Shabaash Mithu Teaser : बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pannu) सध्या तिच्या आगामी 'शाबाश मिथू' (Shabaash Mithu) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात तापसी भारतीय क्रिकेटर मिताली राजच्या (Mithali Raj) भूमिकेत दिसणार आहे. चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, आता या चित्रपटाचा टीझर समोर आला आहे, जो चाहत्यांची आतुरता आणखी वाढवणारा आहे. या टीझरमध्ये तापसी पन्नू मिताली राजच्या लूकमध्ये अतिशय सुंदर दिसत आहे.


चित्रपटाचा 56 सेकंदांचा टीझर क्रिकेटच्या मैदानापासून सुरू होतो, ज्यामध्ये प्रत्येकजण भारतीय महिला क्रिकेट संघाचा जल्लोष करत आहे. यानंतर, आता मिताली राजच्या भूमिकेत तापसी पन्नूची झलक पाहायला मिळते. ती शेतात जाण्यासाठी तयार झाली आहे. मात्र, ती थेट बॅटिंगसाठी पॅड घालते, मग तिची क्रिकेट बॅट उचलते आणि मग मैदानात एन्ट्री करते.


टीझरने वाढवली उत्सुकता!


यादरम्यान तापसी पन्नू पाठमोरीच दिसली आहे. तिच्या टी-शर्टवर 'मिताली 3' असे लिहिले आहे. टीझरमध्ये काही आकडेही दाखवण्यात आले आहेत. एकूणच टीझरबद्दल बोलायचे झाले, तर तापसी पन्नूच्या 'शाबाश मिथू' या चित्रपटाचा टीझर खूपच प्रेक्षणीय आहे. या चित्रपटाच्या टीझरने प्रेक्षकांचा उत्साह आणखीनच वाढवला आहे. आता सर्वांना तापसीच्या या चित्रपटाकडून खूप आशा आहेत. तापसी पन्नूनेही हा टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे, ज्याला अभिनेत्रीने छान कॅप्शन दिले आहे.


पाहा टीझर :



या टीझर व्हिडीओसह, तापसी पन्नूने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'या पुरुषांच्या खेळात, तिने इतिहास पुन्हा घडवण्याची तसदी घेतली नाही... त्याऐवजी तिने स्वतःचा इतिहास तयार केला.’ तापसी पन्नूच्या या पोस्टवर कमेंट करताना रकुल प्रीत सिंहने लिहिले, 'वुहू...' याशिवाय चाहते तापसीच्या या पोस्टवर कमेंट करून अभिनेत्रीचे कौतुक करत आहेत.


'शाबाश मिठू' चित्रपटाचे दिग्दर्शन सृजित मुखर्जी यांनी केले आहे. या चित्रपटात तापसी पन्नू व्यतिरिक्त अभिनेते विजय राज, अजित अंधारे आणि अभिनेत्री प्रिया अवोन हे देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज, तसेच महिला क्रिकेट संघाच्या आयुष्याभोवती फिरताना दिसणार आहे. मिताली राजने तिच्या कारकिर्दीत अनेक चढउतारांचा सामना केला, पण तिने कधीही हार मानली नाही. चार विश्वचषकांमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करून, तिने स्वत:ला सिद्ध केले आहे.


हेही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha