मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक, धुंडिराज गोविंद फाळके म्हणजेच दादासाहेब फाळके यांनी108 वर्षांपूर्वी अशी काही किमया केली, की संपूर्ण जगभरात भारताला एक नवी ओळख मिळाली. सध्याच्या घडीला भारतीय कला, चित्रपट जगताकडे अभिमानानं पाहिलं जातं. अनेक आदर्श प्रस्थापित करणाऱ्या याच विश्वाचा पाया दादासाहेब फाळके यांनी कैक वर्षांपूर्वी रचला होता. आजच्याच दिवशी म्हणजे 3 मे रोजी 108 वर्षांपूर्वी पहिला भारतीय चित्रपट (मुकपट) प्रदर्शित झाला होता.


राजा हरिश्चंद्र’ असा फुल लेंथ चित्रपट ठरला, ज्यानं भविष्यात इतर चित्रपटांसाठीच्या वाटा मोकळ्या केल्या. 21 एप्रिल 1913 ला मुंबईतील ऑलिम्पिया थिएटर मध्ये या चित्रपटाचा प्रिमीयर झाला होता. तर, 11 दिवसांनी म्हणजेच 3 मे, 1913 ला चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटासाठी दादासाहेब फाळके यांनी सर्व मिळकत पणाला लावली होती. एका पौराणिक कथेवर चित्रपटाचं कथानक आधारलेलं होतं. 


In Pics : 'एक चुटकी सिंदूर की किमत...'; पाहा बॉलिवूड अभिनेत्रीचा साजश्रृंगार 


(युट्यूबवर या चित्रपटाच्या काही क्लीप शेअर करण्यात आल्याचं पाहायला मिळतं)



हा चित्रपट पूर्णपणे साकारण्यासाठी दादासाहेब फाळके यांना 7 महिने 21 दिवसांचा कालावधी लागला होता असं म्हटलं जातं. मुंबईतील दादर येथेच त्यांनी या चित्रपटाचा सेट लावला होता. मराठी अभिनेता दत्तात्रय दामोदर दबके यांनी या चित्रपटात राजा हरिश्चंद्राची भूमिका साकारली होती. तर, राणी तारामती साकारण्यासाठी महिला कलाकाराचा शोध घेऊनही ती न सापडल्यामुळे अखेर दादासाहेबांनी पुरुष कलाकाराच्याच हाती या भूमिकेची धुरा सोपवली. यानंतर पुढे महिलांनीही अभिनयात स्वारस्य दाखवण्यास सुरुवात केली असं म्हटलं जातं. पुढे काळ बदलत केला, नव्या तंत्राची जोड भारतीय चित्रपट जगताला मिळाली आणि पाहता पाहता हे विश्व अतिशय झपाट्यानं विस्तारत गेलं.