(Source: ECI/ABP News/ABP Majha)
अण्णा नाईकांच्या चाहत्यांचा सेल्फी 'लाख'मोलाचा!
'रात्रीस खेळ चाले' या मालिकेतील अण्णा नाईक म्हणजेच अभिनेते माधव अभ्यंकर यांच्या एका उपक्रमाचे लोकांकडून खूप कौतुक होत आहे.
सिंधुदुर्ग : बातमी वाचल्यावर काही क्षण चपापायला होईल. तुम्ही म्हणाल, सेल्फी लाखमोलाचा कसा होईल कारण सेल्फी काढायला फक्त सेल्फीचं बटण दाबावं लागतं. हो, हे आहे खरं. पण हे बटण दाबण्याआधी आपल्या आवडत्या व्यक्तीने काही प्रेमळ आग्रह धरला तर? असंच काहीसं झालं आहे 'रात्रीस खेळ चाले' या मालिकेच्या सेटवर.
सिंधुदुर्गातल्या आकेरी इथे या मालिकेचं शूट चालतं. पहिल्या मालिकेला लोकांनी उचलून धरलं. पण या मालिकेचा दुसरा सीझन आला आणि लोकांनी पुन्हा एकदा अण्णा नाईक, माई, दत्ता, शेवंता, पांडू आदी कलाकारांवर भरभरून प्रेम करायला सुरूवात केली. म्हणूनच सिंधुदुर्ग, गोवा फिरायला आलेले पर्यटक आकेरीतल्या वाड्यावरही जाऊ लागले. तिथली गर्दी वाढू लागली. कलाकार या प्रेमाने भारावून जात होतेच, पण याचवेळी त्यात अण्णा नाईक यांची भूमिका साकारणारे अभिनेते माधव अभ्यंकर यांच्या डोक्यात एक उत्तम कल्पना आली.
आपण सेल्फी द्यायचा पण तो हवा असेल तर इथे असलेल्या एका पेटीत सेल्फीवाल्यांना जमेल ती रक्कम टाकावी लागेल. रक्कम टाका आणि सेल्फी घ्या असं सत्र सुरू झालं. रकमेची कोणतीही अट नाही. एक रूपयापासून वाटेल ती मदत करण्याचं स्वातंत्र्य होतं. पेटी ठेवली गेली. लोक येऊ लागले. या पेटीवर लिहिलं होतं, 'सैनिक हो तुमच्यासाठी'. जमा होणारी रक्कम सैनिकांना वा सैनिक शाळेला देण्याचा मानस 'रात्रीस खेळ चाले' या मालिकेच्या टीमचा होता. अभ्यंकरांच्या संकल्पनेला सेटवरच्या इतरांनीही उचलून धरलं.
गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात सुरु झालेल्या या सिलसिल्याला वर्ष होईल. या वर्षभरात अशा दोन पेट्या भरल्या. सेटवरच्या मंडळींनी ही रक्कम मोजल्यानंतर ती जवळपास लाखभर आहे. अभिनेते माधव अभ्यंकर यांनी या मोजदादीची माहीती देणारा एक व्हीडीओ केला आहे. त्यात त्यांनी सर्वांचे आभार मानले आहेतच. पण प्रेक्षकांनी केलेली ही मदत आता अंबोलीतल्या सैनिक शाळेला देण्यात येणार आहे, असेही या व्हिडीओमध्ये सांगण्यात आले आहे. हा व्हिडिओ एबीपी माझाच्या हाती लागला आहे.
येत्या 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनी सकाळी आठ वाजता अंबोलीतील सैनिक शाळेत ही मदत दिली जाणार आहे. रात्रीस खेळ चालेच्या सेटवरील या सामाजिक संवेदनेने नवा आदर्श घालून दिला आहे. केवळ एक सेल्फी किती 'लाख'मोलाचा ठरू शकतो याचं हे कौतुकास्पद उदाहरण म्हणावं लागेल.
व्हिडीओ पाहा