पिंपरी : मोफत बेडवर उपचार देण्यासाठी एक लाख रुपये घेऊन, लूट केल्याप्रकरणी तीन डॉक्टरांना पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे. पालिकेच्या ऑटो क्लस्टर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करताना हा धक्कादायक प्रकार घडल्याचं आता स्पष्ट झालं आहे. पालिकेने ज्या फॉर्च्युन स्पर्श हेल्थकेअर संस्थेला रुग्णांना सेवा देण्याचा ठेका दिला आहे, त्या संस्थेच्या डॉ. प्रवीण जाधव, चिंचवड येथील पद्मजा या खाजगी हॉस्पिटलचे डॉ. सचिन कसबे आणि डॉ शशांक काळे अशा तिघांचा यात समावेश आहे.
23 एप्रिलला चिखली येथील एका महिलेला आयसीयू बेडची गरज होती. त्यांनी पद्मजा हॉस्पिटलशी संपर्क साधला होता. तेव्हा डॉ. कसबे आणि काळे यांनी आमच्याकडे बेड नाही पण आम्ही तुम्हाला एका ठिकाणी बेड उपलब्ध करून देऊ असं सांगितलं. पण त्यासाठी एक लाख रुपये लागतील असंही पुढे म्हटलं.
संबंधित महिला रुग्णाची तब्येत खालावत असल्याने, तातडीनं बेड मिळणं गरजेचं होतं. म्हणून त्यांनी पैसे देण्याची तयारी दाखवली. तेव्हा डॉ. कसबे आणि डॉ. काळे यांनी ऑटो क्लस्टर कोव्हीड हॉस्पिटलच्या डॉ. प्रवीण जाधवला भेटायला सांगितले. त्यांनी बेडची व्यवस्था केल्याचं ते म्हणाले.
असं असतानाही मागील काही तासांपासून याच ऑटो क्लस्टर हॉस्पिटलमध्ये बेड शिल्लक नसल्याचं त्यांना सांगण्यात आलं होतं. त्यामुळे अवघ्या काही मिनिटांत इथं बेड उपलब्ध झाल्यानं, त्यांना धक्का बसला. पण आधी रुग्णाला उपचार मिळणं गरजेचं असल्याने, त्यांनी बेडला प्राधान्य दिलं. तत्पूर्वी डॉ. प्रवीण जाधवच्या माणसाने त्यांच्याकडून एक लाख रुपये घेतले. ही बाब त्यांनी नगरसेवकांना सांगितली आणि त्यानंतर ऑटो क्लस्टर हॉस्पिटलमध्ये गदारोळ झाला. याचे पडसाद 30 एप्रिलच्या सर्व साधारण सभेत उमटले, तब्बल सहा तास वादळी चर्चा रंगली. शेवटी आयुक्त राजेश पाटील यांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करू असं आश्वासन दिलं.
Maharashtra Corona Update | आज राज्यात 56,647 नवीन रुग्णांचे निदान, 51,356 रुग्ण बरे होऊन घरी
दुसऱ्याच दिवशी पिंपरी पोलिसांकडे तक्रारी अर्ज दाखल केला. प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाईची मागणी केली. पोलिसांनी देखील तपासाची चक्र हलवली आणि तीन डॉक्टरांना बेड्या ठोकल्या. या कारवाईमुळं मोफत बेडवर उपचार मिळविण्यासाठी डॉक्टर लूट करत असल्याची धक्कादायक बाब समोर आली. पण, राज्यातील सध्याची परिस्थिती पाहता आता तरी ही लूट थांबेल आणि रुग्णांना मोफत सेवा मिळेल अशी अपेक्षा आहे.