IPL 2024 KKR vs MI Mitchell Starc:  कोलकाता नाइट रायडर्सचा गोलंदाज मिचेल स्टार्कने (Mitchell Starc) मुंबई इंडियन्सविरुद्ध घातक गोलंदाजी केली. स्टार्कने 4 षटकांत 33 धावा देत 4 विकेट्स घेतल्या. डावाच्या दुसऱ्या षटकातच स्टार्कने इशान किशनला बाद करत मुंबईला मोठा धक्का दिला होता. तसेच जेराल्ड कोएत्झीला स्टार्कने त्रिफळाचीत करत आणि जोरदार सेलिब्रेशन केले. या चेंडूचा मारा इतका घातक होता की कोएत्झीच्या हातातून बॅटही सूटल्याचे पाहायला मिळाले.


शेवटच्या 4 षटकांत मुंबईला विजयासाठी 46 धावांची गरज होती आणि टीम डेव्हिड क्रीजवर होता. पुढच्या 2 षटकांत फक्त 13 धावा आल्या, त्यामुळे मुंबईला शेवटच्या 2 षटकात 32 धावांची गरज होती. टीम डेव्हिड 19व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर 24 धावांवर बाद झाला आणि त्यामुळे मुंबईच्या विजयाच्या आशा जवळपास संपुष्टात आल्या. पुढच्याच चेंडूवर पियुष चावलाही पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याच षटकात स्टार्कने जेराल्ड कोएत्झीला त्रिफळाचीत करून आपल्या संघाला 24 धावांनी विजय मिळवून दिला.






मिचेल स्टार्क आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू-


आयपीएल 2024 आधी झालेल्या लिलावात कोलकाता नाईट रायडर्सनं मिचेल स्टार्क याच्यावर कोट्यवधी रुपये उधळले होते. मिचेल स्टार्क आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. कोलकात्यानं मिचेल स्टार्क याला 24.75 कोटी रुपयांमध्ये खरेदी केले होते. 


मुंबईचा पराभव-


केकेआरने पहिल्या खेळात 169 धावा केल्या होत्या, ज्यासाठी व्यंकटेश अय्यरने 70 धावांची शानदार खेळी केली. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मुंबई इंडियन्स मैदानात उतरली तेव्हा संघाची सुरुवात खूपच खराब झाली होती. संघाने 46 धावांत 3 विकेट गमावल्या होत्या. रोहित शर्मा 11 धावा, इशान किशन 13 आणि नमन धीर 11 धावाच करू शकला. सूर्यकुमार यादव खंबीरपणे उभा राहिला, पण दुसऱ्या टोकाकडून सातत्याने विकेट पडत होत्या. सूर्यकुमार यादवने 35 चेंडूत 56 धावा केल्या, त्यादरम्यान त्याने 6 चौकार आणि 2 षटकारही लगावले. 


कोलकाताची भेदक गोलंदाजी-


विशेषत: फिरकीपटूंनी कोलकाता नाईट रायडर्ससाठी शानदार गोलंदाजी केली. सुनील नरेन आणि वरुण चक्रवर्ती या दोघांनी 4 षटके टाकली आणि दोघांनी 22 धावांत 2-2 विकेट घेतल्या. त्याने मधल्या षटकांमध्ये मुंबईच्या फलंदाजांना आक्रमक फलंदाजी करण्यापासून रोखले. मिचेल स्टार्कने शेवटच्या षटाकांत वर्चस्व गाजवत 4 विकेट्स घेतल्या. वास्तविक, सामन्याचा गेम चेंजर आंद्रे रसेल होता, ज्याने सूर्यकुमार यादवची विकेट घेत सामना केकेआरकडे वळवला, त्याशिवाय त्याने हार्दिक पांड्याची विकेटही घेतली.


संबंधित बातम्या:


Rohit Sharma: कोलकाताविरुद्ध रोहित शर्मा इम्पॅक्ट प्लेयर म्हणून का खेळला?; टी-20 विश्वचषकाआधी चिंता वाढवणारी बातमी


आयपीएलनंतर टी-20 विश्वचषकाचा थरार; विजेता संघ होणार मालामाल, पराभूत झालेल्या संघांवरही पैशांचा पाऊस


मुंबई इंडियन्सच्या पराभवापेक्षा सारा तेंडुलकरची चर्चा; वानखेडे मैदानावरील फोटो होतोय व्हायरल