Dipika Chikhalia birthday : एक काळ असा होता, जेव्हा टीव्हीवर दाखवल्या जाणाऱ्या ‘रामायण’ (Ramayana) या मालिकेला तुफान लोकप्रियता मिळाली होती. या मालिकेत मुख्य भूमिका साकारणाऱ्या कलाकारांना लोक चक्क देव मानू लागले होते. रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ या मालिकेत अभिनेत्री दीपिका चिखलिया (Dipika Chikhalia) यांनी ‘माता सीता’ची भूमिका साकारली होती. त्यांचा अभिनय इतका सशक्त होता की, खऱ्या आयुष्यातही लोक त्यांना देवी मानू लागले होते. याच प्रतिमेमुळे घरांघरात पोहोचलेल्या दीपिका चिखलिया यांचा आज वाढदिवस आहे.


29 एप्रिल 1965 रोजी मुंबईत जन्मलेल्या दीपिका यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. दीपिका यांनी वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी व्यावसायिक जाहिरातींमध्ये काम करण्यास सुरुवात केली होती. रामानंद सागर यांच्या रामायणात सीतेची भूमिका साकारून दीपिका यांना लोकप्रियता मिळाली की, त्यांची देवीच्या रूपात पूजा केली जाऊ लागली. याच प्रतिमेचा फायदा घेण्यसाठी त्यांना राजकीय ऑफर्सही मिळू लागल्या होत्या.


‘सीता’ ही ओळख कायमस्वरूपी!


अभिनेत्री दीपिका चिखलिया यांनी ‘रामायणा’च्या आधी आणि नंतरही अनेक व्यक्तिरेखा साकारल्या. मात्र, या मालिकेमधून त्यांना जे यश मिळालं, ते इतर कोणत्याही व्यक्तिरेखेमुळे मिळालेलं नाही. 1983मध्ये ‘सुन मेरी लैला’ या चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदापर्ण केलं होतं. या चित्रपटात दीपिका यांच्यासोबत अभिनेते राज किरण  झळकले होते. राजेश खन्ना यांच्यासोबत ‘रुपये दस करोड़', 'घर का चिराग' आणि 'खुदाई' यांसारख्या चित्रपटात त्या झळकल्या होत्या.


हिंदीच नव्हे, तर दीपिका यांनी काही साऊथ चित्रपटांमध्येही भूमिका केल्या. सीतेच्या भूमिकेतून प्रचंड लोकप्रियता मिळवल्यानंतर दीपिका चिखलिया यांनी राजकारणातही भाग घेतला आणि त्या खासदार झाल्या. दीपिका चिखलिया भारतीय जनता पक्षाच्या वतीने 1991मध्ये गुजरातच्या बडोदा मतदारसंघातून लोकसभेच्या सदस्य झाल्या होत्या. आजही त्या राजकारणात सक्रिय आहेत.


हेही वाचा :