Sairat : मराठी चित्रपटसृष्टीला वेगळ्या उंचीवर घेऊन जाणाऱ्या दिग्दर्शक नागराज मंजुळेच्या (Nagraj Manjule) सैराट (Sairat) या चित्रपटाला आज रिलीज होऊन सहा वर्ष पूर्ण झाली आहेत. फक्त महाराष्ट्रातील किंवा भारतामधीलच नाही तर जगभरातील प्रेक्षकांनी या चित्रपटाला पसंती दिली. चित्रपटाच्या गाण्यांनी तर प्रेक्षकांना अक्षरश: 'याड लावलं'. चित्रपट रिलीज होऊन सहा वर्ष झाली तरी देखील या चित्रपटाला आजही प्रेक्षकांची पसंती मिळते. जाणून घेऊयात चित्रपटाबद्दल काही खास गोष्टी...


नागराज मंजुळे यांचा पहिला हिट चित्रपट
सैराट आधी नागराज मंजुळेनं पिस्तुल्या या लघुपटाची निर्मिती केली. त्यानंतर त्याचा फँड्री हा चित्रपट रिलीज झाला. अनेकांनी या चित्रपटाच्या कथानकाचे आणि कलाकारांच्या अभिनयाचे कौतुक केले. पण या चित्रपटानं मात्र बॉक्स ऑफिसवर फारसं यश मिळवलं नाही. त्यानंतर 2016 साली रिलीज झालेल्या नागराजच्या सैराटनं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. या चित्रपटानं 110 कोटींची कमाई केली. 


तळागाळातील कलाकार
सैराट चित्रपटामध्ये कोणताही अनुभवी कलाकार नव्हता. नागराजनं या चित्रपटासाठी तळागाळात जाऊन कलाकार निवडले. या चित्रपटात अभिनेत्री रिंकू राजगुरूनं आर्ची ही भूमिका साकारली तर आकाश ठोसरनं पर्शा ही भूमिका साकारली. आर्जी-परशाची जोडीला जेवढं प्रेक्षकांचं प्रेम मिळालं तेवढचं प्रेम सल्या आणि लंगड्यालाही मिळालं. या कलाकारांचा अभिनय पाहून अनुभवी कलाकारही अवाक् झाले होते.  


गाण्यांनी लावलं 'याड'
झिंगाट असो वा याड लागलं सैराटमधील प्रत्येक गाण्याला प्रेक्षकांची पसंती मिळाली. थिएटरमध्ये सैराट पाहताना झिंगाट गाणं लागलं की प्रेक्षक थिरकायला सुरूवात करत. अजय-अतुलनं लॉस एँजेलिस येथे या चित्रपटामधील गाणी रेकॉर्ड केली. सैराट हा पहिला भारतीय चित्रपट आहे ज्याची गाणी सिम्फनी ऑर्केस्ट्रा येथे रेकॉर्ड झाली. 


रिमेक 
सैराट चित्रपटाचा रिमेक हिंदीमध्ये धडक (2018), बंगालीमध्ये नूर जहाँ (2018), कन्नडमध्ये मनसु मल्लीगे (2017), ओडियामध्ये लैला ओ लैला (2017) आणि पंजाबीमध्ये चन्ना मेरेया (2017) या भाषांमध्ये झाला. 


सैराटची क्रेझ
सैराट रिलीज झाल्यानंतर या चित्रपटाची क्रेझ चाहत्यांमध्ये निर्माण झाली. एका चाहत्यानं हा चित्रपट 32 वेळा पाहिला होता. त्यानं त्याच्या गाडीला सैराटच्या चित्रपटाचे पोस्टर लावले. तसेच लोणावळ्याच्या वॅक्स म्युझियममध्ये आर्ची आणि परशाचा पुतळा देखील तयार करण्यात आला होता. 


हेही वाचा :