Rani Mukerji : अभिनेत्री राणी मुखर्जी (Rani Mukerji) आज (21 मार्च) तिचा वाढदिवस साजरा करत आहे. अनेक चित्रपटांतून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना घायाळ करणारी राणीची जन्माच्या वेळी चक्क एका दुसऱ्याच बाळासोबत बदली झाली होती. स्वतः अभिनेत्रीने तिच्या एका मुलाखतीत हा किस्सा सांगितला होता. राणीचा जन्म ज्या हॉस्पिटलमध्ये झाला तिथे एक पंजाबी कुटुंब देखील होतं. याच कुटुंबातील बाळासोबत राणीची अदलाबदल झाली होती.
राणीची आई कृष्णा मुखर्जी यांनी हा किस्सा अभिनेत्रीला सांगितला होता. ज्या हॉस्पिटलमध्ये कृष्णा यांनी राणीला जन्म दिला, याच हॉस्पिटलमध्ये त्यांच्या शेजारी एक पंजाबी कुटुंब देखील त्यांच्या बाळाच्या आगमनासाठी दाखल झालं होतं. राणीचा आणि या बाळाचा जन्म सारख्याचवेळी झाला होता. राणीची आई कृष्णा मुखर्जी यांना समजले होते की, त्यांच्याकडे चुकीचे मूल देण्यात आले आहे. यानंतर तिच्या आईने हॉस्पिटलच्या परिसरात शोध सुरू केला, तेव्हा त्यांना ते पंजाबी कुटुंब सापडले.
तपकिरी डोळ्यांवरून पटली बाळाची ओळख!
राणी मुखर्जी ही चित्रपट दिग्दर्शक-निर्माते राम मुखर्जी आणि त्यांची पत्नी कृष्णा मुखर्जी यांची मुलगी आहे. राजा मुखर्जी हा राणीचा मोठा भाऊ आहे. काजोल, तनिशा आणि अयान मुखर्जी ही राणीची भावंडं आहेत. यापूर्वी एबीपी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत राणी म्हणाली होती की, ‘जेव्हा माझा जन्म झाला, तेव्हा मला एका पंजाबी जोडप्याच्या ताब्यात देण्यात आले होते. माझ्या आईने तिच्याकडे दिलेल्या दुसऱ्या बाळाकडे पाहिले आणि म्हणाली की, हे माझे मूल नाही. या बाळाचे डोळे तपकिरी नाहीत. माझ्या मुलीचे डोळे तपकिरी आहेत. जा आणि माझ्या बाळाला शोधा.’
राणी म्हणते, ‘माझ्या आईने शोध सुरू केला, तेव्हा मी एका पंजाबी कुटुंबात होते, ज्यांना आठव्यांदा मुलगी झाली होती. यावरून घरातले आताही विनोद करतात की, तू खरं तर पंजाबी आहेस. आमचीच चूक झाली की, तू आमच्या कुटुंबात आहेस. तिच्या कुटुंबात पंजाबी प्रभाव असल्याचेही राणीने सांगितले होते.
आदित्य चोप्राशी बांधली लग्नगाठ!
एका मुलाखतीत राणीने असेही म्हटले होते की, ‘मी पंजाबीशी लग्न करू शकते.’ राणीने एप्रिल 2014मध्ये पंजाबी चित्रपट निर्माता आदित्य चोप्रासोबत लग्न केले. त्यांनी इटलीमध्ये एका खाजगी समारंभात लग्न केले. आता राणी आणि आदित्यला आदिरा नावाची मुलगी आहे.
राणी अखेरची सैफ अली खानसोबत ‘बंटी और बबली 2’मध्ये दिसली होती. गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातून एका दशकाहून अधिक काळानंतर तिने ऑनस्क्रीन पुरागमन केले. वरुण व्ही शर्मा दिग्दर्शित, या चित्रपटात सिद्धांत चतुर्वेदी आणि शर्वरी वाघ यांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- RRR : राम चरण आणि ज्युनियर एनटीआरने आमिर खानला शिकवला डान्स, 'नाटू नाटू' गाण्याचा व्हिडीओ व्हायरल
- Hair Care Tips : 'या' कारणांमुळे सुरू होते केस गळणे, चुकूनही दुर्लक्ष करू नका
- Viral Video : रात्री 12 वाजता नोएडाच्या रस्त्यावर धावत होता मुलगा, नेटकरी करतायत सलाम, कारण ऐकून व्हाल थक्क
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha