Raj Thackeray : राज ठाकरे (Raj Thackeray) हे त्यांच्या राजकीय भाषणामुळे आणि वक्तृत्वामुळे जितकं चर्चेत असतात, तितकच त्यांच्या कलेवरील प्रेमामुळेही राज ठाकरे चर्चेचा विषय ठरतात. राज ठाकरे यांचं सिनेमा, नाटक, संगीत हे प्रेम सगळ्यांनाच माहितेय. राज ठाकरे यांची राजकीय भूमिका सध्या अग्रस्थानी आहे. त्यातच त्यांची राजकीय शैलीतील टोलेबाजी राजकीय वर्तुळाला चांगलीच ज्ञात आहे. पण यावेळी राजकीय टोलेबाजी न करता राज ठाकरे यांनी गाण्याच्या मुद्द्यावरुन पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यावर मिश्किल टीप्पणी केली.
व्यंगचित्रकार असणाऱ्या राज ठाकरेंच्या कलेविषयीच्या भावनाही काही अनोळखी नाहीत. राज ठाकरे यांनी बोल भिडूला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी संगीत दिलेल्या गाण्याविषयी त्यांना विचारण्यात आलं. पण इतरवेळी राजकीय टोलेबाजी करणाऱ्या राज ठाकरेंनी यावेळी मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गाण्याच्या मुद्द्यावरुन निशाणा साधला.
राज ठाकरे यांनी नेमकं काय म्हटलं?
राज ठाकरेंनी संगीत दिलेलं गाणं कधी येणार या प्रश्नाचं उत्तर देताना राज ठाकरेंनी म्हटलं की, काही गोष्टी मला सुचतात आणि त्या आकारात आल्या की त्याचा मालक मी नसतो. तुम्ही गीतकार वैगरे म्हणून पुढे आलं पाहिजे, असा प्रश्न विचारला असताना देवेंद्र फडणवीस यांचा देखील संदर्भ देण्यात आला. त्यावेळी म्हटलं की, देवेंद्र फडणवीसही हल्ली गाणी लिहितात. त्यावर राज ठाकरे यांनी म्हटलं, त्यांना गाणी लिहू दे तिकडे गरजपण आहे. पण मला अशा गोष्टींच क्रेडिट घेणं नाही आवडत.
कलेतून आनंद घेता यायला हवा - राज ठाकरे
कलेतून तुम्हाला आनंद घ्यायला हवा. हे सगळं मी केलंय, तो मी पणा चांगला नाही. मी साधं कोणत्या माणसाचं काम केलं तरी मी ते बोलून दाखवत नाही. आतापर्यंत मी एवढी भाषण केलीत, पण स्वत:ची 10 भाषणंही ऐकली नसतील. ती होऊन गेलेली प्रोसेस असते, त्याला तुम्ही काहीच करु शकत नाही, असंही राज ठाकरे यांनी म्हटलं.
स्वदेस पाहिल्यानंतर राज ठाकरेंची प्रतिक्रिया
राज ठाकरेंनी म्हटलं की, 'मी स्वदेस पाहायला गेलो होतो. आशुतोष गोवारीकर यांनी आमच्यासाठी त्या सिनेमाचा प्रिव्ह्यु ठेवला होता. इंटरवल बाहेर आलो, आशुकडे पाहिलं पुन्हा आत गेलो. सिनेमा पाहून झाल्यानंतर त्याला म्हटलं की, अरे हे काय केलंयस. मला तेव्हा अजिबात सिनेमा आवडला नाही. त्याला म्हटलं हा काय सिनेमा आहे का, असं काहीतरी बोललं मी त्याला. आजही त्यासाठी मला वाईट वाटतं. पण मी घरी आल्यानंतर शांतपणे विचार केला की, मी सिनेमा पाहिला का? कारण तेव्हा माझ्या बॅक ऑफ द माईंड लगान होता. मी तिथे माझा एक स्वत:चा डोक्यात एक सिनेमा घेऊन गेलो होतो. पण तसं काहीच मला दिसलं नाही. तेव्हा मला कळलं की मी सिनेमाचं नाही पाहिला.'