमकी देणाऱ्या व्यक्तीने सांगितले की, 'त्यांना पैसे देण्यासाठी एक आठवडा देण्यात आला आहे. जर, पैसे दिले नाहीत तर बी. प्राक आणि त्याच्या साथीदारांना घातक नुकसान पोहचवू', अशी थेट धमकी त्यानं दिली. दिलनूरने स्पष्ट केले की, तो आणि बी प्राक वारंवार शो आणि शूटिंगनिमित्त प्रवास करतात. ही धमकी मिळाल्यानंतर बी प्राकच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. या प्रकरणानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली असून, ही धमकी नेमकी कुणी दिली? याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
आरजू बिश्नोई नेमका कोण?
आरजू बिश्नोई हा लॉरेंस बिश्नोई गँगमधील कुख्यात सदस्य आहे. दिलनूर बबलूने पोलिसांना कॉलचे स्क्रीनशॉट आणि व्हॉइस रेकॉर्डिंग दाखवले. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
























